युकीची थरारक सलामी
By Admin | Updated: June 21, 2017 00:44 IST2017-06-21T00:44:03+5:302017-06-21T00:44:03+5:30
अत्यंत थरारक झालेल्या सामन्यात मॅच पॉइंट वाचवल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करताना भारताच्या युकी भांबरीने पीटर पोलेंस्की याला पराभवाचा धक्का दिला.

युकीची थरारक सलामी
इलक्ले (ग्रेट ब्रिटन) : अत्यंत थरारक झालेल्या सामन्यात मॅच पॉइंट वाचवल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करताना भारताच्या युकी भांबरीने पीटर पोलेंस्की याला पराभवाचा धक्का दिला. या रोमांचक विजयाच्या जोरावर युकीने एगॉन चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
बिगरमानांकित युकीने जबरदस्त लढवय्या खेळ करताना कॅनडाच्या पीटरला पहिल्या फेरीत ६-७, ७-६,
६-३ असे नमवले. दुसऱ्या सेटमधील टायब्रेकरमध्ये ६-७ असे पिछाडीवर पडल्यानंतर युकीने पीटरला मॅच पॉइंट जिंकण्याची संधी दिली. मात्र, याचवेळी युकीने हा निर्णायक पॉइंट जिंकताना सेट वाचवला आणि त्यानंतर दुसरा सेट जिंकताना सामन्यातील आव्हान कायम राखत सामना निर्णायक अंतिम तिसऱ्या सेटमध्ये नेला. तिसऱ्या सेटमध्ये मात्र युकीने तुफानी आक्रमक खेळ करताना पीटरला पुनरागमनाची फारशी संधी न देता सामन्यावर कब्जा केला.
दुसरीकडे, दुहेरी गटात जीवन नेदुनचेझियान - सर्जियो गाल्डोस यांचे आव्हान संपुष्टात आले. त्यांना आंद्रेई वासिलवस्की - हेन्स पोडलीप्निक कास्टिलो यांच्याविरुध्द ६-७, ६-७ असा पराभव पत्करावा लागला.