करिअर, इमेज आणि ब्रॅण्डचा तिढा

By Admin | Updated: March 24, 2016 21:09 IST2016-03-24T21:09:04+5:302016-03-24T21:09:04+5:30

आपण सगळ्यांना ‘ओळखून’ असतो, पण स्वत:ला ओळखतो का? आपले प्लस पॉइण्ट्स कुठले? मायनस पॉइण्ट्स कुठले?

Career, image and brand | करिअर, इमेज आणि ब्रॅण्डचा तिढा

करिअर, इमेज आणि ब्रॅण्डचा तिढा

 - डॉ. श्रुती पानसे 
( लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.) 

drshrutipanse@gmail.com 

आपण सगळ्यांना ‘ओळखून’ असतो,
पण स्वत:ला ओळखतो का?
आपले प्लस पॉइण्ट्स कुठले?
मायनस पॉइण्ट्स कुठले?
याचं मोजमाप कुठं कधी करतो.
आणि जर तेच नसेल,
तर आपण कसा घडवणार
आपला ब्रॅण्ड?
वर्तमानपत्र हा शब्द ऐकला की नजरेसमोर काय येतं?
मोबाइल हा शब्द आला की कोणता आणि कोणत्या कंपनीचा मोबाइल फोन आठवतो?
शाळा-कॉलेजातले आवडते शिक्षक/शिक्षिका असं म्हटल्यावर कोण उभं राहतं डोळ्यांसमोर?
मित्र असा शब्द कोणासाठी आहे तुमच्या मनात? आणि मैत्रीण म्हटलं की कोणाचं चित्र येतं? 
आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देताना बरेच चेहरे तुमच्या डोळ्यासमोर तरळले असतील. आता असेच काही प्रश्न स्वत:ला विचारा !
तुम्ही एक व्यक्ती म्हणून कसे आहात?
असा प्रश्न विचारला की, काय तरळतं डोळ्यासमोर? नक्की काय उमटतं मनात? आपली स्वत:ची कशी प्रतिमा दिसते डोळ्यासमोर?
तुम्ही म्हणाल, काय संबंध याचा नी करिअरच्या निर्णयाचा? काय संबंध कुठला पेपर आवडतो नी कुठला मोबाइल आवडतो याचा नी स्वत:विषयी काय वाटतं याचा?
संबंध आहे आणि करिअरच्या याच टप्प्यावर त्याचं योग्य उत्तर जर तुम्हाला मिळालं तर जे हवं तेच भविष्यात तुम्हाला मिळवता येऊ शकतं !
समजायला सोपं जावं म्हणून आपण उदाहरण घेऊ एखाद्या वर्तमानपत्राचं किंवा मोबाइल कंपनीचं ! वर्षानुवर्षं आपल्या ठरवलेल्या कामात त्यांनी स्वत:ला वाहून घेतलेलं असतं. अनेक चढ-उतार आले तरी कामाशी, गुणवत्तेशी तडजोड केली नाही म्हणूनच ती कंपनी, तिचं नाव स्पर्धेत टिकतं. त्या वस्तूचा उल्लेख होताच आपल्या डोळ्यासमोर म्हणूनच ‘ते विशिष्ट नाव’ आधी येतं. सध्याच्या भाषेत सांगायचं तर हा असतो त्या संस्थेनं तयार केलेला स्वत:चा ब्रॅण्ड !
तोच प्रकार माणसांबद्दलही आहे. 
उदाहरणार्थ मित्र किंवा मैत्रीण म्हटल्यावर जी व्यक्ती नजरेसमोर उभी राहते ती आपल्याला आवडणारी, मदत करणारी, आपल्याला ओळखणारी आणि आपले दोष समजून घेऊन प्रेमाने आपल्याला समजावून सांगणारी अशीच व्यक्ती असते.
आवडते शिक्षक किंवा शिक्षिका हे कायमच उत्साहाने शिकवणारे, सोपं करून सांगणारे, आपल्याला समजून घेणारे, मदत करणारे असेच असतात. त्यांच्या मनात आपल्याविषयी प्रेम असतं. आणि आपल्याला त्यांच्याविषयी अपार आदर असतो. त्यांचे गुण आपल्या मनावर ठसलेले असतात.
आणि कितीही वर्षे लोटली तरी आपलं त्या ब्रॅण्डवरचं प्रेम कमी होत नाही. उलट वाढत जातं ! कारण तो ब्रॅण्ड दिवसेंदिवस आपल्या आयुष्यात स्वत:ची जागा अधिक बळकट करत जातो.
आता नव्या संदर्भात आपल्यालाही आपल्या आयुष्यात स्वत:ची ओळख एखाद्या ब्रॅण्डसारखी उत्तुंग बनवायची असेल तर आधी स्वत:च स्वत:ला ओळखायला हवं ! त्यातून मग आपल्याला आपल्या करिअरची योग्य दिशा सापडू शकेल !
आता पुढचा प्रश्न, कसं ओळखायचं स्वत:ला, कसे आहोत नक्की आपण?

