पुण्याहून गावाकडे परतलेल्या निराश स्पर्धा परीक्षावाल्यांसाठी ६ सल्ले ! वाट सापडतेय का पाहा.. ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 12:01 IST2020-05-14T11:55:24+5:302020-05-14T12:01:24+5:30
सरकारात साहेब होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मोठय़ा जिल्ह्याच्या ठिकाणी क्लासेस लावून स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हजारो जण आपापल्या गावाकडे परतले आहेत. त्यांच्या मनावरचं मळभ कसं दूर करता येईल?

पुण्याहून गावाकडे परतलेल्या निराश स्पर्धा परीक्षावाल्यांसाठी ६ सल्ले ! वाट सापडतेय का पाहा.. ...
- संदीपकुमार साळुंखे
2020 साल सुरू झालं तेव्हा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणाईला एक आशेचा किरण दिसत होता तो म्हणजे एप्रिलमध्ये प्रस्तावित राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आणि तत्सम काही इतर परीक्षा ! पुणो, मुंबई या मोठय़ा शहरांमध्ये आणि इतरही ठिकाणी अगदी कंबर कसून तरुणाई परीक्षेची तयारी करत होती. याचवेळी कोरोनाची चर्चा सुरू झाली. पूर्वपरीक्षेच्या तयारीचा भाग म्हणून सद्य घडामोडींमध्ये आपण कोरोनाच्या थोडय़ाफार बातम्याही वाचत होतो. पण हाच कोरोना स्पर्धा परीक्षांच्या तारखाच आपल्या वावटळीत उडवून येईल, अशी पुसटशीही शंका त्यावेळी कुणाला आली नव्हती.
आधी तर अनेकांना वाटलं की परीक्षा होईल. मग वाटलं की परीक्षा दहा-पंधरा दिवस पुढे ढकलली जाईल; पण आता परिस्थिती या वळणावर येऊन पोहोचली आहे की, मुळात परीक्षा होईल की नाही या बाबतीतच संभ्रम आहे.
पुण्या-मुंबईमध्ये आणि मोठय़ा जिल्ह्यांच्या ठिकाणी साहेब होण्याच्या स्वप्नांना उराशी बाळगून, मोठमोठय़ा क्लासेसची अवाढव्य फी भरून, प्रसंगी कर्ज काढून, बकऱ्या नाहीतर बैल विकून किंवा काळजाच्या तुकडय़ासारख्या असलेल्या काळ्या आईच्या एका छोटय़ा तुकडय़ाला विकून रात्रंदिवस अभ्यास करणा:या तरुणाईसाठी हा काळ अतिशय उद्वेगजनक आहे यात शंकाच नाही. गावाकडच्या राब राब राबणाऱ्या आपल्या बापाला आयुष्याच्या शेवटी तरी थोडं सुख मिळावं, फाटलेलं लुगडं नेसणाऱ्या आपल्या आईला किमान पाचशे हजाराची साडी तरी उतारवयात नेसवता यावी, छोटय़ा बहिणीचं लग्न थोडं धूमधडाक्यात व्हावं अशी स्वप्न घेऊन अनोळख्या शहरातल्या आठ बाय दहाच्या रूममध्ये आपल्यासारख्याच दोन-चार समदु:खी मित्रंना घेऊन राहणारा तरुण किंवा लेडीज हॉस्टेलमध्ये नाहीतर पेइंग गेस्ट म्हणून राहणारी तरुणी हे सर्व आता अनिश्चिततेचं गाठोडं घेऊन आपापल्या गावात परतले आहेत किंवा परतत आहेत..
सगळ्यांच्या मनात बरीच निराशा, अनिश्चितता आणि संभ्रम आहे. अशातच मागच्या आठवडय़ात पुण्याहून अशा तरुणांना गावाकडे सोडलेल्या बसची बातमी पाहिली आणि वाटले की, या सा:या तरुणांसाठी अनुभवाचे मार्गदर्शनपर दोन शब्द सांगावेत.
