योगेश्वरचे ऐतिहासिक सुवर्ण
By Admin | Updated: September 29, 2014 06:39 IST2014-09-29T06:39:22+5:302014-09-29T06:39:22+5:30
स्टार मल्ल योगेश्वर दत्तने रविवारी १७ व्या आशियाई स्पर्धेत भारताला चौथे सुवर्ण मिळवून दिले, तर खुशबीर कौरने २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक पटकाविले

योगेश्वरचे ऐतिहासिक सुवर्ण
इंचियोन : स्टार मल्ल योगेश्वर दत्तने रविवारी १७ व्या आशियाई स्पर्धेत भारताला चौथे सुवर्ण मिळवून दिले, तर खुशबीर कौरने २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक पटकाविले. खुशबीर चालण्याच्या शर्यतीत पदक पटकाविणारी भारतीय पहिली महिला अॅथलिट ठरली. भारताने पदकतालिकेत नवव्या स्थानावर उडी घेतली. याव्यतिरिक्त टेनिसपटूंनी तीन कांस्य पदकांची कमाई केली, तर धावपटू पूवम्माने महिलांच्या ४०० मीटर दौड स्पर्धेत, तर पुरुष विभागात राजीव अरोकियाने कांस्यपदक पटकाविले. मंजू बालाने महिलांच्या हॅमर थ्रोमध्ये कांस्यपदकाचा मान मिळविला.
टेनिसमध्ये युकी भांबरीने पुरुष एकेरीव्यतिरिक्त दिविज शरणच्या साथीने पुरुष दुहेरीमध्ये कांस्यपदक पटकाविले, तर स्टार खेळाडू सानिया मिर्झा व प्रार्थना ठोंबरे जोडीने महिला दुहेरीत कांस्य पदकाचा मान मिळविला. शनिवारी १० पदके पटकाविणाऱ्या भारतासाठी रविवारचा दिवसही समाधानकारक ठरला. भारत या स्पर्धेत अव्वल १० मध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी ठरला. आज, रविवारी आठ पदकांची कमाई करणारा भारत पदकतालिकेत नवव्या स्थानी आहे. त्यात चार सुवर्ण, पाच रौप्य व २६ कांस्यपदकांचा समावेश आहे. चीनने अव्वल स्थान कायम राखले आहे. १०५ सुवर्ण, ६३ रौप्य व ४८ कांस्य पदकांसह एकूण २१६ पदकांची कमाई करीत चीन अव्वल स्थानावर आहे. यजमान दक्षिण कोरिया (४२ सुवर्ण, ४८ रौप्य, ४७ कांस्य) दुसऱ्या, तर जपान (३४ सुवर्ण, ४६ रौप्य व ४६ कांस्य) तिसऱ्या स्थानी आहे.
भारताला आगामी दिवसांमध्ये अधिक पदकांची आशा आहे. बॉक्सिंगमध्ये महिला विभागात भारतीय बॉक्सर्सनी तीन गटांत पदक पक्के केले आहे. टेनिसमध्ये सनम सिंग व साकेत माइनेनी यांनी पुरुष दुहेरीच्या, तर साकेत व सानिया यांनी मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारताना किमान रौप्यपदक निश्चित केले आहे.
कुस्ती : योगेश्वरला सुवर्ण
योगेश्वर दत्त आजचा हिरो ठरला. २००६ मध्ये कांस्यपदक पटकाविणाऱ्या योगेश्वरने यावेळी सुवर्णपदकावर नाव कोरले. आॅलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर उपांत्य फेरीच्या लढतीत पिछाडीवर होता, पण अखेरच्या क्षणी चमकदार कामगिरी करीत योगेश्वर अंतिम फेरीत स्थान मिळविण्यात यशस्वी ठरला. अंतिम फेरीत योगेश्वरने ताजिकिस्तानच्या जालिमखान युसुपोव्हचा पराभव करीत सुवर्णपदक पटकाविले.
