संयम दाखवावा लागेल
By Admin | Updated: July 20, 2016 04:48 IST2016-07-20T04:48:57+5:302016-07-20T04:48:57+5:30
भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे संथ खेळपट्ट्यांचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज आहे.

संयम दाखवावा लागेल
अॅन्टिग्वा : विंडीजविरुद्ध दोन सराव सामन्यांत संथ खेळपट्ट्यांवर खेळावे लागल्यानंतर कसोटी मालिका संघाला अशाच प्रकारच्या खेळपट्ट्यांवर खेळावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे संथ खेळपट्ट्यांचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज आहे.
सराव सामने अनिर्णीत संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी सोमवारी नेटमध्ये कसून सराव केला. २१ जुलैपासून खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी अंतिम संघात कुणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे.
सोमवारी सरावानंतर बोलताना रहाणे म्हणाला, ‘अॅन्टिग्वा येथील खेळपट्टी सराव सामन्याप्रमाणेच राहील असे वाटते. विंडीजमधील खेळपट्ट्या बऱ्याच अंशी भारतीय खेळपट्ट्यांप्रमाणे असतात. आम्ही बऱ्याच दिवसांपासून अशा प्रकारच्या खेळपट्ट्यांवर सराव करीत आहोत. यापूर्वीचा सराव सामना आम्ही अशाच प्रकारच्या खेळपट्टीवर खेळला आणि पहिला कसोटी सामनाही अशाच प्रकारच्या खेळपट्टीवर खेळला जाण्याची शक्यता आहे. संथ खेळपट्टीवर फलंदाजी करताना संयम राखणे महत्त्वाचे ठरते. धावा फटकावणे सोपे नसते. तळ ठोकून फलंदाजी केली तर धावा वसूल करता येतात. वेगवान गोलंदाजांना बळी घेण्यासाठी घाम गाळावा लागणार असून, फिरकी गोलंदाजांना महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार आहे.’
रहाणेने प्रशिक्षक कुंबळे यांची प्रशंसा करताना म्हटले की, ‘कुंबळे यांचा अनुभव संघासाठी उपयुक्त ठरेल.’ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेचा उल्लेख करताना रहाणे म्हणाला, येथील खेळपट्ट्यांवर २० बळी घेणे सोपे नाही. त्यासाठी गोलंदाजांना वेळ देणे आवश्यक आहे. संघाची फलंदाजीची बाजू मजबूत आहे.’
विंडीज संघाबाबत बोलताना रहाणे म्हणाला, ‘प्रतिस्पर्धी संघाचा आदर करायला हवा. विंडीज संघात कार्लोस ब्रेथवेट, होल्डर, गॅब्रियल आणि बिशू यांच्यासारखे खेळाडू आहेत. त्यांचे गोलंदाजी आक्रमण आव्हानात्मक आहे. आम्हाला पूर्ण क्षमतेने खेळावे लागेल.’ (वृत्तसंस्था)
>वेगवान गोलंदाजांसाठी येथे खेळणे आव्हान ठरणार आहे; पण सराव सामन्यांत आमच्या गोलंदाजांनी संयम दाखवला. ९० षटके दिशा व टप्पा अचूक राखणे गरजेचे आहे. गेल्या सराव सामन्यात अमित मिश्रा व रवींद्र जडेजा यांनी चांगली गोलंदाजी केली.
- अजिंक्य रहाणे