मणिपूरचा बिद्या
By Admin | Updated: June 13, 2014 09:57 IST2014-06-13T09:57:03+5:302014-06-13T09:57:03+5:30
बार्सिलोनाच्या प्रशिक्षकांना चकित करणारा एक १६ वर्षाचा भारतीय मुलगा,त्याच्या पायातली फुटबॉलची जादू वेगळीच आहे.

मणिपूरचा बिद्या
>बिद्यानंद सिंग. त्याचे मित्र त्याला ‘होंडा’ म्हणतात. कोण तो?
आपल्या देशातला आजच्या घडीचा सगळ्यात टॅलेण्टेड फुटबॉल प्लेअर ही खरं तर त्याची ओळख. पण केवळ फुटबॉलच्या जगापुरती र्मयादित. आपल्या क्रिकेटवेड्या देशात मुळातच इतर खेळांतल्या खेळाडूंची ओळख होणं अवघड. त्यात बिद्यानंद सिंग तर देशाच्या एका कोपर्यातला. तो कोपरा ‘इंडिया’वाल्यांना एरवीही तसा अनोळखीच.
तर अशा अनोळखी मणिपुरातल्या ‘मोईरांग’ गावचा हा बिद्यानंद. लोकताक सरोवरासाठी प्रसिद्ध असलेलं हे गाव, लोकताक हे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे. पण निसर्गाचं वरदान असलं तरी हा भाग सतत अशांत. सतत अतिरेकी कारवाया आणि सैन्याच्या चकमकीनं वेढलेला. कायम अशांत. शिक्षणापासून अन्य पायाभूत सुविधांचा सतत अभाव. तर अशा गावातला हा मुलगा.
वडील आसाम रायफल्समधून नवृत्त झालेले तर आईच्या घराला लागूनच एक छोटंसं वाणसामानाचं दुकान चालवते.
मणिपुरातली तमाम पोरं फुटबॉलवेडी. तेच वेड बिद्यानंदच्याही पायात. दगडगोट्यांच्या मैदानावर, धुळीचे लोळ उठवत बिद्या जीव तोडून फुटबॉल खेळायचा.
पण खेळणं वेगळं, जगणं वेगळं. खेळायचं प्रशिक्षण नव्हतंच. मात्र बिद्याच्या सुदैवानं त्याला ‘साई’च्या प्रशिक्षकांनी वेळीच हेरलं आणि साईच्या क्रीडा संकुलात त्याचं प्रशिक्षण सुरू झालं. त्याच्या आईवडिलांनी त्याला या प्रशिक्षणासाठी जाण्याचा निर्णय चटकन घेतला. खेळाविषयी घनघोर प्रेम असल्यामुळे त्यांनी मुलाला पाठवलं असं नव्हे तर राहण्याखाण्याची फुकट सोय हा त्यातला सोपा भाग. बिद्या सांगतो, ‘खेळायला पाठवलं म्हणजे काय तर, माझ्या खाण्यापिण्याची काळजी मिटली, त्यात बूट-कपडे बाकी सामानसुमान सगळ्याचीच सोय. घरचे म्हणाले जा, एवढंच.’
अर्थात सुरुवात जरी अशी झाली असली तरी बिद्यानंदने आपली जादू दाखवायला सुरुवात केली. त्याच्या पायातली कमाल पाहून त्याचं सिलेक्शन मुंबईतल्या प्रशिक्षणासाठी झालं. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनतर्फे मुंबईत सुरू असलेल्या अकादमीत बिद्यानंद येऊन पोहचला. तिथे कोच साजिद दार त्याला भेटले. त्यांच्या प्रशिक्षणाने बिद्याचा खेळ बहरला आणि डिफेन्सिव्ह मिडफिल्डर म्हणून बिद्यानंद खेळू लागला.
अलीकडेच दोहा येथे झालेल्या आशियाई फुटबॉल कॅम्पसाठी त्याची इतर चार खेळाडूंबरोबर निवड झाली होती. तिथे बार्सिलोनातून प्रशिक्षक आले होते. आणि आशियातून ५0 खेळाडू त्यांच्या प्रशिक्षणाचा लाभ घेत होते.
आणि तिथं बिद्याला त्याचा सहकारी मिलन बासुमटरीबरोबर दोहाच्या अत्यंत प्रतिष्ठित अँस्पायर अकॅडमीच्या ऑल स्टार टीमबरोबर खेळण्याची संधी मिळाली. त्याच मॅचमध्ये संघासाठी ओपनिंग गोल त्यानंच केला. त्याचा संघ ३-१ ने जिंकलाही.
याच कॅम्पमध्ये मुलं त्याला ‘होंडा’ म्हणू लागले. एकतर तर त्याच्या नावाचा उच्चार अनेकांना जमत नव्हता. आणि दुसरं म्हणजे ब्राझीलच्या नेयमारचा पुरता दिवाना असलेल्या बिद्याने स्वत:चा लूकही त्याच्यासारखाच बनवून घेतलाय. नेयमारसारखा तो खेळतोही मिडफिल्डर म्हणूनच आणि त्यानं आपले केसही नेयमारसारखेच रंगवून घेतले आहे.
विशेष म्हणजे याच कॅम्पमध्ये एशियातून आलेल्या ५0 फुटबॉलर्समधून त्याची प्रशिक्षकांनी ‘मोस्ट व्हॅल्युबल प्लेअर’ म्हणून निवड केली.
उत्तम संधी अशीच मिळत राहिली तर काय सांगावं, आज जेमतेम १६ वर्षांचा असलेला बिद्यानंद भविष्यात युरोपातल्या एखाद्या नामांकित क्लबकडून खेळताना दिसायचा.
त्याचा खेळ पाहिला तर आज तशी आशा तरी आहेच.