घरच्या घरी रंग बनवा रंगून जा!
By Admin | Updated: March 24, 2016 21:14 IST2016-03-24T21:14:07+5:302016-03-24T21:14:07+5:30
जे रंग निसर्गाचे आहेत, निसर्गनिर्मित आहेत त्यानं रंगपंचमी खेळली तर? असे रंग जे अगदी तोंडातून पोटात गेले तरी त्रास देत नाहीत

घरच्या घरी रंग बनवा रंगून जा!
जे रंग निसर्गाचे आहेत, निसर्गनिर्मित आहेत त्यानं रंगपंचमी खेळली तर?
असे रंग जे अगदी तोंडातून पोटात गेले तरी त्रास देत नाहीत अशा रंगांचा विचार करायला काय हरकत आहे? आपल्या खाण्यात येणारे किती पदार्थ रंगीत आहेत? टोमॅटो, गाजर, डाळींब, बिट, स्ट्रॉबेरी अगदी चहा-कॉफी आणि हळदसुद्धा! तिखट लाल असतं खरं पण ते काही पोटाला जाळल्याशिवाय राहत नाही! ते सोडून देऊ!! कोणी म्हणेल हे खाण्याचे पदार्थ कशाला वापरता रंग म्हणून? गरिबाच्या तोंडचा घास पळवता का काय? ठीक आहे.
मग जेव्हा टोमॅटो, गाजर, बीट प्रचंड प्रमाणात बाजारात येते, त्याचा भाव पडतो आणि शेतकऱ्याला न विकलेला माल परत न्यायला परवडत नाही म्हणून तो माल तसाच रस्त्याच्या कडेला ढकलून हताश होऊन घरी जातो. तेव्हा तो मात्र कचरा होतो. त्याचा वापर रंग खेळायला केला तर काय बिघडेल?
गाजर टोमॅटोच नाही, तर झेंडू, शेवंती, जरबेरा अशी चटकदार रंगांची फुलं बाजारात येतात आणि कधी भाव मिळाला नाही की मातीमोल होत कचरा होऊन मातीत फेकली जातात. होळीच्या असल्यास या मातीमोल होऊन जाणाऱ्या भाज्यांचा, रंगीबेरंगी फुलांचा वापर करता येईल.
उन्हाळ्याच्या सुरुवातीला टळटळीत दुपारी दिमाखदार रंग चमकावत बहरलेल्या झाडांच्या खाली त्या चटकदार रंगांच्या पाकळ्यांचा केवढा तरी सडा पडलेला असतो. तो रंग आपल्याला रंगपंचमीचा रंग म्हणून नाही का वापरता येणार?
कांद्याची सालं बहुधा कोणी खात नाही. गुरेही त्याला तोंड लावत नाहीत. त्याच्या सालांपासून पिवळा रंग तयार होतो. बीटच्या सालापासूनही लालचुटूक रंग मिळू शकतो. डाळिंबाच्या सालापासून, रताळ्याच्या सालींपासून तयार करता येणारा रंग पोटाच्या आतसुद्धा त्रासदायक नसतो आणि त्वचेच्या वरसुद्धा त्रासदायक नसतो. पाण्यात उकळलेली, वापरून झालेली चहापत्ती आणि कॉफीपूड यांचाही रंग आपल्याला मिळू शकेल.
नुसता हातात घेतला तरी हाताला लागणारा मायाळू किंवा रुईच्या पानांचा रंग वापरता येईल. कुठेही उगवणाऱ्या टणटणीत फळांचा रंगसुद्धा चांगला असतो. पाला काढून घेतलेल्या पालेभाजीच्या देठांमध्ये हिरवा रंग मिळेल. लाल माठात लाल मिळेल. जांभळ्या रंगाच्या कोबीच्या जाड पानांमधूनही रंग काढता येईल. तूती, अंबाडी हीदेखील उपयोगी पडतील.
तयार रंगसुद्धा घरात सापडतील. हळद, नीळ तर आहेच पण गेरु, कात, रक्तचंदन, भस्म, टीका, बेसन, मेंदी असेही रंग मिळू शकतात.