बंद कर, ही रिपरिप

By Admin | Updated: August 1, 2014 11:42 IST2014-08-01T11:42:44+5:302014-08-01T11:42:44+5:30

काही दिवसांपासून पाऊस माझ्याशी खेळ करतो आहे. त्याची माझी हल्ली चुकामूकच होतेय. जसं पावसासाठी आपण तरसतो तसा आपल्यासाठी तो तरसत नसेल का?

Close it, only rearrift | बंद कर, ही रिपरिप

बंद कर, ही रिपरिप

काही दिवसांपासून पाऊस माझ्याशी खेळ करतो आहे. त्याची माझी हल्ली चुकामूकच होतेय. जसं पावसासाठी आपण तरसतो तसा आपल्यासाठी तो तरसत नसेल का? खुळ्या मनाचे खुळेच विचार. माणसांसारखा तोही स्वार्थी झाला असेल? आपापलं यायचं, बरसायचं अन् निघून जायचं. जेवढे आपल्या थेंबात एकवटले तेवढे क्षण एकवटून घेऊन जायचं. आणि जेवढे निसटले त्याचं प्रायश्‍चित करत बसायचं. 
बाहेर रिपरिप सुरू असते तेव्हा मला मनातल्या मनात खूप राग येतो. एकदाचा मुसळधार कोसळ आणि बंद हो, ही रिपरिप बंद कर असं सांगावंसं वाटतं त्याला. वाटतं आपल्याला आपलं डोकं लपवायला निदान घर तरी आहे, ऑफिसचं छत तरी आहे. पण फुटपाथवर राहणार्‍या गरिबांचं काय? फुटक्या कौलांच्या झोपडीत दोन वेळचं जेवण शिजणंही कठीण असतं अशा पावसात, त्यांना काय पावसाच्या रोमान्सचं कौतुक? आणि काय पावसात भिजत आईस्क्रीम खायची हौस?  
मला आठवताहेत,ते कॉलेजचे दिवस. आधी मुसळधार नंतर रिपरिपणारा पाऊस येत होता. दोन बाकांच्या कॅन्टीनमध्ये आमचा टवाळखोर ग्रुप शांत बसला होता. कॉलेजमध्ये प्रेमाचा निसर्ग आता कुठं सजत होता. चिखलाला वैतागलेले बरेच होते. भर पावसात भिजलेले थोडेच होते पण पाऊस बघत बसलेले सारेच. त्यातलाच मी पूर्ण भिजलेला. हळूहळू ग्रुप हिरवळीच्या मागे पांगला. मी आणि माझे दोन मित्र कॅन्टीनमध्येच उरलो. नव्या पावसाच्या जुन्याच गप्पा रंगल्या होत्या. नकळतच स्वप्नांची एक भिजरी पायवाट मिळावी तशीच पावसात भिजलेली ती कॅन्टीनमध्ये तिघांनाही एकाच वेळी दिसते. पण कुणाची हे मात्र काही ठरलं नसतं. फुशारकीचा आव आणत एक जण छेड काढतो. दुसरा त्याला पाठिंबा देतो आणि मी या गावचा नाही म्हणून दोघांनाही वाळीत टाकतो. टेबल बदलून पाऊस बघत राहतो. तू-तू मी-मी पावसासारखी पुन्हा जोर धरू लागते. एक श्रोता म्हणून मी माझी भूमिका निभावत असतो. वाफाळता चहा आणि गारव्यात पेटलेला वणवा. वारा जसा कुणाला जुमानत नाही तसेच काहीसं त्यांचं चालू होतं. भर पावसात मनोरंजन माझं होत होतं. बाजूला उभा राहून आता आवरा माझे इशारे होते पण माझे इशारे अजून भांडायला प्रोत्साहन त्यांना वाटत होते. शेवटी कपाळावर हात मारून मी कॅन्टीनबाहेरची वाट धरली. कारण नसताना उगीचच फालतुगिरी केली. वैतागून तीही तिच्या धुंदीत बाहेर पडते आणि माझ्यावर कोसळते. काजवे चमकावेत एकदम तसे मला बेहाल करून सोडते.. ‘सॉरी लागलं का माझं लक्ष नव्हतं’ हसत म्हणत रस्ता धरते. ‘कॅन्टीनमध्ये वापस येऊन पुन्हा आमची तीन कप चहाची ऑर्डर जाते.. 
अन् ती नकळतच पुन्हा वापस येते..
 झालं-गेलं विसरून जा म्हणून सांगते.. 
कपातला चहा कपातच राहत सारंच मग पावसात निवून जातं.पाऊस अडून राहतो.
- पीयूष खांडेकर

Web Title: Close it, only rearrift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.