नरसिंगलाच पाठवण्यावर कुस्ती महासंघ कायम
By Admin | Updated: May 19, 2016 05:24 IST2016-05-19T05:24:59+5:302016-05-19T05:24:59+5:30
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग, सुशीलकुमार व नरसिंग यादव यांच्यात बुधवारी बैठक झाली.

नरसिंगलाच पाठवण्यावर कुस्ती महासंघ कायम
नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकसाठी ७४ किलो फ्री स्टाईल प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणत्या मल्लाला पाठवायचे, याचा निर्णय घेण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग, सुशीलकुमार व नरसिंग यादव यांच्यात बुधवारी बैठक झाली. बैठकीनंतर महासंघ आपल्या पहिल्याच निर्णयावर ठाम असल्याचे सांगून चाचणीसंदर्भातील आपली भूमिका २७ मे रोजी न्यायालयात मांडणार असल्याचे बृजभूषण सिंग यांनी सांगितले.
कुस्ती महासंघाच्या दिल्ली येथील मुख्य कार्यालयात दीड तास ही बैठक चालली. बैठकीत कुस्ती महासंघाचे सचिव व्ही.एन. प्रसून, वरिष्ठ उपाध्यक्ष आय.डी. नानावटी, मुख्य प्रशिक्षक जगमिंदर व सुशीलकुमारचे प्रशिक्षक गुरू सतपाल उपस्थित होते. ज्या कुस्तीपटूने आॅलिम्पिक कोटा मिळवला आहे, त्यालाच आॅलिम्पिकला पाठवण्याच्या आपल्या पूर्वीच्या निर्णयावर कुस्ती महासंघाने ठाम राहायचा निर्णय घेतला आहे.
या बैठकीनंतर बृजभूषण सिंग म्हणाले, ‘सुशीलकुमारने आमच्यासमोर त्याची बाजू मांडली. आम्ही त्याची बाजू लक्षपूर्वक ऐकून घेतली. मी स्वत: त्याला म्हणालो की, तू माझ्या जागी असता तर काय केले असते? सुशीलकुमार देशातील मोठा कुस्तीपटू आहे. त्याने दिलेल्या योगदानाला कोणीही नाकारणार नाही. मात्र, दुसरीकडे नरसिंगने सातत्याने चांगली कामगिरी केलेली आहे. त्याने देशाला आॅलिम्पिकसाठीचा कोटा मिळवून दिला आहे. त्यामुुळे त्याच्यावर आम्ही अन्याय करू शकत नाही.’ चाचणीसंदर्भात ते म्हणाले, ‘आम्ही पूर्वीच्याच भूमिकेवर ठाम असून याबाबतची भूमिका आम्ही २७ मे रोजी न्यायालयात मांडू. चाचणीसंदर्भात आता काहीच सांगता येणार नाही.’
>चाचणीसाठी तयार नाही
बृजभूषण सिंग यांनी चाचणीला तयार नसल्याचेच संकेत याद्वारे दिले. ते म्हणाले, ‘कुस्ती महासंघ कोणत्याही एका व्यक्तीसाठी काम करत नाही. मी कधीही सुशीलला चाचणीसाठी शब्द दिलेला नाही.
नरसिंगने सातत्याने चांगली कामगिरी केलेली असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सुशीलने बैठकीत चाचणीचा मुद्दा उपस्थित केलेला. आता आम्हाला आमची भूमिका न्यायालयात मांडायची आहे.