मी स्वत: MPSC आणि UPSC अशा दोन्ही स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेलो आहे आणि तेही पूर्णवेळ नोकरी करून. दोन आठवडय़ातून केवळ एक दिवस मी टिळक रोड, सदाशिव पेठेकडे जायचो, मित्रमंडळींना भेटायचो, काही नवीन नोट्स किंवा पुस्तके आली असल्यास घ्यायचो आणि परत येऊन पुन्हा पुढचे पंधरा दिवस दहा तासांची डय़ूटी करून उरलेल्या वेळेत अभ्यास करायचो. 2001-2004 यादरम्यानची गोष्ट आहे. त्यावेळी स्मार्टफोन्स फारसे चलनात नव्हते. आता तर तुमच्याकडे स्मार्टफोन्स आहेत आणि इंटरनेटदेखील आहे त्यामुळे ठरवले तर तुमच्या सगळ्यांसाठी या गोष्टी खूप सोप्या आहेत.
- मी हे सहा सल्ले तुम्हाला देतो आहे, ते या अनुभवाच्याच आधारावर!
अशा पद्धतीने वेगवेगळ्या आघाडय़ांवर तुम्ही नियोजनबद्धरीत्या लढत दिली तर यश तुमचेच आहे. आणि एवढे करूनदेखील यश मिळाले नाही तर एक लक्षात ठेवा की स्पर्धा परीक्षा म्हणजे संपूर्ण जीवन नाही त्यापलीकडेही एक माणूस म्हणून तुम्ही स्वत:साठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या मित्रंसाठी खूप महत्त्वाचे आहात.
स्पर्धा परीक्षांना ‘तू नही तो और सही’ असे म्हणून ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया’ असे गुणगुणत आपण आयुष्याची दुसरी वाट आनंदाने चोखाळू.
सल्ला : एक
गावाकडे आलात, तर ते उत्तमच झाले!
तुम्ही आपल्या गावी परत आला असाल किंवा मोठय़ा शहरात राहूनही तुमचे क्लास बंद असतील तर साधारणत: महिन्याभरातच तुमच्या लक्षात येईल की व्यवस्थित नियोजन केले तर घरीसुद्धा अभ्यास होऊ शकतो. त्यासाठी मोठय़ा फी भरून, मेसमध्ये निकृष्ट खाऊन, एखाद्या 10 बाय 10 खुराडय़ात राहून, आपल्या आई-बापांना कर्जबाजारी करून, त्यांना बकऱ्या, बैल नाहीतर शेतीचा तुकडा विकायला लावून मोठय़ा शहरांमध्ये राहायची अजिबात गरज नाही.
सल्ला : दोन
घरी राहून का नाही अभ्यास होणार?
तुमच्याकडे महत्त्वाची पुस्तके आणि नोट्स सोबत असतीलच. शिवाय अनेक विषयांवर तुम्हाला यू-टय़ूब आणि विविध वेबसाइट्स, व्हॉट्सअॅप ग्रुप आणि इतर सोशल मीडियाद्वारे सर्व माहिती अद्यावत स्वरूपात मिळतेच. त्यामुळे आपला काही अभ्यास राहून जाईल, अशी भीती मनात बाळगू नका. मुख्य म्हणजे फोमो (FOMO - Fear of Missing Out) म्हणजे आपल्याला काही गोष्टी कळणार नाहीत किंवा आपण मागे राहून जाऊ ही भीती मनातून काढून टाका. ही सर्व भीती केवळ बाहेरच्यांनी किंवा आपल्या स्वत:च्याच मनाने निर्माण केलेली असते.
शिवाय आता सर्वचजण आपापल्या घरी अभ्यास करत आहेत त्याच्यामुळे सर्व एकाच पातळीवर आले आहेत हे लक्षात ठेवा.
सल्ला : तीन
शेतात झाडाखाली बसा, नाहीतर देऊळ गाठा!
ज्या तरुणांची गावाकडची घरे छोटी असतील किंवा घरात अभ्यासाचे वातावरण नसेल त्यांनी एखादी तात्पुरती अभ्यासिका गावात तयार करा किंवा सरळ आपल्या किंवा मित्रच्या शेतावर जाऊन मस्त झाडाखाली किंवा गावाबाहेरच्या एखाद्या मंदिरात बसून अभ्यास करा.
सध्या दोन-तीन महिने शाळाही बंद असणार आहेत त्यामुळे गावातल्या वरिष्ठांना विनंती करून तुम्ही शाळेतल्या एखाद्या खोलीतदेखील अभ्यासिका तयार करू शकता.
