0/५0

By Admin | Updated: June 5, 2014 17:51 IST2014-06-05T17:51:36+5:302014-06-05T17:51:36+5:30

का आहे मी इथे? हे माझे सगळे मित्र इथे आहेत म्हणून? बंद डोक्यांच्या कळपातलं एक मेंढरू? खरंच अंगाभोवती लोकर उगवली तर? भर वर्गात अचानक मोठ्ठय़ाने मे मे करत उधळता तरी येईल.

0/50 | 0/५0

0/५0

>- सागर पांढरे
M3 चं लेर लंच ब्रेकनंतर ठेवून कॉलेजवाल्यांनी सगळ्या पोरांच्या शिव्या शाप पदरी पाडून घेतल्यायेत..महामुनीच्या कुठल्याही लेरला जागृतावस्थेत बसणं हे इंजिनिअरिंगच्या बापालाही शक्य नाही. रव्या वगैरे पोरं तर कॅन्टीनमध्ये यथेच्छ शेजवान राईस ठासून तिथेच पेंगायला लागलेत. अनुज बंक करण्यासाठी कारणं शोधण्यात व्यस्त आहे. आज मानसी आलीच नसल्याने नमित कॅन्टीनमध्येच मुक्काम ठोकणारे. चैत्राली आणि वैष्णवी ‘ए मला नाही जायचंय!’ असं ओरडत ओरडत ‘अलमोस्ट’ क्लासमध्ये पोचल्या आहेत. श्रीनिवास वृषालीच्या नोट्स घेऊन झरझर छापत बसलाय.  आणि मीसुद्धा अत्यंत नाईलाजाने सगळी एनर्जी एकवटून क्लासरूमच्या दिशेने पाय फरफटत निघालोय. तेवढय़ात कुणीतरी अतीव उत्साहाने चित्कारली, ‘ए सर आज युनिट टेस्टचे मार्क्‍स देणारेत!’ तिचं वाक्य पुरं व्हायच्या आतच निम्म्या टाळक्यांची पांगापांग झाली आणि उर्वरित लोकांच्या, ‘क्वेश्‍चन फाईव्हचं आन्सर तू काय लिहिलं होतंस’ असल्या चर्चा झडायला लागल्या. नेहल आणि शुभांगी डाफरत होत्या. ‘ए अरे बंद पडा ना! कळेल ना आता जे काये ते!’ आणि मी फक्त चालत होतो. अँज इफ हे सगळं समोर टीव्हीवर घडतंय आणि माझा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये. मला नाही माहीत मी काय आन्सर लिहिलंय क्यू फाईव्हचं किंवा मुळात कुठल्याही प्रश्नाचं काहीतरी उत्तर लिहिलंय का ‘आय डोण्ट नो, नॉर डू आय केअर.’ ही काही पहिलीच वेळ नाहीये. या पूर्वीच्या अनेक युनिट टेस्ट आणि टर्म एण्डमध्ये मला सिंगल डिजीट मार्क मिळाले आहेत आणि मला त्याचं काहीही वाटलेलं नाही. वाटत नाही. मला ट1, ट2, ट3 मध्ये काय फरक आहे माहीत नाही. ग्राफिक्स, मशिन्स, डिझाईन्स या शब्दांचाही मला नॉशिया येतो. माझं इंजिनिअरिंग किती वर्षांत पूर्ण होईल रॅदर पूर्ण होईल की नाही याचाही मला थांगपत्ता नाहीये. बेसिकली इंजिनिअरिंग म्हणजे काय हेच मला नाही माहितीये..
  शकीलच्या टपरीवर जाऊन सिगरेट मारून येईस्तोवर १0 मिनिटं आरामात होऊन गेली होती. क्लासमध्ये पाऊल ठेवल्यापासून ते क्लास संपेपर्यंतचा संपूर्ण एक तास त्या दहा मिनिटात अँण्टिसिपेट करून झाला होताच. ‘डीज हायनेस हॅज अराईअव्ह्ड, हाऊ ऑनर्ड वी आर.’ -महामुनीचं ठेवणीतलं वाक्य आणि त्यावर तोच तो ठरावीक हशा. हे तर फक्त स्वागत होतं. मग मी शेवटच्या बाकापर्यंत पोचेस्तोवर माझा आधीच्या, त्याच्या आधीच्या आणि त्याही आधीच्या एक्झाम्समधला स्कोअर, माझं इंजिनिअरिंग कसं कधीही पूर्ण होऊच शकत नाही, मी त्यांना कितीदा,कुठेकुठे सिगरेटी फुंकताना दिसलोय लेर बंक करून, माझे आई बाप कसे माझ्यावर पाण्यासारखा वगैरे पैसा खर्च करतायेत आणि मला कशी त्याची काही चाड नाहीये वगैरे वगैरे तेच ते पुन्हा पुन्हा उगाळून झालं. मी नव्हतं सांगितलं ना माझ्या बापाला मला लाखो रुपयांचा चुराडा करून इंजिनिअरिंगला घालायला. परिस्थिती नव्हती म्हणून भिकार कॉर्मस करावं लागलं आणि बँकेत चिकटलो आयुष्यभर. झालो असतो नाहीतर इंजिनिअर-डॉक्टर. अँडमिशनच्या लांबलचक रांगेत भरपावसात उभे असताना आमच्या पूज्य पिताश्रींनी पन्नासाव्यांदा सांगितलेली त्यांची लांबलचक कर्मकहाणी आठवून तिडीक गेली थेट डोक्यात! इंजिनिअर किंवा डॉक्टर संपलं! त्यांच्या फौजाच निर्माण करत सुटलेय सगळे. आणि महामुनिसारखी लोकं या कारखान्यांचे मालक. आमचेच मालक. धाडकन वही डेस्कवर आपटली तसा महामुनीने एक तुच्छ लूक टाकला माझ्याकडे आणि पुन्हा फळ्यावर अनाकलनीय बाराखडीत गुंतून गेला. मी अख्ख्या वर्गात एक नजर फिरवली. पहिल्या बाकावर श्रीनिवास, वृषाली आणि महामुनी यांचा काहीतरी बौद्धिक संवाद सुरू होता. मधल्या बाकावर व्हॉट्स अँप, फेसबुक आणि कॅण्डी क्रश शिगेला पोचले होते. अन्या, तेजस आणि अनुज सगळ्यात शेवटी बसले होते माझ्यासोबत आणि जागं राहण्याचा जीवापाड प्रयत्न करत होते. का आहेत हे सगळे इथे? का आहे मी इथे? हे इथे आहेत म्हणून मीसुद्धा आहे,  का? बंद डोक्यांच्या कळपातलं एक मेंढरू? पण अंगाभोवती खरंच लोकर उगवली तर कसलं भारी वाटेल ना?  अर्थात उन्हाळ्यात वाट लागेल. भर वर्गात अचानक तीव्रतेने मोठ्ठय़ाने मे मे करत सुटावं वाटलं. महामुनीचा फ्रीक्ड आऊट चेहरा बघण्यासारखा असेल तेव्हा. पण मी तसं काहीच न करता मुकाट खिडकीबाहेर बघत बसलो. बाहेर भरून आलं होतं. वार्‍यानं पाचोळा गरगरत बसला होता. 
