निर्णयच घेता येत नाही?

By Admin | Updated: July 7, 2016 12:53 IST2016-07-07T12:53:07+5:302016-07-07T12:53:07+5:30

आपल्याला कोणाला तरी जिंकून दाखवायचंच. स्वत:ला सिद्ध करून दाखवायचंय. स्पर्धेतल्या विजेत्याचा मुकुट आपल्या डोक्यावर विराजमान झाला की पुढे आपल्याला खूप सोनेरी संधी मिळतील, अशी आशा आपल्या मनात असते हे खरं

Can not decide? | निर्णयच घेता येत नाही?

निर्णयच घेता येत नाही?

>डॉ. श्रुती पानसे
( लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)
 
प्रचंड कन्फ्यूज आहे, 
काही कळत नाही,
काय करावं सूचत नाही,
निर्णयच घेता येत नाही,
अशी अवस्था अनेकांची होते.
अशावेळी काय करावं?
काय करायचं, हे नेमकं
कसं ठरवायचं?
 
आपलं आयुष्य ही काही एखादी स्पर्धा नसते; कधीच नसते.
आपल्याला कोणाला तरी जिंकून दाखवायचंच. स्वत:ला सिद्ध करून दाखवायचंय.  स्पर्धेतल्या विजेत्याचा मुकुट आपल्या डोक्यावर विराजमान झाला की पुढे आपल्याला खूप सोनेरी संधी मिळतील, अशी आशा आपल्या मनात असते हे खरं. त्यासाठी आपलं सर्वस्व ओतावं लागतं, हेही मान्य. पण म्हणून काही आपलं आयुष्य म्हणजे सतत इतरांशी स्पर्धा नसते.
दुस-याला हरवून पुढं जाण्याची रेस तर नसतेच नसते. आपलं आयुष्य ही अडथळ्याची शर्यतही नसते, ज्यात आपल्याला उर फुटेस्तोवर धावायचंच. एकदा त्या रेशमी फितीला स्पर्श केला की संपलं ! पुढे आपण धडपडलो तरी चालेल. दमून थांबलो तरी चालेल असंही काही नसतं. आपल्याला कितीही वाटत असलं तरीही ती शर्यत नसतेच.
 
मग काय असतं? 
वास्तविक तो एक वळणावळणांचा न संपणारा एक रस्ता असतो. कधी तो छान आल्हाददायक असतो. अगदी सरळ वाट असते. हवा छान असते. या रस्त्यावर अगदी छान माणसं भेटतात. त्यांच्या सहवासात आनंद मिळतो. सुरक्षितता असते. तो रस्ता कधी संपतो कळतही नाही. सगळं छान चाललेलं असलं की वाट लवकर संपली असं वाटतंच. तसंच हे. पण या रस्त्यावरही वळणं असतात. आपल्याला सरळ जे आहे ते स्वच्छ दिसतं. मात्र अनेकदा त्या सुंदर वळणाच्या पलीकडे काय आहे ते दिसत नाही. म्हणून खूप चिंता वाटत राहते. कधी हे वळण घेताना थेट उभी चढण असते. कधी वळणाच्या अलीकडेच एखादा खोल खड्डा. म्हणून ही वळणं ओलांडण्याची भीती वाटते. 
हे जे सारं आपल्या जगण्यात आपल्याही नकळत घडत असतं.
ते आपल्या करिअरच्या, शिक्षणाच्या संदर्भातही होतंच होतं.
शिक्षणाचा, करिअरचा कोणताही निर्णय घेण्याच्या आधी मनात प्रचंड घालमेल होत असते.  कधी कधी आपण त्यालाच कन्फ्युजन म्हणतो.  
‘मला स्वत:ला ओळखता येत नाही’ असं म्हणतो, आयुष्यातला डायलेमा म्हणतो.  संघर्ष म्हणतो. ‘विचारातला गोंधळ संपत नाही’, असं सतत म्हणतो. ‘माङयाच आयुष्यात हे सगळं का?’ असंही उद्वेगाने तक्रार करतो. 
खरं तर या आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी खूपच नैसर्गिक आहेत. आपलं मन जिवंत आहे, जगणं जिवंत आहे म्हणून तर ही कधी वेडी तर कधी वाकडी वळणं आपल्या आयुष्यात आहेत. एकदा का वळण पार केलं की चित्न स्वच्छ दिसतं. निरभ्र दिसतं. अच्छा ! असं घडायचं होतं का आयुष्यात असं मनात येतं. 
पण ते घडत असताना किंवा आपल्याला निर्णय घ्यायचा असताना मात्र अनेकदा डोक्याचा भुगा होतो. कळतच नाही की, आपण जे करतोय ते बरोबर करतोय की चुकीचं करतोय!
आणि मग कळत नाही की, निर्णय घ्यायचा कसा?
निर्णय घ्यायचंच टेन्शन येतं.
मला आलेल्या अनेक मेल्समध्ये मुलं विचारताहेत की, मला डिसिजन घ्यायचंच टेन्शन येतं. तर काय करू?
खरं तर याचं उत्तर एकच, की सारासार विचार करून निर्णय घ्या. मुख्य म्हणजे निर्णय घ्या. स्वत:वर भरवसा ठेवा आणि जो काही निर्णय घ्याल तो डामाडौल न होऊ देता, पुन्हा पुन्हा चाचपून न पाहता तडीस न्यायची जिद्द बाळगा.
त्यासाठी ही तीन सूत्रं लक्षात ठेवा.
तर तुमच्या निर्णयावर तुम्हालाही ठाम राहता येईल.
 
