समर जॉबचे 6 फायदे

By admin | Published: April 30, 2015 05:25 PM2015-04-30T17:25:15+5:302015-04-30T17:25:15+5:30

पैसे तर इतके कमी मिळतात की, चार दोस्तांची एकवेळची पार्टी होणार नाही! त्यात ऑफिसवाले काय वाट्टेल ती कामं सांगतात, अगदी शिपायाला सांगावीत ती कामंही सांगतात.. मग उपयोग काय, त्या समर जॉबचा! करायची कशाला ती क्षुल्लक कामं? आपल्याला काही रिस्पेक्ट आहे की नाही?

6 benefits of summer job | समर जॉबचे 6 फायदे

समर जॉबचे 6 फायदे

Next
 
करायचे कशासाठी समर जॉब? 
 
कॉलेजमध्ये असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत माझी डय़ुटी कंपलसरी माझ्या भावाच्या दुकानामध्ये असायची. तेथे येणारे गि-हाईक, त्यांच्या वेगवेगळ्या त-हा, भाव करण्याची त्यांची प्रवृत्ती आणि लकब आणि माझ्या भावाची रिअॅक्शन हे न्याहाळत हळूहळू मी स्वत:ही कपडे विकायला सुरुवात केली. गि-हाईकांसोबत कसं वागायचं, त्याचा इगो कसा ओळखायचा आणि जास्तीतजास्त गि-हाईकांचा फायदा करून देतो, अशी जाणीव करून देत आपलं प्रोडक्ट कसं विकायचं, हे सर्व मला शिकता आलं, ते त्या दुकानात! म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत!
कदाचित आजच्या भाषेत सांगायचं तर तो एकप्रकारचा समर जॉबच होता. ‘सेल्स’चं ट्रेनिंग देणारा! 
त्यानंतर मॅनेजमेण्टचं शिक्षण सुरू झालं! 1995-1997 चा तो काळ. नाशिकमधील सातपूर आणि अंबड इंडस्ट्रीयल भागांमध्ये मी आणि माङो तीन मित्र हातात बॉयोडाटा  आणि कॉलेजचं शिफारसपत्र घेऊन खूप फिरलो. कुणीतरी काम द्यावं, थोडा अनुभव मिळावा, म्हणून एक धडपड!
ती समर इंटर्नशिप ही फक्त नावापुरती न करता त्यात काहीतरी शिकण्याचा आमचा उद्देश होता. पैसे कमावणं हा भाग फार महत्त्वाचा नव्हता, काम शिकायचं होतं. अनेकजण उन्हाळ्याच्या सुट्टीत दोन महिने काय करायचं, त्यापेक्षा चारपैसे कमवावे, या उद्देशानं पैशांपुरती इंटर्नशिप करतात; पण ही समर इण्टर्नशिप किंवा समर जॉब  निव्वळ पॉकेटमनी मिळवणं, हाच उद्देश असला तर मग आपल्याला काहीतरी शिकण्याचा फोकसच राहत नाही.
आजही आठतंय, त्याकाळी आम्ही कंपनीच्या गेटसमोर जायचो, तेव्हा विद्यार्थ्यांना आत प्रवेश मिळायचा नाही. आमचा पहिला संवाद व्हायचा तो सिक्युरिटी गार्डसोबत. त्याला कन्व्हिन्स करून, आम्ही आत एण्ट्री करायचो. आपल्या बोलण्यावर भरवसा ठेवून कुणीतरी आपल्याला फाटकाच्या आत सोडतो हे जाणवायचं तेव्हा जिंकल्याचा आनंद मिळायचा. त्यावेळेस फोन कमीच होते, मोबाइल तर नव्हतेच,  त्यामुळे फोनवरून अपॉइण्टमेण्ट घेऊन जाणं ब:याचदा जमायचं नाही. मॅनेजमेण्टमध्ये शिकलेल्या ब-याच टॅक्ट मग आम्ही अशावेळेस उपयोगात आणायचो. आणि हे सारं करताना या समर इण्टर्नशिपचा बराच फायदा झाला. 
त्यामुळे समर इण्टर्नशिप किंवा समर जॉब जेव्हा आपण करतो, तेव्हा तो का करायचा, कशासाठी करायचा, हे आपलं आपल्याला माहिती पाहिजे!
चार पैसे त्यातून मिळाले तर वाईट नाही, पण त्याहून बरंच मोठं काही या टप्प्यात सापडतं! ते म्हणजे आपली नजर तयार होते, जी आपल्याला शिकवते. आणि कायम शिकवत राहते!
1) अनुभव
मी माङया भावाच्या दुकानात काम केलं. मी वृत्तपत्रत उपसंपादक म्हणून काम केलं. उन्हाळ्यात दोन कंपन्यांच्या एचआरमध्ये काम केले. पैशापेक्षा मला हा अनुभव पुढील आयुष्यात खूप उपयोगी पडला. थिअरी प्रॅक्टिकली शिकता आली, प्रत्यक्षात तशी कामं करून पाहता आली. लोकांशी बोलावं कसं, वागावं कसं, हे मी बरंचसं तिथंच शिकलो. कॉलेजमध्ये शिकलेले कॉन्सेप्ट मला इम्प्लिमेण्ट करण्याचा प्लॅटफॉर्म या जागी मिळाला.
मुद्दा काय,  नोकरीच्या इण्टरव्ह्यूला गेलो की, तुमच्याकडे अनुभव नाही, असं कुणी आपल्याला तोंडावर सुनावू शकत नाही. कारण आपल्याकडे प्रत्यक्ष कामाचा थोडाबहुत अनुभव असतो. 
अट एकच, आपण प्रत्यक्ष लहानमोठं काम अत्यंत सिन्सिअरली केलं असेल तर! फक्त इण्टर्न असल्याचा कागद घेऊन आलो असेल तर आपली पाटी कोरीच राहणार! त्यामुळे पहिलं ठणकावून सांगायचं स्वत:ला की, मला अनुभव कमवायचा आहे. 
समर इण्टर्नशिप कशासाठी, तर अनुभव कमवण्यासाठी!
 
