- अभिजित पानसे
आयपीएल म्हणजे गोलंदाजांसाठी स्मशानभूमी असते. बॅट्समन फ्रेण्डली खेळपट्टय़ांप्रमाणेच बॅट्समन फ्रेण्डली नियमांमुळे बॉलर हे फक्त बॉलिंग मशीन म्हणून वापरण्यात येत आहे अशी स्थिती भासते. त्यातही यावर्षी आयपीएल जेव्हा यूएईमध्ये भरवण्यात येत आहे तेव्हा वाळवंटातील खेळपट्टय़ा वेगवान बॉलरला मुळीच मदत करणार नाही, इथे स्पीन बॉलरचा बोलबाला असेल हे क्रि केट तज्ज्ञांनी वर्तवलं होतं. जे खरंसुद्धा आहे. पण चार दिवसांपूर्वी रविवारी जे झालं ते अद्भुत होतं. एकाच दिवशी तीन सुपर ओव्हर्स झाल्या. त्या दिवशी दोन सुपर ओव्हर्समध्ये वेगवान बॉलरनं जी कामगिरी केली ती अफाट होती. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट ही की ते दोन्ही वेगवान बॉलर्स भारतीय आहेत.जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या दोघांनी जो खेळ दाखवला ती आहे बॉलिंगची ताकद. आणि टेस्टमध्ये टिच्चून केलेल्या बॉलिंगच्या कौशल्याची कमाल.भारतीय क्रि केट इतिहासातील बुमराह हा सर्वोत्तम वेगवान बॉलर आहे असं सोशल मीडियावर म्हटलं जातंच. जे खरंही आहे.पण मोहम्मद शमी, योग्य यॉर्कर टाकणं हे वेगवान बॉलरसाठी अत्यंत कठीण काम असतं. यॉर्करसाठी प्रचंड शिस्त, सराव लागतो. संपूर्ण शरीराचा त्यात सहभाग असतो. बहुतेकवेळा कठीण आणि नाजूक परिस्थितीमध्ये यॉर्कर टाकताना तो फूलटॉस पडतो, तर क्वचित बीमर होतो. दोन्ही गोष्टी बॉलरला मारक ठरतात; पण फक्त पाच धावा वाचवताना सहाही बॉल्स मोहम्मद शमीनं अचूक यॉर्कर टाकले. त्यानंतर पुढचा इतिहास आता सर्वज्ञात आहे.त्या दिवशी सामना कोणत्या टीमनं जिंकला हे महत्त्वाचं नसून दोन भारतीय वेगवान बॉलर्सने जो बॉलिंगचा शो केला तो अद्भुत होता.
( अभिजित ब्लॉगर आहे.)