टेनिस : साकेतला दुहेरी सुवर्ण पटकाविण्याची संधी
साकेत मयनेनीने पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारताना दुहेरी सुवर्णपदक पटकाविण्याच्या दिशेने वाटचाल केली. सानिया मिर्झासह अन्य भारतीय टेनिसपटूंनी आज आशियाई स्पर्धेत तीन कांस्यपदकांची कमाई केली. टेनिसमध्ये पुरुष एकेरीत युकी भांबरीने भारताला एकमेव पदक मिळवून दिले. युकीला उपांत्य फेरीत जपानच्या योशिहितो निशिओकाविरुद्ध ६-३, २-६, १-६ ने पराभव स्वीकारावा लागल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. सानिया मिर्झा व प्रार्थना ठोंबरे यांनी महिला दुहेरीमध्ये कांस्यपदक पटकाविले. पाचव्या मानांकित भारतीय जोडीला उपांत्य फेरीत चिनी ताइपेच्या चिन वेई चान व सु वेई सिहिन या दुसऱ्या मानांकित जोडीविरुद्ध ७-६, २-६, ४-१० ने पराभव स्वीकारावा लागला. पुरुष दुहेरीमध्ये युकी व त्याचा सहकारी दिविज शरण यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत युकी-दिविज शरण यांना योंगक्सू लिम व हियोन चुंग यांच्याविरुद्ध ६-७, ७-६, ९-११ ने पराभव स्वीकारावा लागला.
साकेत व समन सिंग यांनी पुरुष दुहेरीच्या उपांत्य लढतीत थायलंडच्या सांचेई रतिवातना व सोनचाट रतिवातना या जोडीचा ४-६, ६-३, १०-६ ने पराभव केला. त्यानंतर साकेतने अनुभवी सानिया मिर्झाच्या साथीने चीनच्या झी झेंग व झे झांग यांचा ६-१, ६-३ ने पराभव करीत मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
तिरंदाजी : महिला संघ पराभूत
भारतीय महिला रिकर्व्ह तिरंदाजी संघाला कांस्यपदकाच्या लढतीत शूटआॅफमध्ये जपानविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
कॅनोइंग, कयाकिंग : भारतीयांची
चमकदार कामगिरी
भारतीय खेळाडूंनी कॅनोइंग व कयाकिंग स्पर्धेत चमक दाखविली. ११ पैकी ६ गटांत अंतिम फेरीत स्थान मिळविले. भारताने पुरुष विभागात पाच, तर महिला विभागात एका गटात अंतिम फेरीत स्थान मिळविले. गौरव तोमरने पुरुषांच्या १००० मीटर सी-१ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अव्वलस्थान पटकाविले, तर एस. अजित कुमार व राजीव रावत यांनी पुरुषांच्या १००० मीटर सी-२ मध्ये दुसरे स्थान पटकाविले.
हँडबॉल : निराशाजनक कामगिरी
हँडबॉलमध्ये भारतीय पुरुष व महिला संघांना क्लासिफिकेशन लढतींमध्ये पराभव स्वीकारावा लागला. पुरुष संघाला १३ व १४ व्या स्थानासाठी झालेल्या लढतीत संयुक्त अरब अमिरातविरुद्ध २५-३२ ने पराभव स्वीकारावा लागला, तर महिला संघाला पाचव्या व आठव्या स्थानासाठी झालेल्या लढतीत उझवेकिस्तानविरुद्ध ४४-२६ ने पराभव स्वीकारावा लागला. महिला संघाला आता सातव्या-आठव्या स्थानासाठी ३० सप्टेंबरला खेळावे लागणार आहे.
व्हॉलिबॉल : पुरुष संघ पराभूत
व्हॉलिबॉल स्पर्धेत पुरुष संघाला ‘ई’ गटाच्या प्ले आॅफ लढतीत यजमान दक्षिण कोरियाविरुद्ध २२-२५, २५-२७, १८-२५ ने पराभव स्वीकारावा लागला. महिला बास्केटबॉल संघाला उपांत्यपूर्व फेरीत चीनविरुद्ध ३७-७० ने पराभव स्वीकारावा लागला.
कबड्डीत भारताची
चमकदार सलामी
कबड्डी स्पर्धेत भारतीय संघांनी उभय गटांमध्ये अपेक्षेप्रमाणे चमकदार सुरुवात केली. पुरुष व महिला संघांनी आपापल्या गटात सलामी सामन्यात बांगलादेशचा पराभव केला. महिला संघाने ‘अ’ गटात बांगलादेशवर २९-१८ ने मात केली तर पुरुष संघाने ‘अ’ गटात बांगलादेशविरुद्ध ३०-१५ ने सरशी साधली.
गोल्फ : माने चौथ्या स्थानी
भारताच्या उदयन माने याला आशियाई खेळामध्ये गोल्फ स्पर्धेत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागल्यामुळे त्याचे पदक पटकाविण्याचे स्वप्न भंगले. मानेने दुसऱ्या फेरीत ६६चे कार्ड खेळताना पदकाच्या शर्यतीत उडी मारली. मात्र, आज ३ अंडर ६९ चे कार्ड खेळताना त्याला ११ अंडर २७७ च्या कार्डसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.