सुरुवात दणक्यात, भविष्यात स्कोप मोठ्ठा!
By Admin | Updated: July 14, 2016 23:08 IST2016-07-14T23:08:42+5:302016-07-14T23:08:42+5:30
वेब सिरिज हा प्रकार हिंदीत खूप लोकप्रिय आहे. आज ती एक स्वतंत्र इंडस्ट्री आहे. त्याचा पसारही पुष्कळ मोठा होतो आहे कारण हिंदीतल्या वेब सिरिजना

सुरुवात दणक्यात, भविष्यात स्कोप मोठ्ठा!
>- अमेय वाघ
(अभिनेता आणि वेब सिरिज निर्माता)
वेब सिरिज हा प्रकार हिंदीत खूप लोकप्रिय आहे. आज ती एक स्वतंत्र इंडस्ट्री आहे. त्याचा पसारही पुष्कळ मोठा होतो आहे कारण हिंदीतल्या वेब सिरिजना उत्तम प्रेक्षक मिळतो आहे. सगळा प्रेक्षक प्रामुख्याने तरु ण आहे. असा प्रेक्षक ज्याचं लक्ष टीव्हीकडे अजिबात नाहीये. ज्याला टीव्हीवरच्या सिरिअल्स बघायला आवडत नाही किंवा तो त्यांच्याशी रिलेट करू शकत नाही. त्यांना एक उत्तम पर्याय वेब सिरिजने दिला आहे. मराठीतही असा चाळिशीच्या आतला पुष्कळ मोठा प्रेक्षक आहे, त्याला टीव्हीवरच्या मालिकांसाठी पर्याय हवा आहे. दिल दोस्ती दुनियादारी नंतर मराठी तरुण वर्ग वेगळ्या प्रयोगांकडे वळतो हे लक्षात आलं आणि याच मोठय़ा प्रेक्षक वर्गासाठी काहीतरी नावीन्यपूर्ण आणि त्यांना आवडेल असं केलं पाहिजे यातून कास्टिंग काउचची कल्पना विकसित झाली आहे. भारतीय डिजिटल पार्टीच्या अंतर्गत आम्ही ज्या वेब सिरियल्स बनवतोय. त्या बनवण्याआधी या आधुनिक माध्यमाचा पुरेसा विचार केला गेला होता. काय करावं, कसं करावं, कधी या वेब सिरियल्स पब्लिश कराव्यात या सगळ्याचा सविस्तर विचार, अभ्यास करून मगच सुरु वात केली आहे.
मला वाटतं, मराठी प्रेक्षक खूप प्रगल्भ आहे. त्यांना दर्जेदार निर्मिती आवडतात. मग ते नाटक असो, सिनेमा असो, टीव्हीवरच्या मालिका असोत किंवा आताच्या वेब सिरियल्स असोत. म्हणूनच कास्टिंग काउच करताना आम्ही वेब सिरिज करतोय म्हणून लो बजेट करायची असा कुठलाही विचार केलेला नाही. दर्जा सांभाळण्यासाठी आवश्यक ते सारं तंत्रज्ञान यासाठी वापरण्यात आलं आहे. पटकन उरकून टाकूया हा विचारच नाहीये.
सगळ्यात सकारात्मक गोष्ट ही आहे की, जगभरात वेब सिरिज प्रचंड लोकप्रिय होत आहेत. या माध्यमाला भाषेचं बंधन नाही. तुम्ही इंटरनेटवर जाऊन तुमच्या आवडीच्या कोणत्याही वेब सिरिअल्स सहज बघू शकता.
अर्थात, अर्थकारण अजून तसं किफायतशीर नाहीये. सुरुवात तर खिशातूनच झाली आहे. पण ती दणक्यात झाली आहे हे महत्त्वाचं.