निरोप10 गोष्टींना

By Admin | Updated: December 24, 2015 17:46 IST2015-12-24T17:39:35+5:302015-12-24T17:46:49+5:30

जुन्या होत असलेल्या, 2015 नावाच्या वर्षा, आता निघणारच आहेस, निरोप घेणारच आहेस, जायचं म्हणून कॅलेंडर गुंडाळून बॅगेत ठेवणारच आहेस,

10 things to leave | निरोप10 गोष्टींना

निरोप10 गोष्टींना

 जुन्या होत असलेल्या,

2015 नावाच्या वर्षा,
आता निघणारच आहेस,
निरोप घेणारच आहेस,
जायचं म्हणून कॅलेंडर गुंडाळून बॅगेत ठेवणारच आहेस,
तर तुझ्यासोबत आमच्या काही गोष्टीही प्लीज घेऊन जाशील?
त्या गोष्टींना तुङयासोबतच निरोप  द्यावा म्हणतोय.
कदाचित त्यामुळे,
तुझाच सोबती असलेलं 2016 येईन,
तेव्हा त्या नव्या वर्षाला मी नवा भेटेन, नव्यानं भेटेन.
आणि जगेनही नव्यानं!
तेव्हा माझं हे गाठोडं,
ने तुङया सोबत आणि फेकून दे कुठंतरी 
काळाच्या खोल विवरात त्यानं पुन्हा मला कधीही गाठू नये म्हणून. 
 
 
 
1) मनावरच्या ओझ्याला.
किती ओझं ते मनावर, कसलकसल्या आठवणींचं, कुणी जाणूनबुजून किंवा नकळत केलेल्या अपमानांचं. जमलेल्या गोष्टींचं, पूर्णच न झालेल्या अपेक्षांचं. अपयशाचं आणि यशाचंही! इतकं जड होतं मन की, त्याला नवीन काही सुचूच नये, जरा जागा मिळाली की बुळूबुळू करत एकेक जुन्याच गोष्टी बाहेर येऊन चावू लागतात. नको ते ओझं आता नव्या वर्षात जाताना.
सरळ रिकाम्या मनानं, को:या पाटीनं नवं काहीतरी घडवू. जुनं ओझंच नको कसलंच, सुखाचंही.दु:खाचंही!
जरा वाटू दे ना हलकं, मलाही, मनालाही!
 
2) नको नको ते आकडे.
पाच वर्षापूर्वी एवढं होतं वजन, आता एवढं आहे. मैत्रिणीचं एवढं, माझं तेवढं आहे. पोटाचा घेर, कंबरेचा घेर यांचे आकडे. विसरसलेल्या वाढदिवसांचे, विसरुन जावेत अशा फोन नंबर्सचे, स्वत:च्या न वाढलेल्या आणि इतरांच्या वाढलेल्या पगारांचे, कसकसल्या इएमआयचे. हे सारे आकडे फेर धरुन नाचतात अािण मामाचं पत्र हरवलं खेळल्यासारखे सरळ आपल्याभोवती गोल गोल फिरतात. दुसरं काहीच सुचू देत नाहीत. जरा विसरुन जाता येतील का हे आकडे? वाढलं ते वाढो, घटलं ते घटो.पण जरा आकडय़ांच्या जंजाळातून तर सुटू. मन मोकळं करू.
 
3) आळस, किती तो!
मान्यच करु ना की आहोत आपण आळशी, जरा शिस्त नाही स्वत:ला. पहाटे पाचला उठू असं गेले दहावर्ष ठरवतोय पण नाही जमत. ना व्यायाम जमतो, ना वेळ पाळणं, ना डेडलाईन सांभाळणं ना वेळेवर कुठल्या गोष्टी करणं. यासा:याला जबाबदार कोण? तर आपला आळस. त्या आळसाला एकदाचा निरोपाचा नारळ देऊ. जरा झडझडून उठत कामाला लागूच यंदा.
 
4) जुनंच किती गिरवत राहू.?
यश  मिळालं म्हणून काय झालं, जुनंच किती दिवस गिरवायचं. तेच ते किती काळ करायचं. जे जमतं तेच करत रहायच्या आणि सेफ प्ले करायच्या या जिलबीपाडू वृत्तीलाही निरोप. कशाला तेच ते करायचं. नवीन पाहू की करू, नाहीच जमलं तर अनुभव तरी मिळेल. पण त्याच त्या रेघोटय़ा नको आता.
 
5) ‘डर’ण्याचं काय?
 
सतत भीती वाटते. उद्याची, कालची, आजची, माणसांची, अपयशाची, खडय़ात पडायची, वाईट होण्याची, साडेसातीची, पत्रिकेतल्या ग्रहांची. डर डरके जिएंगे तो क्या खाक जिऐंगे? उद्या जे होईल ते होईल, पण वाईटच होईल या डरण्याला आता बाय म्हणूच.
 
6) आठवणींत कैद
 
आठवणी सुख देतात हे खरं, पण किती आठवायचं? जरा विसरायला शिकू. सततच्या त्या आठवणी, चांगल्या वाईट माणसांच्या, त्यांच्या बरोबर जगल्या क्षणांच्या,त्यांनी दिलेल्या प्रेमाच्या आणि अपेक्षाभंगाच्याही.
त्या आठवणींचं अकाऊण्ट डिलीट करून टाकता येतील.
 
 
7) डाचणारे अनुभव.
एकदाच येतात वाईट अनुभव, पण ते डाचत राहतात. छळत राहतात. सतत. कायम. जरा खपली निघाली की भळभळ रक्त वाहतंच. एकदाच आलेले अनुभव आपल्याभोवतीच रेंगाळतात. एकदाच झालेले अपमान सतत सलत राहतात. हे डाचणारे अनुभव जगू देत नाहीत, त्यांचं एकदा विसर्जन केलेलं बरं. म्हणजे जरा नव्या, सुखाच्या अनुभवांना तरी जागा होईल..
 
 
 
8) छळकुटी माणसं.
काही माणसं छळकुटी. सतत छळतात. आता तर ऑनलाईन जगातही छळतात. पण आपण त्यांना सोडत नाही, त्यांना जा म्हणत नाही किंवा ढकलून बाहेर काढत नाही आयुष्यातून. नातं टिकवायसाठी सारे प्रय} करू. जीवापाड प्रेम देऊ, पण नाहीच जमलं तर छळकूटय़ा माणसांना आपलं आयुष्य का नासवू द्यायचं?
 
 
9) आभासी आनंद? कशाला?
 
किती ते आभासी आनंद? सतत ऑनलाईन असण्याचे आणि लाईक्स, कमेण्टमधे आपलं कर्तृत्व जोखण्याचे. आभासी मित्रंचे? ते आभासी, खोटे आनंद वजा होत जरा प्रेमाची माणसं, त्यांचा सहवास, खरेखुरे आनंदाचे क्षण येऊदेत वाटय़ाला,पण त्यासाठी ऑनलाईन जगाला थोडा निरोप द्यावा लागेल.
 
 
10) लोक काय म्हणतील?
हे तीन शब्द, विसरुन गेलेले बरे. काही करायच्या आतच, लोक काय म्हणतील हा विचार येतो, या तीन शब्दांनाच निरोप दिला तर काहीतरी वेगळं, आपल्या आनंदाचं घडू शकेल , लोक काही का म्हणोनात मग!

Web Title: 10 things to leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.