कुकरची शिट्टी बंद!
By Admin | Updated: September 11, 2014 17:07 IST2014-09-11T17:07:49+5:302014-09-11T17:07:49+5:30
इतरांना कशाला ज्ञान द्या, आपणच बदलेलं बरं!

कुकरची शिट्टी बंद!
मला आठवतंय, तीन-चार वर्षापूर्वी ‘ऑक्सिजन’च्या ‘गो मॅड-मेक अ डिफरन्स’ कॉलममधे मी ‘कुकरच्या शिट्टी’विषयी एक लेख वाचला होता.
त्यात असं लिहिलेलं होतं की, कुकरच्या शिट्टय़ांवर शिट्टय़ा करायची काहीच गरज नाही. आपण साधा भात लावला तरी चार चार शिट्टय़ा करतो, काही काही घरात तर दहा दहा शिट्ट्या होतात तरी लोकं कुकर बंद करत नाहीत.
ते वाचून मलाही वाटलं होतं की, शिट्टी झाली नाहीतर कुकरमधलं अन्न कसं शिजेल? पण मी ठरवलं आपण प्रयोग करून पाहू. शिट्टी होईल असं वाटलं की, मी गॅस मंद करत असे. आणि त्यानंतर ५ मिण्ट गॅस तसाच ठेवून मग बंद करुन टाकत असे. सुरूवातीला टेन्शन आलं पण आता गेली किमान चार वर्षे तरी माझ्या घरात कुकरची शिट्टी झालेली नाही. त्यानंतर मी वाचलं की अशा शिटया केल्यानं आपण अन्नातली सगळी जीवनसत्व वाया घालवतो, ती वाफेबरोबर उडून जातात.
त्यामुळे मी घेतलेल्या निर्णयाचं मला जास्त अप्रूप वाटलं. आणि आता माझ्या असंही लक्षात आलंय की पर्यायरणाविषयी आपण खूप बोलतो.
पण बाकी जगाला काही सांगण्यापेक्षा, शिकवण्यापेक्षा आपण आपल्याच लाईफस्टाईलमधे काही बदल केले ना, तरी खूप आनंद होतो.
त्यामुळे मी तरी अशा बर्याच छोट्या गोष्टी करते. प्लास्टिक कमी वापरते, कचर्याचं वर्गिकरण करते, यू अँण्ड थ्रो वस्तू शक्यतो वापरतच नाही.
एका छोट्या लेखापासून ही सुरुवात झाली , थॅँक्स ऑक्सिजन!
- प्रणाली खेडकर (शेगाव)