8 days, 7 hours, 38 minutes .. 3600 kilometers .. 17 year old Om Mahajan's thrill on a bicycle! | ८ दिवस, ७ तास, ३८ मिनिटे.. ३६०० किलोमीटर.. १७ वर्षीय  ओम महाजनांचा सायकलवरचा थरार!

८ दिवस, ७ तास, ३८ मिनिटे.. ३६०० किलोमीटर.. १७ वर्षीय  ओम महाजनांचा सायकलवरचा थरार!

-समीर मराठे 

अजून त्याचं नाव मतदार यादीतही नोंदलं गेलेलं नाही. वयाची अठरा वर्षंही त्यानं पूर्ण केलेली नाहीत, पुढच्या महिन्यात तो त्याचा अठरावा वाढदिवस साजरा करेल, पण त्याआधीच भल्यभल्यांना न जमणारा विक्रम त्यानं स्वत:च्या नावावर केलाय. चक्क गिनेस बुक वर्ल्ड रेकॉर्ड त्यांन केलंय.त्याचं नाव ओम हितेंद्र महाजन. नाशिकचा. 

काय केलं त्यानं असं?

काश्मीर ते कन्याकुमारी (के टू के) ही मोहीम त्यानं केवळं आठ दिवस, सात तास आणि ३८ मिनिटांत पूर्ण करत गिनेस रेकॉर्ड केलंय. त्याचबरोबर‘रेकॉर्ड वर्ल्ड अल्ट्रा सायकलिंग असोसिएशनचा (डब्ल्यूयूसीए) विक्रमही त्यानं स्वत:च्या नावावर केलाय.

ओमच्या घरातच स्पोर्ट‌्सचं वातावरण. त्याचे वडील हितेंद्र आणि काका महेंद्र यांनी अमेरिकेत घेतली जाणारी जगातील सर्वात अवघड आणि जवळपास ४८०० किलोमीटरची ‘रेस अक्रॉस अमेरिका’ (रॅम) ही सायकल शर्यत जिंकलेली आहे. याशिवाय देशाची चारही महानगरं जोडणारी गोल्डन क्वाड्रिलॅटरल ही मोहीम पूर्ण केली आहे. भूतानमधली एक दिवसाची जगातली सर्वांत कठीण ‘टूर ऑफ द ड्रॅगन (डेथ रेस’) ही स्पर्धा, तर गेल्या वर्षीच ‘सी टू स्काय’ मिशन फत्ते केलं आहे. मुंबई ते काठमांडू पर्यंत सायकलिंग, त्यानंतर ट्रेकिंग आणि त्यानंतर एव्हरेस्टपर्यंत माऊण्टेनिअिरंग अशी ही मोहीम होती. जगात केवळ महाजन बंधुंनीच अशा प्रकारची खडतर मोहीम पूर्ण केलेली आहे. याच घरातला ओम हा तरुण मुलगा. तोही सायकलिस्ट आहे. पाचवीत असल्यापासून ते आत्ता (लॉकडाऊनचा काळ वगळता) कॉलेजलाही तो सायकलनंच जातो. ओमलाही सायकलिंगची आवड असली, तरी आजपर्यंत तो खेळलाय, त्या फक्त छोट्या अंतराच्या सायकल शर्यती. आजपर्यंत वीस ते चाळीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या शर्यती तो खेळलेला नाही. अर्थातच त्यात राष्ट्रीय पातळीपर्यंत त्यानं मजल मारलेली आहे.

‘के टू के’ मोहिमेत जागतिक विक्रम केल्यानंतर ओमची गाठ घेतली.

त्याला विचारलं, लाँग डिस्टन्स, एण्ड्युरन्स सायकलिंगचा आजवर कुठलाही अनुभव नसताना थेट काश्मीर ते कन्याकुमारी सायकलिंगचा आणि त्यातही विक्रम करण्याचा विचार तुझ्या डोक्यात कसा आला?

ओम सांगतो, त्याची मुख्य तीन कारणं. 

पहिलं कारण म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी (के टू के) हा गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड आधी ओमच्या काकांच्या म्हणजे महेंद्र महाजन यांच्या नावावर होता. २०१८ मध्ये दहा दिवस, दहा तासांत त्यांनी हा विक्रम केला होता. नाशिकमध्ये काही काळ राहिलेल्या आणि नाशिकमध्येच सायकलिंगची जास्त आवड लागलेल्या लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू यांनी काही महिन्यातच हा विक्रम मोडताना आठ दिवस, नऊ तास आणि ४८ मिनिटांचा नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला. 

ओम सांगतो, आपल्या घरातला विक्रम आपल्या घरातच राहिला पाहिजे ही माझी जिद्द होती. त्यामुळे ‘के टू के’ ही मोहीम सर्वाधिक कमी वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार मी केला. 

