युवा भारतीय संघाचा तिरंगी विजय

By Admin | Updated: November 30, 2015 00:56 IST2015-11-30T00:56:04+5:302015-11-30T00:56:04+5:30

गोलंदाज मयंक डागर (३२ धावांत ३ बळी) याची सुरेख गोलंदाजी आणि सर्फराज खान (नाबाद ५९) याची जबरदस्त अर्धशतकी खेळी या बळावर भारतीय संघाने रविवारी

Youth Indian team tri-series | युवा भारतीय संघाचा तिरंगी विजय

युवा भारतीय संघाचा तिरंगी विजय

कोलकाता : गोलंदाज मयंक डागर (३२ धावांत ३ बळी) याची सुरेख गोलंदाजी आणि सर्फराज खान (नाबाद ५९) याची जबरदस्त अर्धशतकी खेळी या बळावर भारतीय संघाने रविवारी येथे बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात तब्बल २१९ चेंडू राखून सात विकेट्सने विजय मिळवताना विजेतेपद पटकावले.
राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात जबरदस्त कामगिरी करताना भारतीय संघाने प्रतिस्पर्धी बांगलादेशकडून मिळालेले ११७ धावांचे सहज लक्ष्य २१९ चेंडू बाकी असताना १३.३ षटकांत ३ गडी गमावून सहज पूर्ण केले आणि ही मालिका जिंकली. लक्ष्याचा पाठलाग करताना सर्फराज खान आणि कर्णधार रिकी भुई यांनी चौथ्या गड्यासाठी ७५ धावांची मॅचविनिंग भागीदारी केली.
सर्फराजने २७ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५९ धावा केल्या, तर रिकीने २0 चेंडूंत ४ चौकारांसह नाबाद २0 धावांचे योगदान दिले. त्याआधी सलामीवीर वॉशिंग्टन सुंदरने १२ व रिषभ पंतने २६ धावा केल्या. अमनदीप खरे शून्यावर बाद झाला. बांगलादेशकडून सईद सरकारने २३ व मेंहदी हसन व सालेह अहमद शावोन याने प्रत्येकी १ गडी बाद केला.
त्याआधी बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला; परंतु भारतीय संघाच्या जबरदस्त गोलंदाजीसमोर यजमान संघ ३६.५ षटकांत फक्त ११६ धावांत गारद झाला. त्यांच्या चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही व एकूण सात फलंदाज दुहेरी आकडी धावसंख्याही पार करू शकले नाहीत.
बांगलादेशकडून नजमुल हुसैन शांतो याने ६६ चेंडूंत ५ चौकार, एका षटकारासह सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. याशिवाय जयराज शेखने २८ व जाकर अलीने २४ धावा केल्या.
भारताकडून डागरने ९ षटकांत ३२ धावा देत नजमल हुसैन (४५), मेहदी हसन (0) आणि मोहम्मद सैफद्दीन (0) यांना बाद केले. त्याला अन्य गोलंदाज शुभम मावी, महिपाल लोमरोर यांनी प्रत्येकी २ तर अवेश खान, खलील अहमद यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत साथ दिली. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक :
बांगलादेश : ३६.५ षटकांत सर्वबाद ११६. (नजमुल हुसैन ४५, जयराज शेख २८, जाकर अली २४. मयंक डागर ३/३२, महिपाल रोमरोर २/११, शुभम मावी २/२१).
भारत : १३.३ षटकांत ३ बाद ११७. (सर्फराज नाबाद ५९, रिषभ पंत २६, रिकी भुई २0)
द्रविड प्रशिक्षक असल्याचा विश्वास बसत नाही : सर्फराज
भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याविषयी पूर्ण श्रद्धा व्यक्त करताना उदयोन्मुख भारतीय फलंदाज सर्फराज खान याने त्याला हा माजी कर्णधार त्याचा प्रशिक्षक असल्याचा विश्वास बसत नसल्याचे म्हटले आहे.
बांगलादेशात २२ जानेवारी ते १४ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या अंडर १९ वर्ल्डकपआधी द्रविडचा संघावर विशेष खोलवर प्रभाव पडला आहे. हा प्रभाव बांगलादेशविरुद्ध अंतिम सामन्यातील सामनावीर सर्फराज असो अथवा मालिकावीर रिषभ पंत. त्यांच्यासाठी द्रविड प्रशिक्षक असणे हे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे.
सर्फराज म्हणाला, ‘‘आतापर्यंत मी त्यांना टीव्हीवर शतक झळकावताना पाहिले होते. ते आमचे प्रशिक्षक आहेत आणि आमच्या बरोबर आहेत यावर विश्वास बसणे माझ्यासाठी कठीण आहे. वर्ल्डकपच्या तयारीसाठी त्यांचा अनुभव महत्त्वाचा ठरेल असा मला पूर्ण विश्वास वाटतो. ते खूप शांतचित्त आहेत आणि हे त्यांच्यात विशेष आहे. त्यांनी कधीही मला मी धावा करीत नाही असे म्हटले नाही; परंतु प्रत्येक दिवशी शिकावे लागेल हे त्यांनी मला सांगितले. त्यांनी मला माझा नैसर्गिक खेळ करण्यास सांगितले. त्यांनी मला खूप मदत केली. मी त्यांचा ऋणी आहे.’’

Web Title: Youth Indian team tri-series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.