 
1. पूर्वी घेतलेले, योग्य ठरलेले निर्णय
अभ्यास, नेतृत्त्व कौशल्य, आगामी दिशा या संदर्भात आपण अनेक अवघड निर्णय आयुष्यात घेतलेलेच असतात. भरपूर मेहनत करून केव्हा ना केव्हा यश मिळवलेलं असतं. ते निर्णय योग्य होते, आपल्याला जमलं याची खात्नी मनाशी असायला हवी. आपल्याला आपल्या चुका आठवतात; पण आपण स्वत:च केलेल्या अनेक चांगल्या गोष्टी विसरल्या जातात. किंवा त्या तितक्याशा महत्त्वाच्या वाटत नाहीत. मात्न आपले योग्य ठरलेले निर्णय आठवणीत ठेवायला हवेत. एकदा निर्णय घेऊन त्या त्या अडचणीवर मात केली की पुन्हा मागे वळून बघतच नाही आपण ! 
ते बघायलाच हवं !! 
त्यावेळचं टेन्शन आठवलं की वाटतं, या टप्प्यावर अडकायचं, चिंतेत पडायचं, खचायचं कारणच काय होतं?  पण तेव्हा ते कारण, तेव्हा भयानक वाटलेलं ते वळण आपण हिमतीनं पार केलेलं असतं. समोर मोकळा आनंदाचा रस्ता असतो. ‘ते मागचं भयानक वळण आपण आपल्या आत्मविश्वासाच्या, हिंमतीच्या, विश्वासाच्या जोरावर एकटय़ानं आपण पार केलंय’ हे स्वत:ला नुसतं जाणवून देण्याचीच नाही तर चांगलंच ठणकावून सांगण्याची गरज असते. कुठलाही निर्णय घेताना आपल्याला जमेल यावर विश्वास ठेवा.
 
2. नो कन्फ्यूजन
कन्फ्यूजन हे तात्पुरतं असतं. एकाच वेळेला दोन वेगळ्या क्षेत्नांबद्दल आकर्षण वाटू शकतं. दोन्ही करणं शक्य नसतं. किंवा दोन्ही सोडणं शक्य नसतं. अशावेळी त्यातल्या एकात पूर्ण करिअर आणि दुसरं साइड बिझनेस किंवा छंद अशा स्वरूपात जमतं आहे का याच्या शक्यता तपासून बघता येतात. ते जमलं तर आपल्याला दोन्ही गोष्टी करता येतात. मात्र फोकस नेमका हवा, करिअर कशात हे ठरवायला हवं. ‘आपण सारखेच कन्फ्यूज्ड असतो.’ असं ज्यांना वाटतं, त्यांनी हे समजून घ्यायला हवं की  यातूनच आपली वाट सापडणार आहे. 
 
3. लाँग टर्म निर्णय घ्या.
आयुष्य ही स्पर्धा किंवा शर्यत नाही की एकदा जिंकली किंवा हरली आणि संपलं सगळं असं आयुष्यात होत नाही. इथे सतत पुढचा रस्ता आहे. तो रस्ता कधीच थांबणारा नाही. म्हणूनच निर्णय घेताना शॉर्ट टर्म निर्णय नकोत. लॉँग टर्म निर्णय घ्यायला हवेत. तात्पुरते निर्णय घेऊ नका. आपल्यासाठी पाच वर्षानंतर काय महत्त्वाचं, योग्य ठरेल याचा सारासार विचार करून निर्णय घ्या.
 
 
 

Web Title: Can not decide?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.