बिर्याणी आणि बल्ला
By Admin | Updated: March 31, 2016 14:49 IST2016-03-31T14:49:56+5:302016-03-31T14:49:56+5:30
क्रिकेट खेळणं मुलींचं काम नाही, असे शेरे मारणा-यांना चोख उत्तर द्यायच्या तयारीत असलेल्या महिला क्रिकेटच्या बदलत्या क्रिझवर!

बिर्याणी आणि बल्ला
>भारतीय ‘पुरुष’ क्रिकेट संघानं पाकिस्तान ‘पुरुष’ क्रिकेट संघाचा पराभव केला, त्याच दिवशीची गोष्ट.
पाकिस्तान ‘महिला’ क्रिकेट संघानं भारतीय ‘महिला’ संघाला मात दिली.
ती बातमी आपल्याकडच्या आनंदोत्सवात काही कुणी फार मनावर घेतली नसली, तरी तिकडे पाकिस्तानात मात्र पाकिस्तान महिला क्रिकेट टीमची कॅप्टन सना मीर हिचं मात्र भरपूर कौतुक झालं.
भारताविरुद्ध जिंकल्यावर कसं वाटतंय, असं पत्रकारांनी विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘..आता आफ्रिदीच्या हातची बिर्याणी खायची फार इच्छा आहे!’’
या उत्तराचा अर्थ काय?
कारण या विश्वचषकापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाचा कॅप्टन असलेल्या आफ्रिदीला पत्रकारांनी विचारलं होतं की, महिला टीमविषयी तुझं काय मत आहे?
‘औरते बिर्याणी अच्छी बनाती है!’ - असं उपरोधिक उत्तर त्यानं दिलं होतं. म्हणजे काय तर क्रिकेट हे काही बायकांचं काम नाही, त्यांनी स्वयंपाकपाणी करावं, कुठं आमची बरोबरी करता?
मात्र त्याच सनाच्या संघानं जेव्हा भारतीय महिला संघाला मात दिली तेव्हा आफ्रिदीच्या संघ मात्र धोनीच्या संघापुढे लोटांगण घालून मोकळा झाला होता!
महिला क्रिकेटला कमी लेखण्याची ही मानसिकता फक्त काय सीमापारच्या आफ्रिदीच्या देशातच नाही तर आपल्याहीकडे हीच भावना आहे?
महिला क्रिकेट ही क्रिकेटची भातुकली आहे असं म्हणत त्याला हेटाळणारे नी हसणारे आपल्याकडेही कमी नाहीत!
ना महिला क्रिकेटला ग्लॅमर आहे, ना त्याचं कुणाला काही कौतुक? आत्तार्पयत महिला संघाची कॅप्टन मिताली राजचं नावही कुणाला माहिती नव्हतं.
पण आता वारं बदलतंय.
शर्टपॅण्ट घालून मुलींनी उन्हातान्हात क्रिकेट खेळणं हेच अनेकांना आपल्याकडे उटपटांग वाटतं. बेलनवाल्या हातात गेंदबल्ला कशाला? असं विचारून मुलींना नाजूकसाजूकच खेळ खेळा, पुरुषी क्रिकेटचा रांगडा बाज मुलींना जमणारा नाही, अशीच एक धारणा.
मात्र बडय़ा शहरातल्या नाही, तर छोटय़ा शहरातल्या मुलींनी ही धारणा मोडीत काढली आणि उन्हातान्हात मुलांच्या बरोबरीनं क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
टीका, विरोध होतोच आहे; पण त्याला न जुमानता क्रिकेटचं आपलं पॅशन या मुलींनी जगायला सुरुवात केली.
दरम्यान, महिला क्रिकेट असोसिएशनची वेगळी चूक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयमध्ये दशकभरापूर्वी विलीन करण्यात आली. आता आंतरराष्ट्रीय नियमांनुसार महिला क्रिकेटलाही प्रोफेशनली प्रोत्साहन देणं सुरू झालं आहे. आंतरराष्ट्रीय सामने नियमित खेळवणं सुरू झालंय. त्यातून निदान राष्ट्रीय महिला संघाकडे उत्तम पैसा, चांगल्या सुविधा, उत्तम प्रशिक्षण हे सारं येऊ लागलं आहे.
परिणाम म्हणून महिला क्रिकेटचं वारंही हळूहळूु बदलतं आहे.
स्पॉन्सर्स येऊ घातले आहेत. आणि खेडय़ापाडय़ातले आईबापही आपल्या मुलींच्या हाती असलेली बॅट आता खेळती राहील इतपत सपोर्ट करू लागलेत.
या बदलत्या क्रिकेटचे दोन चेहरे असलेल्या,
आणि राष्ट्रीय संघात खेळणा:या दोन मुली.
कोल्हापूरची अनुजा पाटील आणि सांगलीची स्मृती मानधना.
छोटय़ा शहरातून निळ्या जर्सीर्पयत झालेला त्यांचा प्रवास या अंकात..
बदलत्या महिला क्रिकेटची एक आशादायी झलक.
- ऑक्सिजन टीम