विराट कोहली जेव्हा 15 वर्षाच्या चिकूला पत्र लिहितो...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 08:00 IST2020-01-09T08:00:00+5:302020-01-09T08:00:12+5:30
जे तुझ्याकडे आहे, ते आहे म्हणून कधीही गृहीत धरू नकोस. ग्रॅब इट व्हेन इट कम्स!

विराट कोहली जेव्हा 15 वर्षाच्या चिकूला पत्र लिहितो...
- विराट कोहली
हाय चिकू.
फस्ट ऑफ ऑल, अ व्हेरी हॅपी बर्थ डे!
मला माहितीये, तुझ्या डोक्यात बरेच प्रश्न आहेत. उद्या काय होईल हे तू मला विचारणार आहेस. पण. सॉरी, मी काही त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता देणार नाही. बहुतेक प्रश्नांची तर नाहीच देणार! उद्या काय होणार, हेच माहिती नसेल तर येणारी प्रत्येक गोष्ट छान, मस्त वाटते. प्रत्येक चॅलेंज थ्रिलिंग वाटतं आणि प्रत्येक अपयश शिकण्याची नवीन संधी घेऊन येतं. अर्थात तुला आज हे सगळं पटणार नाही, कळणारही नाही. मंझिल की नहीं, ये सफर की बात है! आणि तुला सांगतो, हा प्रवास ‘सुपर’ आहे.
पण मग मी तुला काय सांगणार आहे?
तर हेच की, आयुष्यात बरंच काही होणार आहे. त्यासाठी तू तयार असलं पाहिजेस. तुझ्याकडे येणार्या प्रत्येक संधीवर झडप घाल, तयार राहा त्यासाठी. अॅण्ड ग्रॅब इट व्हेन इट कम्स. आणि जे तुझ्याकडे आहे, ते आहे म्हणून कधीही गृहीत धरू नकोस. अपयश तर काय तरीही येईलच. प्रत्येकालाच येतं. पण अपयश आलं म्हणून हातपाय गाळून बसू नकोस, ऊठ, पुन्हा उभा राहा. सांग स्वतर्ला, प्रॉमिस कर की, काहीही झालं तरी मी पुन्हा उभा राहीन, ते एकदा नाही जमलं तर पुन्हा करीन, करत राहीन!
अनेक लोक तुझ्यावर भरभरून प्रेम करतील. काहीजण भयंकर रागराग करतील. जे तुला ओळखतही नाहीत, असेही लोक तुझ्यावर चिडतील. त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. भरवसा ठेव, फक्त स्वतर्वर!
मला माहितीये, आत्ता तुझ्या डोक्यात एकच गोष्ट आहे, तुला हवे असणारे शूज. डॅड ते या वाढदिवसाला तरी गिफ्ट करतील असं तुला वाटलं होतं; पण खरं सांगतो, आज सकाळी त्यांनी तुला घट्ट मिठी मारली, तुझ्या उंचीवरून तुला चिडवलं त्याहून महत्त्वाचं, मोठं असं दुसरं काहीही नाही! त्याकडे बघ! मला माहितीये ते फार स्ट्रिक्ट वागतात कधीकधी; पण तुझं भलं व्हावं याहून जास्त त्यांना तरी काय हवंय! कधी कधी वाटतं तुला की, मॉम-डॅड तुला अजिबात समजून घेत नाहीत. पण लक्षात ठेव, फक्त आपल्या घरचे, आपलं कुटुंबच आपल्यावर असं निरपेक्ष प्रेम करतं. त्यांना जप. त्यांच्याशी गोड बोल, जरा आदरानं वाग आणि त्यांच्यासोबत राहा. वेळ दे त्यांना.
सांग डॅडना की, माझं तुमच्यावर प्रेम आहे. वारंवर सांग. आज परत सांग, उद्याही सांग. सांगत राहा. कायम.
बाकी, फॉलो युवर हार्ट. चेझ युवर ड्रिम्स. आणि सांग जगाला ठणकावून की मोठी स्वप्नं पाहण्याची आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याची ताकद आहे माझ्यात. त्याच ताकदीवर मी सगळं बदलू शकतो.
आणि हो. ते पराठे खाऊन घे आजच, दोस्ता! येत्या काळात ते पराठे मिळणार नाहीत, हे नक्की. दे वील बिकम क्वाइट अ लक्झरी.मेक एव्हरी डे सुपर!
***************
My journey and life's lessons explained to a 15-year old me. Well, I tried my best writing this down. Do give it a read. 😊 #NoteToSelfpic.twitter.com/qwoEiknBvA
— Virat Kohli (@imVkohli) November 5, 2019
5 नोव्हेंबर 2019.
त्या दिवशी विराट कोहली 31 वर्षाचा झाला.
त्या वाढदिवसाला त्यानं स्वतर्लाच, म्हणजे कधीकाळी 15 वर्षाच्या असलेल्या मध्यमवर्गीय घरातल्या ‘चिकू’ला लिहिलेलं हे पत्र.
पंजाबी घरातलं वातावरण, मुलानं मोठ्ठा बॅट्समन व्हावं म्हणून जिवाचं रान करणारे, कठोर शिस्तीचे वडील आणि मख्खन मारके मिळणारे पराठे या सार्यांची ‘याद’ ताजी करत स्वतर्लाच चार समजुतीच्या गोष्टी सांगणारं हे पत्र.
31 वर्षाच्या विराटकडे अमाप यश, पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता आहे, 15 वर्षाच्या चिकूकडे हे काहीच नव्हतं, कुणीच नव्हता तो. 18 वर्षाचा होता होता तर त्याचे वडील एकेरात्री अचानक गेले. आणि वडिलांचं पार्थिव घरात असताना हा मुलगा आपलं कर्तव्य आणि त्यांचं स्वप्न म्हणून रणजी मॅच खेळायला गेला.
तिथपासून यशाच्या शिखरावर गेलेल्या विराटचं हे त्या 15 वर्षाच्या चिकूला लिहिलेलं पत्र.
एका विशीची वेगळी गोष्ट!