चंकी हायलायटर्स
By Admin | Updated: April 12, 2017 15:55 IST2017-04-12T15:55:50+5:302017-04-12T15:55:50+5:30
केस कलर करणं आता तसं कॉमन झालं. जमाना हायलायटर्सचा आहे. आणि त्यापुढे जाऊन काहीजण तर पापण्या, भुवयाही रंगवत आहेत.

चंकी हायलायटर्स
- भक्ती सोमण
केस. हा केवढा किचकट विषय. खरंतर पार गॉनकेस असा हा विषय. प्रत्येकाला आपल्या केसांचा पोत, केसांची जाडी, केसांची लांबी, रंग, त्यांचं गळणं याबाबत इतक्या समस्या असतात की डोक्याला केसांचा ताप होतो. त्यात केस पांढरे होऊन अकाली डोक्यावर चांदी पिकायला लागली की मग जाहिरातीत पाहिलेल्या हेअर कलरची याद येतेच.
पूर्वी मेहंदी लावणं हा एकमेव आॅप्शन होता. पण ते लालचुटूक केस अनेकांना नको वाटू लागले. नॅचरल कलर दिसण्याची होड सुरू झाली. आणि त्यातच हेअर कलरच्या जाहिरातीतल्या मॉडेलचे कलर केलेले केस जसे दिसतात तसे आपलेही दिसावेत असं अनेकांना वाटू लागलं. बायकांनाही वाटायला लागलं.
आणि मग घरोघरच्या तरुण जगण्यात हेअर कलर नावाचा प्रकार कॉमन झाला. एकतर पूर्ण केस रंगवले जाऊ लागले नाही तर मग मधल्या मधल्या केसांना कलर करणं म्हणजेच हायलाइट करणं सुरू झालं.
आता सध्या कुठले रंग डोक्यावर चढून बसलेत विचारा?
संपूर्ण केस रंगवायचे असतील तर त्यासाठी ग्लोबल हेअर कलरमधील रंगांचा वापर केला जातो. त्यात मोका, कॉपर, चॉकलेट, बरंगडी अशा काही प्रमुख कलर्सचा वापर करतात. कॉपर आणि निळ्या रंगात केस रंगवण्याचा ट्रेण्ड तर सध्या खूपच वाढला आहे.
केसांच्या मध्यापासून टोकापर्यंत एकाच कलरनं केस रंगवत हायलाइट्स करताना आॅम्ब्रे हेअर कलर (ombre hair), चंकी हायलाइट्स असं काहीबाही करतात. म्हणजे काय तर एका रंगानं किंवा दोन रंगांचा वापर करून ग्रीन, पर्पल, ब्ल्यू, प्लॅटीनम असे रंग वापरून मध्येच केस रंगवले जातात. अशा चमकिल्या रंगांची सध्या समर क्रेझ आहे.
रंगीत केसांच्या तब्येतीला टॉनिक कुठलं?
केस कलर करण्याचा सोस, पण त्यांच्या देखभालीचा आनंद असं नेहमी अनेकांचं होतं. हेअर एक्सपर्ट तुषार चव्हाण सांगतात, हल्ली मुलींनाच नाही तर मुलांनाही केसांवर प्रयोग करायला खूप आवडतं. साधारणत: केस रंगवण्याचा खर्च हा हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान येतो. मुलं खर्च करतातही. पण केस रंगवल्यानंतर ते व्यवस्थित कॅरी करता आले पाहिजेत. ते मेण्टेन करण्यासाठी नियमित शाम्पू आणि कंडिशनर वापरलं पाहिजे. हेअर स्पा, फायबर ट्रीटमेंट घेण्याचा फायदा होतो.
केसांना कलर करणं हे स्टाइल स्टेटमेंट असलं तरी, रंग लावल्यानंतर आपण त्याची व्यवस्थित काळजी घेऊ शकतोय का, या प्रश्नाचं सकारात्मक उत्तर मिळालं तरच केस रंगवणं उत्तम.
पापण्या आणि भुवयांनाही रंग
हल्ली तर पापण्या आणि भुवयाही रंगवल्या जातात. त्यासाठी आय स्ट्रोक हायलाइट्सचा वापर केला जातो. त्यात मुख्यत्वे ब्राऊन कलर वापरला जातो. त्याचप्रमाणे गोल्ड, रेड, मोका, कॉपर, चॉकलेट, ब्राऊन, पर्पल, ब्ल्यू, बरगंडी आणि हिरवा या रंगांचाही वापर केला जातो.
- भक्ती सोमण
(भक्ती लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहे. bhaktisoman@gmail.com)