2) अपेक्षित नोकरीच्या ध्येयाकडे वाटचाल
मुळात आपल्याला शंभर गोष्टी करून पहायच्या असतात. असं वाटतं हे करिअर करायचं की ते! त्यावर उत्तर हे! आपल्या समर व्हेकेशनमध्ये आपल्याला ज्यात रस ते काम प्रत्यक्ष त्या क्षेत्रत जाऊन, निदान त्यासंबंधित भागात जाऊन करून पहायचं. त्यातून आपल्याला कळतं की, आपल्याला खरंच हे काम, हे जग किती आवडेल! त्यामुळे अपेक्षित नोकरीच्या जगात पाऊल ठेवण्याची ही संधी आहे, हे विसरायचं नाही!  
- नोकरी देताना हल्ली मुलाखत घेणारे पाहतात की, यानं या क्षेत्रत आधी काही धडपड केली आहे की नाही, केली असेल, तर त्या धडपडीला महत्त्वही दिलं जातं!
 ब:याचदा समरमध्ये तत्कालीक काम करताना तुमचा एम्लॉयर खूश होऊन तुम्हाला जॉबही ऑफर करू शकतो. एखाद्या हौशी उमेदवाराला ट्रेनी म्हणून जॉब ऑफर केला असं ब:याच जागी होताना दिसतं. प्रोजेक्ट करताना तुम्ही कसं काम करता, आणि तुमच्या एम्प्लॉयरचा विश्वास कसा संपादन करता, हे महत्त्वाचं असतं.
3)  जे शिकलो, ते कामाचं किती, येतं किती?
कॉलेजमधील शिक्षण टेस्ट करण्याचा प्लॅटफार्म या निमित्ताने तुम्हाला मिळू शकतो. ब:याचदा आपण आपल्या शिक्षण पद्धतीला नावे ठेवतो आणि शिक्षक बरोबर शिकवत नाही, म्हणून जबाबदारी ढकलतो; मात्र जे शिकतो ते प्रॅक्टिकली कसं वापरतो, हे महत्त्वाचं असतं. मुळात कॉलेजेसमध्ये जे शिकवतात त्याला काहीतरी अर्थ असतो आणि म्हणून एखादा ‘कॉन्सेप्ट टेस्ट’ करण्याचा मार्गही तुम्हाला येथे सापडू शकतो.
सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या पुस्तकी ज्ञानापलीकडे तुम्हाला व्यवहारज्ञानही मिळतं! कळतंही की, चार लोकांत जाऊन काम करणं आपल्याला जमतंय की नाही!
4) ओळखी होतात, म्हणजे ‘कॉण्टॅक्ट्स’ वाढतात..
काम करत असताना तुमच्या ब:याच ओळखी होतात. या ओळखी कोठे कामाला येतील सांगता येत नाही. येथे भेटणा:या सिनियर लोकांकडून तुम्ही शिकू शकता. त्यांच्याकडून चांगले गुण घेता येतात. आणि हा अनुभवाचाच एक भाग ठरतो. कदाचित एखादी ओळख तुमच्या स्वप्नातील जॉबकडे तुम्हाला पोहोचवू शकेल.
लोक स्वत:हून चार लोकांना तुमचं नाव सूचवतील. हे ‘कॉण्टॅक्ट्स’ वाढणं हा नव्या नेटवर्किगचा सगळ्यात मोठा भाग आहे.
 
5)  नवीन स्किल शिका.. 
समर जॉब करण्याच्या या प्रोसेमध्ये तुम्ही एखादं नवीन कौशल्यही शिकू शकाल. कॉम्प्युटर वापरायचं प्रॅक्टिकल, नॉलेज, पीपीटी कसं करायचं, इथपासून ते लोकांशी वागण्या-बोलण्याच्या, मान-अपमान पचवण्याचं संवाद कौशल्यही तुम्हाला सहज शिकायला मिळतं. 
 6) आत्मविश्वास
आपण आपल्याच जगातून बाहेर पडून एका वेगळ्याच जगात जातो. तिथं आपल्या मेहनतीवर आपली छोटी का होईना ओळख निर्माण करतो. मान-अपमान जे काय वाटय़ाला येतं ते आपलं. त्यातून एक वेगळाच आत्मविश्वास मिळतो. ‘मी हे करू शकतो किंवा हे शक्य आहे’ हा आत्मविश्वासच यशाकडे नेण्यासाठी पुरेसा असतो.
त्यामुळे पैशाची कमाई कमी होईल, कदाचित होणारही नाही, पण बाकी हे समर जॉब जे शिकवतील ते तुम्हाला एरव्ही कुठंच शिकायला मिळणार नाही!
 
- विनोद बिडवाईक

 

Web Title: 6 benefits of summer job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.