झिम्बाब्वेचा पाकिस्तान दौरा सुरू राहणार
By Admin | Updated: May 31, 2015 01:29 IST2015-05-31T01:29:48+5:302015-05-31T01:29:48+5:30
पाकिस्तान आणि झिम्बाब्वेदरम्यान दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यादरम्यान गद्दाफी स्टेडियमजवळ काल रात्री झालेल्या स्फोटाला विद्युत रोहित्राचा स्फोट असल्याचे सांगण्यात आले होते;

झिम्बाब्वेचा पाकिस्तान दौरा सुरू राहणार
लाहोर : पाकिस्तान आणि झिम्बाब्वेदरम्यान दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यादरम्यान गद्दाफी स्टेडियमजवळ काल रात्री झालेल्या स्फोटाला विद्युत रोहित्राचा स्फोट असल्याचे सांगण्यात आले होते; परंतु तो दहशतवादी हल्ला होता. तथापि, या घटनेनंतरही झिम्बाब्वेने मालिका सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकेतील अखेरचा सामना उद्या खेळवला जाणार आहे.
गद्दाफी स्टेडियमवर दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन केले जात होते आणि तेथे जवळच स्फोट झाला. सामन्यादरम्यान जवळपास ९ वाजता झालेला स्फोट हा रिक्षात ठेवण्यात आलेल्या स्फोटकांमुळे झाल्याचा दुजोरा माहितीमंत्री परवेज रशीद यांनी ‘जियो न्यूज’ला दिला. रिक्षात स्फोट हा कलमा चौक येथे झाला आणि कलमा चौक गद्दाफी स्टेडियमपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असल्याचे रशीद म्हणाले.
सुरुवातीला पाकिस्तानी क्रिकेट मंडळ आणि पोलीस अधिकाऱ्यांनी हा स्फोट स्टेडियमजवळील विद्युत रोहित्रच्या स्फोटामुळे झाल्याचे सांगितले होते.
पीसीबी प्रवक्त्यांनी लोकांमध्ये भीती निर्माण होऊ नये, यासाठी काल रात्रीच पाऊल उचलण्यात आले होते, यालाही दुजोरा दिला. आगा अकबर म्हणाले, ‘‘स्फोट झाल्याचे समजताच ही बाब पसरली गेली; परंतु सामना पाहण्यासाठी आलेले क्रिकेट चाहते सुरक्षित होते आणि कोणतीही घटना झाली नाही. मुख्य बाब म्हणजे झिम्बाब्वे त्यांचा पूर्ण दौरा सुरूठेवणार असून नियोजित वेळापत्रकानुसार रविवारी अखेरचा वन-डे सामना खेळणार आहे.’’
अकबर यांनी पहिल्या ४ सामन्यांप्रमाणेच अखेरच्या सामन्याचीही सर्व तिकिटांची विक्री झाल्याचे सांगितले. रिक्षात झालेल्या स्फोटामुळे उपनिरीक्षकासह कमीत कमी ३ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाल्याचे पंजाब पोलीसचे उपमहानिरीक्षक डॉ. हैदर अशरफ यांनी सांगितले. पंजाब पोलीसांच्या सूत्रांनुसार, रिक्षात झालेला स्फोट लक्ष विचलित करण्यासाठी करण्यात आला होता. कारण, त्याचा फायदा अन्य एक दहशवादी घेण्याच्या विचारात होता; परंतु सुरक्षा इतकी मजबूत होती, की गद्दाफी स्टेडियमच्या चहू बाजूला तो भेदू शकला नाही आणि तो मारला गेला.
अशरफ म्हणाले, स्फोट स्टेडियमच्या एक किलोमीटर अंतरावर झाला आणि त्यानंतर भयावह वातावरण निर्माण झाले होते. पोलीस कर्मचारी आणि रेंजर्स परिस्थिती व्यवस्थित हाताळत आहेत आणि आम्ही प्रकरणाचा तपास करीत आहोत आणि घटनास्थळी साक्षी गोळा करीत आहोत. मार्च २००९ मध्ये लाहोर येथे श्रीलंका क्रिकेट संघाच्या बसवरही दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात ६ पोलीस कर्मचारी आणि एक व्हॅन ड्रायव्हरचे निधन झाले होते. या घटनेनंतर पाकिस्तानचा दौरा करणारा झिम्बाब्वे हा कसोटी खेळणारा पहिलाच संघ आहे.