यू मुंबाचा विजयी ‘पंच’
By Admin | Updated: July 25, 2015 01:14 IST2015-07-25T01:14:36+5:302015-07-25T01:14:36+5:30
पहिल्या सत्रातील बचावात्मक खेळानंतर बलाढ्य यू मुंबाने अप्रतिम आक्रमक खेळ करताना यजमान बंगाल वॉरीयर्सला २९-२५ असे नमवत

यू मुंबाचा विजयी ‘पंच’
कोलकाता : पहिल्या सत्रातील बचावात्मक खेळानंतर बलाढ्य यू मुंबाने अप्रतिम आक्रमक खेळ करताना यजमान बंगाल वॉरीयर्सला २९-२५ असे नमवत प्रो कबड्डी लीग स्पर्धेत सलग पाचव्या विजयासह विजयी ‘पंच’ लगावला. यासह यू मुंबाने २५ गुणांसह अग्रस्थान मजबूत केले. तत्पूर्वी अटीतटीच्या लढतीत पुणेरी पलटनला सलग तिसऱ्या पराभवासह दबंग दिल्लीविरुध्द ३७-३८ अशी हार पत्करावी लागली.
यू मुंबा - बंगाल वोरीयर्स सामना पहिल्या १५ मिनीटात समान स्थितीमध्ये होता. मध्यंतराला यू मुंबाने ११-९ असे वर्चस्व राखले खरे, मात्र यजमानांनी जबरदस्त मुसंडी मारली. महेंद्र राजपूतने खोलवर चढाया केल्या. तर कर्णधार निलेश शिंदे आणि सचिन खांबे यांनी सुपर टॅकलसह मुंबईकरांना जेरीस आणले. बजीराव होडगेने देखील मजबूत पकडी केल्या.
याजोरावर बंगालने मुंबईवर २३-१६ अशी ७ गुणांची मजबूत आघाडी घेतली. मात्र नंतर मुंबई कर्णधार अनुप कुमारने आक्रमक चढायांच्या जोरावर सामनाच फिरवला. त्याने सलग दोन चढायांमध्ये अनुक्रमे ३ व २ गडी मारुन मुंबईचे पुनरागमन केले. जीवा कुमारने पुन्हा एकदा जबरदस्त पकडी करत मुंबईच्या विजयात मोलाचे योगदान दिले. अखेरच्या मिनिटाला मुंबईने २९-२५ अशी आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, थरारकर झालेल्या सामन्यातील शेवटच्या चढाईत दबंग दिल्लीच्या पकडीतून पुणेरी पलटणचा कर्णधार वझीर सिंग मध्यरेषेपर्यंत पोहचण्यात दोन इंच कमी पडल्याने पुण्याला दिल्ली विरुध्द ३७-३८ असा पराभव पत्करावा लागला. ३९व्या मिनिटांपर्यंत पुणेकर ३७-३६ असे आघाडीवर होते. मात्र ४०व्या मिनिटाला दिल्लीच्या काशिलिंग आडकेने निर्णायक चढाईत एक गुण मिळवत सामना बरोबरीत आणला.