मला आठवत होता बारावीच्या रिझल्टचा दिवस. कट्टय़ावर अन्या, तेजस, अनुज आणि तत्सम काही टाळकी हसत खिदळत बसलीयेत. त्यातल्या बहुतेकांना अबोव्ह ८५ परसेण्ट मिळाले आहेत. पीसीएम ग्रुपमध्ये आणि सीईटीमध्ये १६0-१७0 च्या घरात. मी माझ्या ६७.३३ टक्केवाल्या मार्कशीटची बारकीशी सूरनळी केलीये आणि एक डोळा बंद करून सगळ्यांकडे आळीपाळीने बघतोय. ‘ई अँण्ड टीसी, इलेक्ट्रिकल, आयटी, अगदीच काही नाही तर सिव्हिल, तू काय रे? सगळ्या नजर माझ्यावर रोखलेल्या जाणवल्या मला. मी एक आवंढा गिळतो. सगळ्यांच्या नजरा चुकवणं हा एक टास्क असतो अशा वेळेला. मार्कशीटभोवतीची पकड आपसूकच आणखी घट्ट होते.
‘आर्ट्स..’ मी महत्प्रयासाने पुटपुटतो. प्रचंड हशा. सोबत माझंही फिक्कट ओशाळवाणं हसू. 
त्यानंतरचा तो माझ्या घराखालचा सीन मला डोळ्यासमोर लख्खं दिसू लागतो. धोधो फिल्मी पाऊस कोसळणारा. ‘भिकेचे डोहाळे लागले असतील असले तर चालायला लाग आत्ताच्या आत्ता. मग करा आर्ट्स.काय जे नागव्याने नाचायचंय ते नाचा..’  आणि मग जोश्यांचा सुशील, देशपांड्यांची वैदेही, सगळ्या जगाचे दाखले. कोण आहेत ही लोकं? यांचा काय संबंध माझ्याशी? जोश्यांचा सुशील चित्र काढू शकतो का माझ्यासारखी? आणि देशपांड्यांच्या वैदेहीला आवडत असेल धडकत्या दिलांचा रुक्ष रटाळ अभ्यास. मला नाही आवडत ना पण हे काहीही, अर्थात हे काहीही आईबाबांना पटवून द्यायला गेल्यावर ‘उलट बोलतोस अजून’ नामक शस्त्र उगारलं जाणार. सो हाताची घडी आणि तोंडावर बोट. ‘थ्री इडियट’मधल्या फरहान कुरेशीशी लगेच स्वत:ला रिलेटबिलेट करत उद्दात वाटून घेण्यापलीकडे काहीच का करता येऊ नये? बराच वेळ जिभेचा पट्टा चालवून झाल्यावर दणादणा पाय आपटत दोघेही आत जातात. आजूबाजूच्या खिडक्या-बालकन्यांमधले डोकावते भोचक चेहरेही एकेक करून अदृश्य होतात. मी तसाच पावसात उभा. स्कूल ऑफ फाईन आर्ट्सचा भिजून लगदा झालेला अँडमिशन फॉर्म मुठीत अजूनही आवळून धरलेला. तिथंच संपलं ते.
आज आता हा पुन्हा महामुनीचा क्लास. त्याने 0/५0 देऊन रक्तबंबाळ केलेल्या पेपरवर त्याचीच ढेरी आणि टक्कल गरगरीत करण्यात मी गुंतून गेलेलो आहे. घंटा वाजते. मी दचकून आजूबाजूला पाहतो. वह्या-पुस्तकांच्या चटचट बंद होण्याचे, सॅकच्या खर्रकन खेचल्या जाणार्‍या चैनींचे अनेक आवाज आणि सोबतीला ‘तुला किती मिळाले?’ असल्या निर्थक चर्चा चारही बाजूंना. हे सगळं मागे टाकून बाहेर येईपर्यंत पाऊस सुरू झालेला नेहमीसारखाच. रिअलायझेशनच्या क्लायमॅक्सला पाऊस हवाच. डोक्यावर छत्री, वही, रुमाल घेऊन पळापळ चाललीये नुसती सगळ्यांची सगळीकडे. मी एका हातात जळती सिगरेट आणि दुसर्‍या हातात पन्नासपैकी शून्य घेऊन नुसताच चालत राहतो. खूप काही वाटतंय आणि वाटत नाहीये आत्ताच्या घडीला. काहीतरी अनोखं विचित्र फिलिंग आहे. आणि ही भिजक्या सिगरेटची बसलेली किक नाहीये निव्वळ. इंजिनिअरिंग नावाचं चुइंगगम चिकटून बसलंय अंगाला सारखं. वाहून जाऊ द्यावं ते सगळं आता एकदाचं. क्षणार्धात पन्नासपैकी शून्यच्या चिंध्या चिंध्या करून टाकतो मी आणि भेलकांडत फेकून देतो त्या पायाखालच्या इवल्याशा ओहोळात. 
मी निवडलेल्या किंवा माझ्यावर लादल्या गेलेल्या या भयाण लांबलचक वर्षांमधून इतक्या सहज सुटका नाहीये माझी. कळतंय, दिसतंय हे सगळं. पण तरीही छान वाटतंय आत्ता थोडंसं. पाऊस सावकाश शांत होत चाललाय. सिगरेटचा शेवटचा निखारा विझायला आलाय. कट्टे आणि कॅन्टीन ओस पडत चाललीयेत.
आणि त्या टकल्या, ढेरपोट्या महामुनीचा एक छोटासा तुकडा त्या ओहोळात हळूहळू वाहत चाललाय. माझ्यापासून दूर..खूप खूप दूर..
 
