न्यूझीलंडकडून झिम्बाब्वेचा धुव्वा
By Admin | Updated: August 4, 2015 22:50 IST2015-08-04T22:50:35+5:302015-08-04T22:50:35+5:30
सलामीवीर मार्टिन गुप्टिल आणि टॉम लॅथमच्या नाबाद शतकांच्या जोरावर न्यूझीलंडने झिम्बाब्वेचा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धुव्वा उडवला

न्यूझीलंडकडून झिम्बाब्वेचा धुव्वा
हरारे : सलामीवीर मार्टिन गुप्टिल आणि टॉम लॅथमच्या नाबाद शतकांच्या जोरावर न्यूझीलंडने झिम्बाब्वेचा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धुव्वा उडवला. त्यांनी हा सामना दहा गड्यांनी जिंकला. याबरोबरच त्यांनी तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना एकही गडी न गमावता मिळवलेला हा सर्वांत मोठा विजय ठरला. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होता. त्यांनी २०११ च्या विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात इंग्लंडविरुद्ध २३१ धावांचा पाठलाग करताना एकही गडी न गमावता विजय मिळवला होता.
झिम्बाब्वेने सिकंदर राजा (नाबाद १००) याच्या योगदानामुळे खराब सुरुवातीनंतरही ९ बाद २३५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने एकही गडी न गमावता ४६ चेंडू राखत सामना जिंकला. यामध्ये गुप्टिलने नाबाद ११६, तर लॅथमने ११० धावांची नाबाद खेळी केली. गुप्टिलने १३८ चेंडूंत ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने शानदार शतक झळकाविले. तर लॅथमने ११६ चेंडूंचा सामना करीत सात चौकार आणि दोन षटकार ठोकत ११० धावा केल्या. त्याची ही सर्वाेत्कृष्ट खेळी ठरली. आता मालिकेतील निर्णायक सामना याच मैदानावर शुक्रवारी रंगणार आहे.
संक्षिप्त धावफलक :
झिम्बाब्वे ५० षटकांत ९ बाद २३५ (चिभाबा ४५, विलियम्स २६, सिकंदर राजा १००) गोलंदाजी : सोधी-३८/३. न्यूझीलंड : ४२.२ षटकांत बिनबाद २३६. गुप्टिल नाबाद ११६, लॅथम नाबाद ११०.