व्हॉट्सअॅप ग्रुपच्या कोंडाळ्यापलिकडे जग आहे की नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 07:00 IST2019-12-26T07:00:00+5:302019-12-26T07:00:04+5:30
आपापल्या ग्रुप्सच्या भिंती तोडून पसार होण्याचे प्रयत्न

व्हॉट्सअॅप ग्रुपच्या कोंडाळ्यापलिकडे जग आहे की नाही?
प्राची पाठक
‘आमचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप आहे’ हे आजकाल हातात स्मार्ट मोबाइल असलेल्या प्रत्येक माणसाचं म्हणणं असतं. त्यातल्या व्हॉट्सअॅपमध्ये सटासट इकडचे तिकडचे फॉर्वर्ड्स ढकल, वेगवेगळे प्रोफाईल फोटो लाव, स्टेट्स बदल असे उद्योग लोक आवडीने करत असतात.
त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे माझा मेसेज किती वेळाने पाहिला आणि त्या मेसेजला किती वेळाने उत्तर दिलं किंवा नाही दिलं. समोरच्याचं ‘लास्ट सीन’ सारखं अपडेट होत राहतं. वेगवेगळी स्टेट्स पडत राहतात. प्रोफाईल फोटो बदलत राहतात. परंतु, आपल्याला उत्तर दिलं नाही म्हणजे काय? असा उगाचच एकतर्फी असा भुंगा डोक्यात सुरू राहतो. आपल्याला ज्यांच्यात जावंसं वाटत असतं आणि ज्यांना आपण त्यांच्यात आलेलं हवं असतो इतक्याच मर्यादित सर्कलमध्ये हा सगळा राग-लोभ-असूया-प्रेम-मैत्री वगैरेचा खेळ सुरू असतो. त्यात कोणी काही भारी फोटो शेअर केले की आपण त्याहून भारी काही शेअर करायची एक नकळत सुरू झालेली स्पर्धाही त्रास देत असते. सतत आपल्या आणि आपल्याच डबक्यातल्या इतरांच्या ‘सेल्फी मोड’मध्ये तरंगत राहायचं !
काय करता येईल?
- तर यातून जरा ब्रेक घेऊ. आपल्याच आजूबाजूच्या माणसांमध्ये सतत रमण्यात काय पॉइंट? त्यातले अनेक तर आपण ‘समविचारी’ म्हणून जमा केलेली कोंडाळी-घोळके होऊन गेलेले असतात. आपण जाऊ की जरा कोंडाळ्याच्या पलीकडे. भिन्न विचार समजून घेऊ. भिन्न आचार समजून घेऊ. ते आपल्याला कितपत पचतं आहे, झेपतं आहे, ते समजून घेऊ. झेपलं नाही तरी किमान ‘असंही काही असतं’ हे तरी आपल्याला जाणवेल !
साधं कॉलेजच्या एखाद्या ट्रीपला जायचं असेल, तरी आपण आपल्याच ग्रुपमध्ये फिरत असतो. अनेक पोरं पोरी वॉशरूमला जाण्यासाठीसुद्धा कोणालातरी सोबत घेऊन जातात. एकटय़ाने कुठे फिरायची कायम भीती असते मनात.
मी, माझे मित्रमैत्रिणी आणि माझा ग्रुप यांच्यापलीकडेदेखील फार सुंदर जग असू शकतं, हे आपल्याला कधी कळणार? कॉलेजमध्ये काही ग्रुप अॅक्टिव्हिटी दिली तरी आपण आपल्याच सख्ख्या मित्र-मैत्रिणींसोबत जोडी करतो. निवडा की नवीन पार्टनर्स तिथे. पण नाही ! आपलेच समविचारी, आपलेच आवडते मित्र-मैत्रिणी आपल्याला सतत हवे असतात.
त्यामुळे होतं असं की, त्यापलीकडे काही चांगले लोक असतात, ते आपल्याला कळतच नाही. आपल्या धर्माच्या, जातीच्या, गावाच्या, देशाच्या, आवडीच्या आणि विचारांच्या कोंडाळ्याबाहेर किमान एक तरी मित्र आणि एक तरी मैत्रीण आपल्याला जोडता येतेय का, ते बघू. जगातल्या प्रत्येक खंडातला एक मित्र जोडू. त्यांचं विश्व समजून घेऊ. त्यांच्या घरी जाऊन बघू. त्यांच्या सोबत जेवण करून बघू. त्यांच्या आईवडिलांच्या भावविश्वात रमता येतंय का, त्यांचं जगणं समजून घेता येतंय का, ते ट्राय करू. आपल्या घरी एकदम वेगळ्या आर्थिक-सामाजिक-भौगोलिक परिस्थितीतल्या मित्रमैत्रिणीला आणून बघू. त्यांच्या दृष्टीने आपलं जग कसं दिसतं ते समजून घेता येतंय का, ते पाहू !
त्याने काय होईल?
1. सुरुवातीला जरा भीती वाटेल. हळूहळू आपल्यापेक्षा वेगळ्या लोकांशी बोलायची सवय होईल.
2. आपलाही आत्मविश्वास वाढेल. संवादकौशल्य वाढेल.
3. ‘अमुक लोक नां तसेच’, अशी ठाम सर्टिफिकेट्स वाटण्यापूर्वी एक संवेदनशील मन आपल्या आत त्या त्या लोकांबद्दल तयार झालेलं असेल.
4. आपल्याकडून मैत्रीत जे होईल, तेच त्यांच्यासाठीदेखील होईल. त्यांनाही ‘हे लोक असलेच !’ असं बोलण्यापूर्वी एक वेगळं आणि छान उदाहरण आपल्या रूपाने समोर दिसेल.
5. ‘सोशल फॅब्रिक’ वगैरे मोठाल्या गप्पा आपल्या स्वतर्च्या आयुष्यात एका छोटय़ाश्या मैत्रीतून साध्य होतील !
6. - आणि मुख्य म्हणजे, आपण स्वतर् त्याच त्या कोंडाळ्याच्या भिंती ओलांडून बाहेर पडू शकू !