फुलपाखरी सम्मिलन

By अोंकार करंबेळकर | Published: February 21, 2018 06:25 PM2018-02-21T18:25:36+5:302018-02-22T08:45:08+5:30

त्याला फुलपाखरांचं वेड, त्यातून त्यानं एक अनोखं बटरफ्लाय पार्क सुरू केलं आहे. 

Butterfly Sammelan | फुलपाखरी सम्मिलन

फुलपाखरी सम्मिलन

Next

ओंकार करंबेळकर

वन्यजीव, वाईल्ड लाइफ असं म्हटलं की काय येतं डोळ्यासमोर?
वाघ, बिबट्या आणि साप, दुर्मीळ प्राणी. त्यांच्यासाठी काम करणं वगैरे?
मात्र तसं नसतं. जंगलातल्या अनेक प्राण्यापक्ष्यांसह कीटकांवरही जिवापाड प्रेम करणारे लोक असतात. त्यातलाच हा एक.
कर्नाटकाच्या नैऋत्य टोकाला असलेल्या मंगळुरुला निसर्गाच मोठं वरदान लाभलंय. याच निसर्गसमृद्ध मंगळुरु जिल्ह्याच्या बेळावी गावामध्ये सम्मिलन शेट्टी मोठा झाला. लहानपणापासून झाडांवर चढणं, गावाजवळच्या जंगलात भटकणं सुरू झालं. घरापेक्षा जंगलात भटकणं त्याला जास्त आवडू लागलं. प्राणी-पक्ष्यांकडे तासन्तास पाहात राहाणं, त्यांच्या हालचालींचं निरीक्षण करणं त्याला आवडायचं. भातावर, शेताच्या बांधावर उड्या मारत फिरणं, पक्ष्यांची घरटी पाहणं, ओढ्यातल्या पाण्यात मासे पकडणं हे त्याचे छंद. पण या सगळ्यात त्याला सर्वात जास्त आवडली ती फुलपाखरं. झाडावेलींवर, इकडेतिकडे उडणाºया या फुलपाखरांनी त्याचं लक्ष वेधून घेतलं. रंगबिरंगी पाखरांचं आयुष्य असतं तरी कसं, ते कशावर जगतात, त्यांचं पुनरुत्पादन याबद्दल त्याच्या मनात कुतूहल निर्माण झालं. आयझॅक किहिमकर यांचं द बुक आॅफ इंडियन बटरफ्लाइज नावाचं पुस्तक त्यानं वाचलं. आजूबाजूच्या फुलपाखरांना पाहून त्यांची माहिती पुस्तकातून मिळवायला सुरुवात केली. प्राणीशास्त्र शिकवणारे त्याचे प्राध्यापक अशोक सीएच त्याच्या मदतीला होतेच. मुडबिद्रीच्या अल्वाज कॉलेजात प्राणीशास्त्र शिकताना अशोक सरांनी त्याला प्रोजेक्टचा विषय स्थानिक फुलपाखरांचा अभ्यास असा दिला. त्यामुळे त्याच्या निसर्गनिरीक्षणाला एक दिशा मिळाली.
तो राहातो त्या परिसरामध्ये दाट झाडी असल्यामुळे फुलांच्या मौसमामध्ये फुलपाखरंही मोठ्या प्रमाणात यायची. सदर्न बर्डर्विंग, मलबार बँडेड पिकॉकसारखी फुलपाखरं त्याला पुष्कळवेळा दिसायची. मग दिसलेल्या प्रत्येक फुलपाखराचा फोटो काढायचा, त्याची नोंद घ्यायची आणि किहिमकरांच्या पुस्तकात त्याचं वर्णन वाचायचं असा डॉक्युमेण्टेशनच त्याचा परिपाठ सुरू झाला. हे सगळं चालू असताना त्यानं पर्यटन विषयात एमबीएचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यानंतर एका कॉलेजात तो हॉटेल मॅनेजमेंट शिकवू लागला; पण या नोकरीपेक्षा आपलं मन फुलपाखरांच्या मागेच धावतंय हे पहिल्या दोन वर्षांमध्येच त्याच्या लक्षात आलं. सरळ नोकरी सोडून फुलपाखरांसाठी बटरफ्लाय पार्क सुरू करण्याचा त्यानं निर्णय घेतला.
फुलपाखरांचं आयुष्य, अंडी, अळी, कोश आणि पूर्ण विकसित झालेल्या पंखांचं पाखरू अशा अनेक टप्प्यांचं असतं. या सगळ्या टप्प्यांचा अभ्यास त्यानं सुरू केला. एखाद्या झाडाच्या खोडावर किंवा पानांवर फुलपाखरं अंडी घालतात. आजूबाजूची फुलं, फळं, खोडांतून स्रवणारा डिंक, मृत जनावरं, प्राणी-पक्ष्यांची विष्ठा, चिखल यांच्या आधारावर ती आपलं पोट भरतात. सम्मिलन म्हणतो, सोडियम मिळवण्यासाठी फुलपाखरं मनुष्याच्या घामाच्या शोधातसुद्धा येतात.
हळूहळू त्याचं सम्मिलन शेट्टीज बटरफ्लाय पार्क आकारालं आलं. त्याच्या पार्कमध्ये फुलपाखरं येऊ लागली. आजूबाजूच्या परिसरामधील लहान मुलं, शाळांच्या सहली आणि इतर उत्सुक लोकांनी त्याच्या पार्कमध्ये हजेरी लावली.
सम्मिलन म्हणतो, निसर्गातला कोणताही घटक पिंजºयामध्ये ठेवणं योग्य नाही. निसर्गात जशी फुलपाखरं पाहायला मिळतात तशीच येथेही पाहायला मिळतात, त्यांच्या जीवनचक्राचं निरीक्षणही लोकांना करायला मिळतं. बटरफ्लाय पार्कमध्ये येणाºया प्रत्येक व्यक्तीला फुलपाखरांचं निसर्गात असणारं स्थान, त्यांचं महत्त्व, त्यांचं जीवन याची माहिती दिली जाते.


* भारतामध्ये फुलपाखरांच्या १२०० जाती आढळतात.
* त्यातील ३३९ जाती पश्चिम घाटामध्ये आढळतात.
* सम्मिलनचं बटरफ्लाय पार्क कर्नाटकातलं पहिलं खासगी बटरफ्लाय पार्क ठरलं आहे.
* ब्लू नवाब, अ‍ॅबेरंट ओकब्लू, बँडेड रॉयल, तमिल ओकब्लू आणि आॅर्किड टीट सारखी दुर्मीळ फुलपाखरं या पार्कमध्ये आहेत.
* मलबार बँडेड पीकॉक, मलबार रोज, तमिल लेसविंग, सदर्न बर्डविंगसारख्या फुलपाखरांच्या धोक्यात आलेल्या प्रजातीही येथे आढळल्या आहेत.

( ओंकार लोकमत ऑनलाइनमध्ये उपसंपादक आहे.)

Web Title: Butterfly Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.