 
अवतीभोवती माहितीचा पूर, अक्षरश: हजारो पर्याय आणि आपल्याला हवं तेच करायची धमक या सगळ्याच्या भरवशावर सोपंय हल्लीच्या तरुण मुलांचं आयुष्य, असं सरसकट म्हणणं साोपं.?
पण ते तसं खरंच आहे का? ‘ऑक्सिजन टीम’ याच प्रश्नाचं उत्तर शोधत होती.
अनेक तरुण दोस्तांशी गप्पा मारत होती, तसाच एक फोन सागरलाही केला.
सागर? तोच ‘काही वायझेड प्रश्न’ नावाचा तुमचा आवडता कॉलम लिहिणारा तरुण दोस्त. त्याला विचारलं की, ‘पिअर प्रेशर नावाची काही भानगड आजच्या कॉलेजगोइंग मुलांच्या आयुष्यात उरली आहे का? तो जमाना गेला, जेव्हा मित्र म्हणतात तेच करायचं नी तेच शिकायचं असा भाबडेपणा अनेक तरुण पिढय़ांमध्ये होता.’
सागर म्हणाला, ‘आहे ना, पूर्वी होतं त्यापेक्षा जास्त प्रेशर आहे, मानगुटीवर नाही पार डोक्यावर बसलेलं आहे ते प्रेशर अनेकांच्या.’
म्हणून मग त्याला म्हटलं लिही तू.
‘तर त्याने हा लेख लिहून पाठवला.’
आपल्याच अवतीभोवती असणार्‍या तरुण मुलांच्या डोक्याचा पुरता चिखल कसा झालेला असतो आणि किती अवघड होतो हा टप्पा, हे सांगणारं एक वास्तव चित्रच.
 
- ऑक्सिजन टीम

Web Title: 0/50

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.