दुसरी गोष्ट म्हणजे गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं आकर्षण कोणाला नसतं? माझ्याही मनात ते जागृत झालं. घरातला विक्रम घरात परत आणण्याचं तेही एक कारण होतं. (खरं तर आपला स्वत:चा विक्रम मोडण्याची प्रेरणा डाॅ. महेंद्र आणि हितेंद्र महाजन यांनीच भारत पन्नू यांना दिली होती!)

तिसरी गोष्ट म्हणजे तरुणांमध्ये सायकलिंग आणि हेल्थची आवड निर्माण व्हावी हे माझं ध्येय आहे. सायकल चालवणं नु्सतचं ‘कुल’ नाही, तर ते फॅशनेबलही आहे, हे मला तरुणांच्या मनावर बिंबवायचं आहे. त्यामुळेच माझ्या या माहिमेचं ब्रिदवाक्यही होतं, ‘बी कूल, पेडल टू स्कूल’ !...

के टू के’मोहिमेचा जागतिक विक्रम करण्यासाठी ओमला किती काळ लागला? किती दिवस त्यानं सराव केला?

मुळात त्याला खेळायची होती ती ‘रॅम’ ही सायकल स्पर्धा. हा विचार डोक्यात आला तोच मुळात सहा महिन्यांपूर्वी.

सराव सुरू झाला. एकाच वेळी तीस-चाळीस किलोमीटरच्या वर सायकलिंग न करणाऱ्या ओमनं आता दीर्घ पल्ल्याच्या सायकलिंगच्या प्रॅक्टिसला सुरुवात केली. आधी रोज दोन तास, नंतर तीन-चार तास, त्यानंतर आठवड्याला तब्बल चाळीस तासांपर्यंत तो प्रॅक्टिस करू लागला. 

एण्ड्युरन्स सायकलिंगमध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त वेळ सायकलवर बसण्याचा सराव करणं. अशा प्रकारच्या दीर्घ काळ सायकलिंगमुळे ‘सॅडल सोअर’ होतो, इतका की जांघेत घासले गेल्यामुळे जखमा होतात, बसताही येत नाही, तासन‌्तास एकाच पोझिशनमध्ये सायकलवर बसल्यामुळे पाठ दुखायला लागते. हाता-पायाच्या बोटांचं सेन्सेशन (नम्बनेस) काही काळ कमी होतं. त्यासाठी जास्तीत जास्त सराव हाच प्रमुख उपाय असतो. कमीत कमी वेळात ते जितकं करता येईल तितकं सारं ओमनं केलं. 

खरं तर ओमनं सराव सुरू केला होता, तो अमेरिकेतील ‘रॅम’ या स्पर्धेसाठी. त्यासाठी आधी सहाशे किलोमीटरची पात्रता स्पर्धा वेळेत पूर्ण करावी लागते. मात्र पॅनडेमिकमुळे ही पात्रता स्पधार् कॅन्सल झाली आणि ओमनं ‘के टू के’चा गांभीयार्नं विचार करायला सुरुवात केली. याच आठवड्यात विक्रमी वेळेत काश्मीर ते कन्याकुमारी हे ३६०० किलोमीटरचं अंतर त्यानं विक्रमी वेळेत पूर्ण केलं. पण हे आव्हान खरंच सोपं नव्हतं. 

हाडं गोठवणारी थंडी, कडाक्याचं ऊन आणि अंग फोडून काढणारा पाऊस या साऱ्या गोष्टींचा सामना ओमला करावा लागला. बऱ्याचदा खडबडीत रस्त्यावरच झाडाच्या आडोशाला, थोड्या सावलीत सतरंजी टाकून अर्ध्या-एक तासाची विश्रांती घ्यावी लागली. ओमनं सुरुवात केली ती श्रीनगरपासून. तेव्हा तापमान होतं शून्य ते दोन अंश. 

रोड वाइडनिंगचं काम सुरू होतं. सगळीकडे खड्डे, माती पसरलेली होती. अनेक ठिकाणी रस्ते बंद होते. त्यामुळे बऱ्याचदा थांबावं लागलं. तेवढा किंमती वेळ वाया गेला. जवाहर घाटात ओम पाेहोचला तेव्हा, तो सायकलवर पुढे निघाला, पण त्याच्याबरोबरच्या सपोर्ट कारला मात्र पोलिसांनी थांबवलं. पुढची सपोर्ट कार होती ती उधमपूरजवळ. थेट दोनशे किलोमीटर पुढे. या काळात सारा प्रवास ओमला सपोर्ट कारविनाच करावा लागला. कारण तुमच्या खाण्यापिण्यापासून ते तुम्हाला रस्ता दाखवण्यापर्यंत या साऱ्या गोष्टी या सपोटॅ काद्वारेच केल्या जातात. पण हे दोनशे किलोमीटरचं अंतर ओमला कुठल्याही सहाय्याशिवाय पार करावं लागलं. शिवाय मधे दोन वेळा सायकल पंक्चर झाली, स्वत:च ते पंक्चर काढावं लागलं. 

