भाऊबीज गेटटुगेदर दिवसाचं रूटीन एकच.
By Admin | Updated: November 5, 2015 21:44 IST2015-11-05T21:44:37+5:302015-11-05T21:44:37+5:30
खाणंपिणं-भटकणं-पत्ते-गप्पा आणि नाश्त्याला उरसुर चिवडा घालून खायची मिसळ. हा लहानपणाचा निवांतपणा जगायचा म्हणून तर येते

भाऊबीज गेटटुगेदर दिवसाचं रूटीन एकच.
- निकिता पाटील
गप्पा.जेवणं.गप्पा
खाणंपिणं-भटकणं-पत्ते-गप्पा
आणि नाश्त्याला उरसुर चिवडा घालून
खायची मिसळ.
हा लहानपणाचा निवांतपणा
जगायचा म्हणून तर येते
दरवर्षी दिवाळी
ॅदिवाळीत भेटतोहेस ना?
भाऊबीज गेटटुगेदर?
त्या दिवशी रात्री पत्त्यांचा डाव टाकू?
आणि कुणीतरी तेवढी उरसुर चिवडा मिसळ तेवढी प्लॅन करा दुस:या दिवशी सकाळी?
बाकी काही नको!
-हे असे मेसेज आत्ताच व्हॉट्सअॅपच्या ‘फॅमिली ग्रुप्स’मधे फिरायला लागलेत.
एरव्ही खरं तर व्हॉट्सअॅपवरचे फॅमिली ग्रुप ‘टच’मधे राहू म्हणत तयार होतात.
पहिले दोनतीन दिवस खूप बकबक होते. मग थंडावतात. मग कुठूनतरी एखादा फॉरवर्ड एखाददुसरा मारतो किंवा मग गाडीबिडी घेतली, परीक्षेत पहिला-दुसरा, आजारपण एवढय़ापुरताच तो ग्रुप उरतो!
पण दिवाळीचं तसं नाही!
यंदा तर दस:यानंतरच दिवाळीचं फॅमिली गेटटुगेदरचं प्लॅनिंग अनेक ग्रुप्सने करून टाकलंय.
एरव्ही पाटर्य़ा, गेटटुगेदर, रियुनियन हे सारं आता कुणालाच नवीन राहिलेलं नाही.
पण लहानपणी आजोळी किंवा मामा-मावशीच्या घरी साज:या केलेल्या दिवाळीची, त्यातल्या मजेची सर पुन्हा याद करायची. पुन्हा तेच गप्पांचे फड रंगवायचे. पत्ते कुटायचे आणि चहावर चहा मारत सकाळी नाश्त्याला मिसळ नाहीतर मग भजी-थालीपीठं मारायची.
दिवसभर गप्पा. जेवणं. गप्पा. खाणंपिणं-भटकणं-पत्ते-
हा सारा कार्यक्रम दोन-तीन दिवस सलग चालू ठेवायचा.
असे एकेकाळचे दिवस होते.
आता तरुण होता होता तो निवांतपणा तर मागेच पडला.
पण निदान दिवाळीच्या भाऊबिजेच्या दिवशी किंवा त्यानंतरच्या रविवारी तरी पुन्हा भेटायचं असं प्लॅनिंग आता व्हॉट्सअॅपवर होऊ लागलंय.
कारण त्या गेटटुगेदरची आणि हसून हसून जागवलेल्या रात्रींची सर कशालाही एरव्ही येत नाही..
त्यासा:याची मजा फक्त दिवाळीतच..
मग आतेमामे-मावसमामे-चुलतचुलत- सख्खेचुलत भावंड आणि बहिणी भेटतात.
पुन्हा नव्यानं लहान होतात.
एकमेकांच्या खोडय़ा काढतात.
लहानपणीच्या नावानं चिडवतात.
चिडतात.
हसतात.
आणि आपलं सारं बालपण पुन्हा जगून घेतात.
वर्षभरासाठी.
व्हॉट्सअॅपनं हरवलेली ही नाती पुन्हा वेगळ्या अर्थानं जवळ आणायला सुरुवात केली आहे.
थोडीशी धुसफूस, दुरावलेले संबंध, न बोलल्यानं आलेला दुरावा, हरवलेलं शेअरिंग. पद आणि शिक्षणानं बदललेली परिस्थिती. कामाचं प्रेशर, मित्रंचा गोतावळा. हे सारं तर प्रत्येकाच्या भोवती असतं. प्रत्येकजणच त्यात आपापलं समाधान शोधत ‘रेस’ लावल्यागत पळतो.
त्यात कुटुंब विस्तारतं.
मित्र आणि सहकारी जास्त जवळ येतात.
रोजच्या जगण्याचा भाग होतात.
पण मग ही नाती?
ती तर का लांब रहावीत?
आणि जवळ आली की तुझं-माझं करत का काचावीत?
ती काचू नयेत, म्हणून तर ही भाऊबीज गेटटुगेदर हवीत.
त्यानं मनं जवळ येतात.
येऊ शकतात, असं तरी वाटू लागतं.
म्हणूनच तर यंदाही अनेकजणांनी आपल्या बिझी शेडय़ुलमधून एक दिवस या भाऊबीज गेटटुगेदरसाठी काढायचं ठरवलंय!
मनापासून!
स्वत:साठी, स्वत:चं बालपण जगायचं ठरवलंय!