Be careful! Corona causes mental illness, awareness is the key. | सावधान ! कोरोनामुळे येतेय मानसिक आजारांची साथ

सावधान ! कोरोनामुळे येतेय मानसिक आजारांची साथ

ठळक मुद्देशरीराची जितकी काळजी आपण घेतो, तितकंच मनाचीदेखील साद ऐकायला शिकलं पाहिजे.

- प्राची पाठक

लॉकडाउन. आपण सर्व जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ घरात बसून आहोत. 
घराबाहेर पडलं तर कोरोना व्हायरस आपल्याला गाठेल, अशी आपल्याला भीती आहे. 
कोरोना व्हायरसची लक्षणं काय, तो कुठे किती वेळ जिवंत राहातो, वगैरे सर्व माहिती एव्हाना आपण तमाम बातम्यांमधून, फॉरवर्ड्समधून लक्षात घेतली आहे. 
कोरोना व्हायरसची शरीराला लागण झाल्यावर सुरुवातीची काय काय लक्षणं असतात, वेळीच सावध झालं नाही तर काय होतं, लक्षणं नसताना काय होतं, हे सगळं आपण आपल्यावर येऊन कोसळणाऱ्या  माहितीच्या धबधब्यातून वेचून ठेवलेलं आहे. दिवस-दिवस आपण कोरोनाबद्दल माहिती करून घेण्यात, कुठे किती प्रसार झाला, किती दगावले, त्यातून एक अनामिक भीती आपल्या मनात बसली आहे. 

पुढे काय होईल? हे सगळं कधी संपेल? आपल्या पुढच्या शिक्षणाचं, नोकरीचं काय? आपल्याला पुरेसे पैसे मिळतील का? आपण निरोगी राहू का? असे अनेक प्रश्न कळत नकळत बॅकग्राउण्ड म्युङिाकसारखे आपल्या विचारांमध्ये सुरू असतात. त्यांची उत्तरं आपल्याला आज माहीत नाहीत. त्याची वेगळी अस्वस्थतादेखील मनात असते. 

हे प्रश्न आपल्या मनाला हैराण करत असताना शरीराच्या काळजीसोबतच आपल्या मनाच्या आरोग्याचं काय? हे मात्न आपण विसरून जातो. त्यात काही मानसिकविकार, आजार डोकं वर काढायचं वय म्हणजे 
तारुण्य. म्हणजे एकीकडे बाहेरून हल्ला करू शकणारा व्हायरस आणि दुसरीकडे आपल्याला आतून पोखरून टाकणारी काळजी. त्या काळजीला सर्व पोषक वातावरण तयार करून देणारे आपले मनाचे आरोग्य. या केमिकल लोच्यातल्या काही गोष्टी आपल्या हातात असतात. जे आपल्या हातात नाहीये, ते सोडून देऊ. 

आपल्या हातात काय आहे? 
1. आपल्या हातात आहे आपली विचारांना दिशा देण्याची पद्धत. आपली सकारात्मक राहण्याची सवय. सदा रडे बनून काहीच होत नसतं, आपण जिथे असतो, तिथेच आणखीन वाईट परिस्थितीत पडतो, हे समजून घ्यायची इच्छा. या सर्वातून बदलणारं आपलं वागणं. 
2. एखाद्या गोष्टीकडे आपण कसे बघतो, ती नजर. आपण आपल्या आरोग्याची किती काळजी घेतो, नेमकं काय, कसं, किती खातो-पितो हेही मुद्दे यात महत्त्वाचे आहेत. 

कोरोनानंतर मानसिक आजारांची लाट?
कोरोना महामारीच्या काळात आणि ती ओसरल्यावर जगभरात मानसिक आजारांची प्रचंड मोठी साथ येणार आहे, 
असं जगभर कळकळीने सांगितलं जात आहे. 
एरव्ही आपण सोशल डिस्टन्स पाळू, मास्क लावू, अनेकदा हात धुऊ, बाहेर जाणं टाळू, यातून साथीच्या रोगापासून स्वत:चं संरक्षण करू; पण मग मनाचं काय?
मनाची काळजी कशी घेणार? ही महामारी आपल्या मनाला तर आजारी करणार नाही?