ओम सांगतो, चॅलेंज खूप टफ होतं. दिवसरात्र सायकल चालवायची होती. रोज जवळपास सरासरी ४७५ किलोमीटर अंतर पार करायचं होतं. झोपणं, थांबणं, आराम करणं, अशी लक्झरी परवडणारी नव्हती. रोज सुमारे २२ तास अथक सायकल मी चालवत होतो. रोज दोन तासांपेक्षा जास्त वेळ झोप, आराम किंवा इतर गोष्टींसाठी मिळत नव्हता. थांबायचं ते फक्त ब्रश करण्यासाठी आणि नैसर्गिक विधिंसाठी. बाकी खाणं, पिणं, नाष्टा सगळं सायकलवरच.. या सगळ्या प्रवासात सायकलपटूपेक्षाही क्रू मेंबर्सचं काम खूप महत्त्वाचं असतं. कारण त्यांच्या भरवशावरच सायकलपटू हा प्रवास करीत असतो. 

या क्रू मेंबर्सनी विविध मदत करण्यापासून ते ओमला झोप येऊ नये यासाठी प्रयत्न केले. त्या्साठी कोणी रस्त्यावर नाचत होतं, कोणी रस्त्यावर डिप्स मारत होतं, त्याची झोप उडावी म्हणून कोणी त्याच्या डोळ्यांत मधूनच प्रकाशझोत सोडत होता तर कोणी त्याच्या कानात अचानक कर्णा वाजवत होता..

ओम सांगतो, शेवटची दोन रात्रं तर माझ्यासाठी खूपच कठीण होती. मोहीम सोडून द्यावी, असेही विचार मनात येऊन गेले. 

अनंतरपूर ते बंगलोर हा सगळा चढ होता. खूप थकलेलो होतो. त्यात थंडी, उलट दिशेनं वारा, सायकल चालवून चालवून कंटाळा आलेला. झोप अनावर झालेली. त्यात बऱ्याचदा डुलक्या घेतच सायकल चालवत होतो. अपघात होण्याची शक्यता होती. रस्त्यावर ट्रॅफिक प्रचंड होती, डुलक्या घेतांना डिव्हायडरवर आपटायची शक्यता होती. त्यात थकव्यामुळे मला वेगवेगळे भास व्हायला लागले. माझ्याबरोबर आणखी इतर जणही सायकल चालवताहेत असं वाटायला लागलं. शेवटी क्रू मेंबर्सनी मला थोडा वेळ झोपू देण्याचा निर्णय घेतला. 

तासाभरानंतर मला उठवलं, पण मी उठण्याच्या स्थितीत नव्हतो. शेवटी मला अजून दोन तास झोपू दिलं.

पण वेळ वाया गेला होता. त्यानंतरच आव्हान आणखी कठीण झालं होतं. आता शेवटचे २८० किलोमीटर राहिले होते. ताशी किमान २७ किलोमीटर वेगानं मला सायकल चालवायची होती, पण थोडी विश्रांती झाल्यामुळे आणि आव्हान आटोक्यात दिसायला लागल्यामुळे मीही पेटलो. अचानक माझ्यात ऊर्जा आली. माझी नेहेमीची शॉर्ट डिस्टन्सची टाइम ट्रायलच मी खेळतोय या जिद्दीनं ताशी ३५ ते ४० किलोमीटर वेगानं मी सायकल चालवायला सुरुवात केली. स्वत:ला पुश अप केलं. शेवटचे ८० किलोमीटर तर मी जवळपास दोन तासातच पूर्ण केले. ही मोहीम आठ दिवस नऊ तासात पूर्ण करण्याचं ध्येय मी समोर ठेवलं होतं, पण ते बरंच आधी म्हणजे आठ दिवस सात तास आणि ३८ मिनिटांत पूर्ण झालं होतं. घेतलेलं आव्हान मी पूर्ण केलं होतं. घरातला जागतिक विक्रम घरातच ठेवायचं स्वप्न पूर्ण झालं होतं, ३६००  किलोमीटर अंतर फास्टेस्ट पूर्ण करण्याचं गिनेस रेकॉर्ड आता माझ्या नावावर होणार होतं,.. पण शेवटच्या त्या काही तासात माझ्यापुढे केवळ एकच स्वप्न होतं, ते म्हणजे लवकरात लवकर कन्याकुमारीचा ठरलेला पॉइंट गाठायचा आणि जागा मिळेल तिथे आडवं पडायचं, झोपून घ्यायचं... 

-------------------------------------------------------------------

टीममधील क्रू मेंबर्स

मितेन ठक्कर (मुख्य कोच), डॉ. महेंद्र महाजन, डॉ. नितीन रौंदळ, मिलिंद वाळेकर, सागर बोंदार्डे, पूर्वांश लखानी, बलभीम कांबळे, डॉ. अंजना महाजन, कबीर राचुरे, राहुल भांड आणि डॉ. हितेंद्र महाजन

 

(लेखक लोकमत वृत्तसमुहात उपवृत्तसंपादक आहेत.)

sameer.marathe@lokmat.com

 

Web Title: 8 days, 7 hours, 38 minutes .. 3600 kilometers .. 17 year old Om Mahajan's thrill on a bicycle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.