१. तुम्ही कसे आहात?
- हुशार? बुद्धिमान? हजरजबाबी? कलेत रमणारी व्यक्ती? साहसी? पुस्तकी किडा? चमको? बेजबाबदार? पाठांतर करून अभ्यास करणारी व्यक्ती? विसराळू? आत्मविश्वास गमावलेली व्यक्ती? आपल्याला कधीच चांगली संधी येत नाही असं मानणारी व्यक्ती? दुसऱ्याला कायम मदत करणारी व्यक्ती?
सांगा स्वत:ला, लिहा एका कागदावर की आपण नक्की कसे आहोत !

२. आपल्या मनासमोर कशी आहे आपली प्रतिमा? वर उल्लेख केलेल्या अनेक घटकांशिवायही अगदी वेगळेच गुण-दोष तुमच्यात असू शकतात. तेही लिहा.
पण लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्तीत जसे गुण असतात, तसे दोषही असतात. जशा प्रत्येकात काही चांगल्या सवयी असतात, तशाच काही वाईट, कोणालाही कधीच सांगता येणार नाहीत अशा सवयी असतात. त्यामुळे ते गुण-दोषही विनासंकोच लिहून ठेवा.

३.आपल्या करिअरचा, संपूर्ण आयुष्याचा विचार करत असताना एक व्यक्ती म्हणून आधी स्वत:चा विचार करायला हवा. आपल्याला ज्या दोन किंवा तीन क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असेल, त्यात आपले हे गुण किंवा हे दोष तारक ठरतील की मारक? 
- कोणते गुण आपल्याला पुढे नेतील? 
- कोणते दोष आपल्याला मागे खेचतील?
- आपण अशी कोणती कौशल्यं शिकलेलो आहोत, जी आपल्याला या क्षेत्रासाठी उपयोगी आहेत? 
- अशी कोणती कौशल्यं आहेत, जी शिकल्याशिवाय पुढेच जाता येणार नाही?
हे खुलेपणानं लिहा, मान्य करा.

४. असा स्वत:चा अभ्यास केला तर, लेखाच्या सुरुवातीला जे प्रश्न विचारलेले आहेत त्यातली तशा प्रकारची स्वत:ची प्रतिमा तुम्ही ठरवू शकाल?
तसंच, तुम्ही एखादं करिअर निवडण्याचं ठरवल्यावर त्या चिकाटीनं अभ्यास करणारी, उत्साही, मनमिळाऊ, स्वत:ची आणि इतरांची प्रगती करण्यासाठी उत्सुक, नवीन गोष्टी शिकण्याची आवड असलेली व्यक्ती हे गुण अंगी असणं आवश्यकच असतं. यश मिळवायचं तर त्याला पर्याय नाही. 
५. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांनी आपल्याला काय म्हणून ओळखू नये असं तुम्हाला वाटतं, हे स्वत:ला विचारा !
कामचुकार, वेळेची किंमत नसणारी, माणसांची किंमत नसणारी, मिळालेल्या संधीची जाण नसणारी, दिलेल्या कामात हलगर्जीपणा करणारी, मिळालेली संधी फेसबुक/व्हॉट्सअ‍ॅपच्या अतिरेकी प्रेमामुळे गमावणारी, अतिरेकी कंटाळा असणारी, धरसोड करणारी व्यक्ती यापैकी कुठल्याही एका गोष्टीसाठी तुमचं नाव घेता येऊ शकतं का? घेतलं जाऊ शकतं का? - याचा विचार करा! 
जर तसं असेल तर आधी आणि तत्काळ स्वत:ला बदलायला हवं, हे मान्य करा. करिअर निवडीच्या आणि ते घडवण्याच्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर तुम्ही आहात. त्यावेळी या दोषांची संगत सोडून द्या.

६. एवढं जरी केलं तरी तुमची स्वत:ची प्रतिमा किंवा कॉर्पोरेट भाषेत स्वत:चा ब्रँड तुम्हाला कसा हवाय ते कळू शकेल, आणि त्यादिशेनं तो डेव्हलपही करता येईल ! 

 

Web Title: Career, image and brand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.