सल्ला : चार
भारंभार पुस्तके नुस्ती डोक्यात भरू नका!
प्रत्यक्षात आता स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांचे स्वरूप असे आहे की, तुम्हाला जर मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजल्या असतील तर ब:याच प्रश्नांची उत्तरे इंटेलिजण्ट गेसिंग म्हणजे बुद्धिधारित अंदाजाने तसेच एलिमिनेशन पद्धतीने देता येतात. नुसत्या माहितीवर आधारित प्रश्नांचे स्वरूप आता बरेच कमी झाले आहे. त्यामुळे खूप भारंभार आणि डझनावारी पुस्तके वाचण्यापेक्षा मूलभूत संकल्पना स्पष्ट करणारी, अद्ययावत माहिती असणारी अशी निवडक पुस्तकेच वाचा.
खूप पुस्तके एकेकदा वाचण्यापेक्षा निवडक आणि महत्त्वाची पुस्तके अनेकदा वाचा. आपापल्या मित्र-मैत्रिणींचे फक्त अभ्यासासाठीचे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्यात अभ्यासाव्यतिरिक्त दुसरी कुठलीही चर्चा होणार नाही, असे नियम बनवा, म्हणजे तुम्हाला एकत्र अभ्यासिकेत बसल्यासारखी किंवा गटचर्चा केल्यासारखे फिलिंग येईल.
सल्ला : पाच
नुस्ता अभ्यास नको, जरा बूड हलवा!!
ज्या तरुणांना पार्टटाइम, अर्धवेळ नोकरी किंवा व्यवसाय करणो शक्य असेल त्यांनी तो जरूर करा. अगदी रसवंती किंवा सरबताचे दुकान लावण्यातदेखील लाज वाटू देऊ नका.
माझा स्वत:चा असा अनुभव आहे की पूर्णवेळ अभ्यास करणा:यांचासुद्धा दिवसातून बराच वेळ इकडच्या तिकडच्या गोष्टी करण्यामध्ये वाया जातो आणि शेवटी अभ्यास पाच-सहा तासच होतो.
तुम्ही जर शेतातली कामे, छोटा व्यवसाय किंवा अर्धवेळ नोकरी केली तर उलट तुम्ही उरलेल्या वेळात अधिक जास्त तन्मयतेने अभ्यास कराल आणि स्वत:ला आणि कुटुंबाला थोडा आर्थिक आधारदेखील मिळेल.
स्पर्धा परीक्षांचे स्वरूपच असे आहे की कितीही जीव ओतून अभ्यास आणि कष्ट केले तरी शंभर टक्के यश मिळेलच याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. तुम्ही अर्धवेळ नोकरी किंवा व्यवसाय करून अभ्यास केलात तर ही टोचणी मनाला लागून राहत नाही.
सल्ला : सहा
परीक्षा कधी, जाहिराती कधी हे विचार सध्यातरी बंद!
महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता परीक्षा कधी होईल? नवीन जाहिराती कधी येतील? वगैरे.
- एक गोष्ट लक्षात ठेवा की सर्व देश आणि त्यातही महाराष्ट्र हा अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे त्यामुळे शासनाला आपले प्राधान्यक्रम नक्कीच बदलावे लागतील. मोठय़ा प्रमाणावर रोजगार ज्या क्षेत्रंमध्ये उपलब्ध होईल अशा क्षेत्रंवर जास्त भर द्यावा लागेल. शिवाय साथीच्या निवारणासाठी आरोग्य क्षेत्र, औषधनिर्माण क्षेत्र यावर भर द्यावा लागेल, त्यामुळे कमी पदे भरली जाणो किंवा जाहिराती उशिरा येणो याबाबतीत आपण आपली मानसिक तयारी ठेवली पाहिजे. अशावेळी आपण पूर्णवेळ अभ्यास करण्याऐवजी अर्धवेळ अभ्यास केला आणि जाहिरात आल्यानंतर पुन्हा पूर्णवेळ अभ्यासाकडे वळलो तर आपली दोन्ही उद्दिष्टे साध्य होतील.
(लेखक अतिरिक्त आयकर निदेशक (अन्वषेण) आहेत.)