जगभरातली सात सर्वोच्च शिखरं सर करायला निघालाय सोलापूरचा आनंद
By Admin | Updated: July 24, 2014 18:35 IST2014-07-24T18:35:29+5:302014-07-24T18:35:29+5:30
देशाच्या सीमा ओलांडून सगळ्या मानवजातीचंच प्रतिनिधित्व करताना कसं वाटतं? ‘ऑक्सिजन’नं आनंदला फेसबुकद्वारे मेसेज पाठवला होता.

जगभरातली सात सर्वोच्च शिखरं सर करायला निघालाय सोलापूरचा आनंद
>देशाच्या सीमा ओलांडून सगळ्या मानवजातीचंच प्रतिनिधित्व करताना कसं वाटतं?
‘ऑक्सिजन’नं आनंदला फेसबुकद्वारे मेसेज पाठवला होता. त्यादिवशी तो जगातील सात सर्वोच्च शिखरांपैकी एक असलेले रशियातील माउंट एल्ब्रूस हे शिखर सर करण्याच्या तयारीच्या अंतिम टप्प्यात होता. त्या धावपळीत त्यानं ‘ऑक्सिजन’ला फोन केला म्हणाला, ‘मी सध्या १४ हजार फूट उंचीवर आहे. खरं सांगतो, बाकी सारं तर आहेच पण हे गिर्यारोहण वर्तमानातच नाही, तर आपण जगतोय त्या क्षणातच जगायला शिकवते. आपण जगून घ्यावं, पुढचं माहिती नाही या मनस्थितीपर्यंत आपण आपोआप पोहचतो.’
दुसर्याच दिवशी त्यानं रशियातलं माउंट एल्ब्रूस हे शिखर सर केलं. जगातली सात सर्वोच्च शिखरं सर करायचे ही त्याची महत्वकांक्षा आहे. त्यासाठी स्वत:च सारी तयारी करत तो मोहिमा आखतोय. आधी त्यानं माऊण्ट एव्हरेस्ट सर केलं, आता हे दुसरं शिखर. हरियाणाचा रामलाल शर्माही त्याच्यासोबत या मोहिमेत सहभाग झाला होता.
शिखर सर केलं की भारताचं राष्ट्रगीत तिथं वाजवायचं हा आनंदचा ध्यास आहे.
अशा प्रकारच्या जागतिक गिर्यारोहण मोहिमा आखणं ही सोपी गोष्ट नाहीच; नुस्ती अभिमानाचीही गोष्ट नाही. तर ती गोष्ट आहे ती कष्टाची, जिद्दीची, अपार शारीरिक मेहनतीची आणि पॅशनची. गिर्यारोहण हे आनंद बनसोडेचं पॅशन आहे.
तो म्हणतो, ‘या गिर्यारोहणाच्या स्वप्नासाठी, पहाडांनी मारलेल्या हाकांसाठी मी खूप कष्ट घेतले आहेत. या प्रवासानं नुस्तं मला प्रसिद्धी आणि आनंदच नाही दिला तर खूप काही शिकवलंही. आपण निसर्गाच्या अचाट रूपाच्या अगदी जवळ जातो. जेव्हा मानवी जगण्याचं खुजेपण पाहतो, मृत्यूच्या अनेकदा जवळ जाऊन परत येतो त्यावेळी आपल्याला कळतं की जगणं नेमकं कसं असतं, याक्षणी जगणं किती महत्त्वाचं, पुढचा क्षण असा काही नसतोच. या धाडसी मोहिमांनी मला हेच शिकवलं की, जगून घे. आनंदी रहा. उगीच रडत बसू नकोस, चालत रहा.’
हीच प्रेरणा घेऊन सध्या आनंद एका मोठय़ा मोहिमेत नवनवे विक्रम करायला निघाला आहे.
त्यानं रशियातलं सर्वोच्च शिखर सर केलं आणि तो पुढच्या मोहिमेची तयारी करतोय. अफ्रिकेतल्या किल मांजरो शिखर त्याला आता हाका मारतंय.
- चन्नवीर मठ