तसं होऊ नये म्हणून काय करायचं?

* पहिलं म्हणजे आपल्याला मनातलं बोलायला शिकावं लागेल. ते नेमकं  बोलणं जमणं काही आपोआप येत नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
* एरव्हीदेखील आपण अनेक लहानसहान गोष्टींसाठी मनात कुढत असतो. त्या बोलून दाखवत नाही. मग मनाची दुखणी, त्यातील कमजोरी बोलून दाखवणं तर आणखीन दूरच. 
* कोणासमोर रडू आलं तरी त्यात कमीपणा मानणारे आपण. रडणं म्हणजे कमीपणा नाही, हे स्वत:ला सांगावं लागेल.
* पुन्हा, पुरुषांनी तर रडायचंच नाही, असले विचित्न मर्दानगी प्रकार मनात असलेले आपण. ते सोडावं लागेल.
* मनातलं मनात सगळं दाबून ठेवायची सवय सहजी जाणार नाहीच. त्यावर आपल्याला काम करावं लागेल. 
* आपल्या मनातली खळबळ, अस्वस्थता, चिंता योग्य व्यक्तीकडे, योग्यप्रकारे आणि योग्यवेळी बोलायची सवय करावी लागेल. 
* एरव्हीसुद्धा केवळ हायùù हॅलोùù पुरते आपले मित्न-मैत्रिणी न ठेवता त्यांच्याशी एक चांगला बॉण्ड आपल्याला विकसित करावा लागेल. जेणोकरून एकमेकांच्या मनातली घुसमट वेळच्यावेळी आपण समजून घेऊ शकू. 
* सकाळी उठलं की कोणत्याही अनोळखी लोकांना आपण गुड मॉर्निग वगैरे मेसेजेस ढकलत बसतो फोनमधून. तेच आपल्या घरातल्या लोकांसाठी कितीवेळा करतो आपण? त्यांच्याशी आपल्याला आपल्या मनातलं का बोलता येत नाही? त्यांना आपलं कळणारच नाही, इथूनच त्यांच्याशी दुरावा बाळगायला चालू करतो आपण. म्हणून सगळ्या जगाशी मैत्नी करायला जातो. घरातले लोक ही एक समस्या म्हणून न बघता आधार म्हणून बघता येतात का आपल्याला?  
घरातल्या लोकांशी कितीदा प्रेमानं बोलतो? कितीदा त्यांचं काही ऐकून घेतो? ते आपल्याला कटकट असल्यासारखे का वाटतात? या सर्व गोष्टींवर शांतपणो ठरवून विचार करू. 
* आपण डोळसपणो आपल्या मनाकडे बघायला शिकू.
*  मनातले विचार मांडण्यासाठी योग्य व्यक्ती कोण, तिच्याशी काय, किती बोलायचं, हे आपल्याला कळायला लागेल. 
* आपल्या आजूबाजूला आनंदी, आरोग्यपूर्ण वातावरण असेल तर आपसूकच सर्व लोक एकमेकांची काळजी घ्यायला शिकतील. 
* दूरवरच्या कोणात आभासी भावनिक आधार शोधण्यापेक्षा आपल्या जवळपासच तो आधार आपल्याला मिळवता येईल हे पहायला हवं.
आपल्या मनाच्या लहान-मोठय़ा कुरबुरी गायब होऊन जातील. हरएक दिवस एक नवीन आव्हान घ्यावं, आपलं आयुष्य नीट सांभाळावं अशी मनाची उभारी येईल..
म्हणूनच शरीराची जितकी काळजी आपण घेतो, तितकंच मनाचीदेखील साद ऐकायला शिकलं पाहिजे. सुरु वात करायला हीच उत्तम संधी आहे..


( प्राची मानसशास्नसह पर्यावरण आणि सूक्ष्मजीवशास्नची अभ्यासक आहे.)
 

Web Title: Be careful! Corona causes mental illness, awareness is the key.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.