रंगात रंग..

By Admin | Updated: March 24, 2016 21:13 IST2016-03-24T21:13:06+5:302016-03-24T21:13:06+5:30

निसर्ग एकीकडे या दिवसांत मनमुक्त रंगपंचमी खेळत असतो, आणि आपण रंग खेळायचा नाही,

Color in color .. | रंगात रंग..

रंगात रंग..

 - विनय र. र.
( लेखक.... आहेत.)
निसर्ग एकीकडे या दिवसांत
मनमुक्त रंगपंचमी खेळत असतो,
आणि आपण रंग खेळायचा नाही,
रंगायचं नाही म्हटल्यावर हिरमोड होतोच.
पण पाणीटंचाईच्या काळात
पाण्याची नासाडी करत रंग खेळणंही चूकच!
त्यावर उपाय काय?
अशा रंगात रंगायचं जे निसर्गच देतो,
बादलीभर अंघोळीच्या 
पाण्यातही ते धुऊन निघतात,
नाही धुतले तरी चालतात!
पण असे रंग शोधायचे कुठं?
आपल्याच घरात!!

लहान मुलं एक खेळ खेळतात ‘डाली बत्ती लावत जाव’ असे राज्य घेतलेला मुलगा म्हणतो आणि कुठल्यातरीे झाडाचे नाव सांगतो. लाल पत्ती लाव जाव म्हटलं की सगळी मुलं लाल पत्रीच्या झाडावरून लाल पत्री आणून त्याला देतात. मग दुसरे, तिसरे, चौथे अशी अनेक झाडांचा, त्यांच्या रंगांची, फुलांची, फळांची, पानांची ओळख लहानपणी होते. ती विसरली की मग रंगांसाठी बाजारावर अवलंबून राहायला होते. चार रुपये टाकले की भरपूर रंग मिळतो, तो एकमेकांना फासायलाही काहीे वाटत नाही.
उन्हाळ्यात होळी-रंगपंचमी हे सण येतात. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असते. दुष्काळी वर्षांमध्ये ती आणखीनच तीव्र असते. मग काही जागरूक नागरिक सर्वांना सांगतात- होळी, रंगपंचमी खेळू नका, पाणी वाया घालवू नका. त्यांचं हे म्हणणं चुकीचं नाही. 
पण हेही खरं की, याच काळात सर्वांना निसर्गात वृक्षांकडून प्रगट होणाऱ्या रंगांच्या उधळणीचा आविष्कार आकर्षित करीत असतो. इतर वेळी ज्या वृक्षांकडे लक्षही जाणार नाही असे अमलताश, गुलमोहोर, नीलमोहोर, पाटलाची सून, पळस, पांगारा असे विविध वृक्ष आपल्याला त्यांच्याकडे बघायला लावतात. पुन्हा पुन्हा बघायला लावतात. त्यांच्या फुलांच्या पाकळ्यांचे रंगही किती आकर्षक. भगवा, अबोली, कितीतरी रंग, याशिवाय सूर्याच्या वाढत्या ऊर्जेमुळे जुन्या पानांचे ज्येष्ठ पोक्त असे पिवळे-तपकिरी रंग, तरण्या पानांचे हिरवे पोपटी रंग आणि उमललेल्या पर्णकुटांचे लाल, तांबूस, विटकरी रंग.. निसर्गात रंगांच्या उठावाचा असा इशारा असल्यावर माणूस तरी काय करणार? 
होळी ते रंगपंचमीच्या या पाच दिवसांत रसरशीत रंगात रंगून जाण्याची ओढ लागणारच की!
एकीकडे ही ओढ आणि दुसरीकडे पाण्याची तंगी, दुष्काळ, होरपळ. काय करणार? 
मन स्वस्थ बसू देत नाही. 
पाणी तर वाचवलंच पाहिजे.
पण आपल्या मित्रमैत्रिणींना रंगात रंगवलं पाहिजे, रंगलेलं पाहिलं पाहिजे, आणि स्वत:ही रंगलं पाहिजे. 
पण कसं?
हे जमावं कसं? ऐन दुष्काळात पाणी नासवून रंग खेळायला मन मानत नाही, कारण ते चुकीचंच आहे. पाण्याची नासाडीही करायची नाही आणि रंगही मनसोक्त खेळायचे असं काही करता येईल का?
असे रंग वापरता येतील का, की ज्यांना फारसं पाणी लागणार नाही? 
असे रंग वापरता येतील का, जे धुवून काढून टाकायला लागणार नाहीत?
मुळात हे प्रश्न आपल्याला पडायचं कारणच हे की आपण होळीला/रंगपंचमीला असे रंग वापरायला सुरुवात केली की जे खरं तर अंगाला लावण्यासाठी तयार झालेलेच नाहीत. कारखान्यात तयार झालेले हे रंग भिंती रंगवण्यासाठीचे आहेत. लाकडी आणि लोखंडी सामान रंगवण्यासाठी आहेत. हो आणि अर्थातच काही प्लॅस्टिक, नायलॉन रंगवण्यासाठी आहेत. ते अंगाला लागले की चामडीला त्रास होणारच! 
फिनाईलाने फरशी, संडास, बाथरूम चांगली धुतली जाते म्हणून फिनाईलने अंघोळ कराल तर काय होईल? चामडी काळवंडून जाईल.
तेच या रंगांचंही! 
कारखान्यात बनलेले रासायनिक रंग त्रास देणारच! 
मला प्रश्न पडतो, निसर्ग रंगांची उधळण करतो ती कशी दिसते?
- मनमोहक दिसते. आकर्षक दिसते. प्रत्येक रंग खुलून उठून दाखवणारी असते. 
आपण दुसऱ्याला रंगवतो ते कसे? 
रंगांची उधळण कसली मिसळण करतो आणि रंगांची दुनिया बहारदार करण्याऐवजी विद्रूप करतो. आॅईलपेंट फासतो, सिल्व्हरपेंट, डांबरी रंग फासतो आणि त्यातून ते काढायला भरपूर पाणी वापरतो. त्वचारोग ओढवून घेतो. डोळ्यात रंग गेला तर आंधळेपण ओढवून घेतो.
आपण एकमेकांना विद्रूप नको करायला. रंगांनी सजवून रंग उधळ्यापेक्षा रंग लावू या. फुलांच्या पाकळ्यांच्या माळा, गुच्छ, गोंदे असेही करता येईल. एकमेकांना घालता येतील. दुनिया रंगीबेरंगी आहे. प्रत्येक रंगाच्या वस्तूला शेजारपाजारच्या रंगाच्या वस्तू खुलवतील असे रंग लावू. मजाही करू, आरोग्यही आणि पाणीही वाचवू!!
रंगपंचमी खऱ्या अर्थानं साजरी करू..!!

Web Title: Color in color ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.