६ प्रश्न ज्यांची उत्तरं सोपी नाहीत
By Admin | Updated: March 17, 2016 21:44 IST2016-03-17T21:44:17+5:302016-03-17T21:44:17+5:30
आपल्याला हवं तेच आणि तेवढंच इतरांना दाखवून अपेक्षित प्रतिक्रि या मिळवता येतात, जे खऱ्या आयुष्यात करता येणं शक्य नसतं

६ प्रश्न ज्यांची उत्तरं सोपी नाहीत
- डॉ. श्रुती पानसे ( लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.) drshrutipanse@gmail.com
ज्यांची उत्तरं सोपी नाहीत! कशात करिअर करायचं, हा निर्णय तुम्ही कसा करणार? त्यासाठी स्वत:च स्वत:ला काही प्रश्न विचारून त्यांची खरीखुरी उत्तरं द्यायला हवीत.. करिअरचा निर्णय हा आयुष्यातला महत्त्वाचा निर्णय असतो. याबाबतीत ‘चलता है’, ‘पुढे बघूया’ अशी वृत्ती ठेवली तर कदाचित हातातला खूप महत्त्वाचा वेळ वाया जाण्याची शक्यता असते. करिअरचा निर्णय आपला असतो आणि त्याचे चांगले किंवा वाईट परिणामदेखील आपल्याच वाट्याला येणार असतात. त्यासाठी आपल्यातली विश्लेषण क्षमता विकसित व्हायला हवी. ही क्षमता विकसित झाली की जास्तीत जास्त अचूक निर्णयापर्यंत जाता येतं. त्यासाठी अशा प्रकारचे सहा महत्त्वाचे प्रश्न आपण स्वत:ला विचारले पाहिजेत. तुम्ही करिअर कोणतंही निवडा, या सहा प्रश्नांपैकी जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं द्या. विशेषत: सहाव्या प्रश्नाचं नीट, तार्किक उत्तर असलंच पाहिजे. मनासारखं आणि नीट पटणारं उत्तर मिळालं तर या मार्गावरून पुढे जा. पण या प्रश्नांची नीट उत्तरं मिळाली नाहीत आणि असलेली उत्तरं पटत नसतील तर थोडं थांबा. पुन्हा एकदा विचार करण्याची, तपासून बघण्याची गरज आहे, असं समजा. १. काय? अनेक गोष्टी आसपास आहेत. त्या सगळ्या आपल्यासाठी नाहीत. त्यातली योग्य गोष्ट आपल्यासाठी निवडून घ्यायची आहे. ती काय? त्या योग्य गोष्टीकडे जाण्यासाठी आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे, हा तो प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर द्या. त्यातून तुम्हाला वस्तुस्थितीची जाणीव होईल. २. कधी? काय करायचं आहे हे ठरल्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कधी? जे काही करायचं आहे ते नक्की कधी करायचं आहे, याचा एक अंदाज घेणं आवश्यक असतं. ‘जे काही करायचं आहे ते आत्ताच’ असं बऱ्याचदा या प्रश्नाचं उत्तर असतं. ३. कुठे? एखाद्या कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा असेल तर ‘कुठे’ हा प्रश्न येणारच आहे. काही कोर्सेस हे अनेक ठिकाणी शिकवले जातात. मात्र सर्व बाजूंनी विचार करून हा निर्णय घ्या. ज्यांनी तुमच्या आधी याच पद्धतीचा कोर्स केला आहे, त्यांना विचारून हा निर्णय घेणं सोपं जाईल. ४. किती? आपल्याला एखादा कोर्स किती काळासाठी करायचा आहे, किती वेळ द्यावा लागणार आहे आणि तितका वेळ देऊन त्याचं अपेक्षित फळ आपल्याला मिळणार आहे ना हे बघा. काही जण ग्रॅज्युएशननंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी थांबतात. अशावेळी त्यांच्या मित्रांना प्लेसमेंट मिळून जाते. मात्र यांना थोडा काळ थांबण्याचं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याचं फळही मिळतं. त्यामुळे कधी हा निर्णय आपला. ५. कसं? जो कोर्स आपण निवडला आहे, तो कसा करायचा? तर पूर्ण मन लावून. जीव ओतून करायचा. ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ असं होऊ नये. म्हणून ज्या दोन किंवा तीन गोष्टी करत असाल त्या चांगल्या पद्धतीने पार पाडा. कसं? हा प्रश्न वस्तुस्थितीच्या खोलात शिरण्यासाठी फार आवश्यक आहे. वरवरची माहिती किंवा नुसतेच दाखवायला सिर्टिफिकेट तितकंसं महत्त्वाचं नाही. ६. का? या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी पहिल्या प्रश्नांपैकी जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं मिळणं आवश्यक आहे. आपण जे काही करतोय ते नक्की का करतोय, हे आपल्या मनाशी पक्कं असायला हवं. तरच इतरांच्या प्रश्नांना उत्तरं देता येतील. तसंच, आपल्याला ठाम राहण्यासाठीही ‘का?’चं योग्य उत्तर मिळवायला हवं. ज्या क्षेत्रात आपल्याला जायचं आहे, तिथे का जायचं आहे, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. पैसे चांगले मिळतील, काम कमी असतं, सुट्या जास्त असतात, परदेशी जाण्याची संधी आहे किंवा याउलट आपल्या राहत्या गावातच हा व्यवसाय आहे, अशी काहीही कारणं असू शकतात. तसंच, हे काम खूप आवडतं, याच क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे, तशी संधीही आहे, आणि म्हणून करिअर करायचं आहे अशी विचारपूर्वक उत्तरंही असू शकतात.