भारताच्या अंशू मलिकला रौप्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 02:21 IST2020-12-18T02:21:08+5:302020-12-18T02:21:27+5:30

वैयक्तिक कुस्ती विश्व कप स्पर्धेत पदकाची मानकरी ठरलेली एकमेव भारतीय महिला मल्ल

Wrestler Anshu Maliks silver at World Cup | भारताच्या अंशू मलिकला रौप्य

भारताच्या अंशू मलिकला रौप्य

बेलग्रेड : युवा अंशू मलिकने ५७ किलो वजन गटात रौप्यपदक पटकावत वैयक्तिक कुस्ती विश्व कप स्पर्धेत पदकाची मानकरी ठरलेली एकमेव भारतीय महिला मल्ल ठरली. ज्युनिअर गटात ओळख निर्माण केल्यानंतर सीनिअर गटात खेळत असलेल्या अंशूने या स्तरावर तीन स्पर्धेत पदकाचा मान मिळवला. बुधवारी रात्री झालेल्या अंतिम लढतीत अंशूला मालदाेवाच्या अनास्तासिया निचिताविरुद्ध १-५ ने पराभव स्वीकारावा लागला. अंशूने यंदा नवी दिल्ली आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले होते तर जानेवारीमध्ये रोमध्या मातियो पेलिकोन स्पर्धेत रौप्यपदकाचा मान मिळवला होता. अंशूने ५७ किलो वजनगटात विश्व चॅम्पियनशिपची पदक विजेता पूजा ढांडा व अनुभवी सरिता मोर यांच्या उपस्थितीनंतरही या गटात आपला दावा मजबूत केला आहे.

भारतीय मल्लाने आपल्या मोहिमेची सुरुवात अजरबेजानच्या एलयोना कोलेसनिकविरुद्ध ४-२ ने विजय मिळवित केली त्यानंतर क्वॉर्टर फायनलमध्ये जर्मनीच्या लॉरा मर्टेन्सचा ३-१ ने पराभव केला. अंशूने उपांत्य फेरीत रशियाच्या वेलोनिका चुमिकोव्हाला चित केले. एक अन्य भारतीय मल्ल पिंकीनेही ५५ किलो वजन गटात उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत पिंकीला बेलारुसच्या इरीना कुराचकिनाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. पिंकीला त्यानंतर कांस्यपदकाच्या लढतीत रशियाच्या ओल्गा खोरोशावत्सेव्हाविरुद्ध तांत्रिक आधारावर पराभवाला सामोरे जावे लागले. सरिता (५९ किलो), सोनम मलिक (६२) आणि साक्षी मलिक (६५) यांना आपापल्या गटात उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे मजल मारता आली नाही. अनुभवी गुरशरणप्रीतने ७२ किलो गटात रेपेचेज गटात स्थान मिळवले, पण तांत्रिक दक्षतेच्या आधारावर तिला येवगेनिया जखारचेनकोविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. 

नरसिंग यादव, रवी दहिया यांचे आव्हान संपुष्टात
डोपिंगमुळे चार वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन करणाऱ्या नरसिंग यादवचे  विश्वचषक कुस्ती स्पर्धेत पात्रता फेरीत आव्हान संपुष्टात आले. तसेच, टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट पक्के करणाऱ्या रवी दहिया हाही प्रारंभीच स्पर्धेतून बाद झाला. या स्पर्धेत नरसिंग यादव फ्री स्टाईल गटाच्या ७४ किलो वजन गटात खेळला. या गटात भारताने आतापर्यंत ऑलिम्पिक कोटा मिळवलेला नाही. 

Web Title: Wrestler Anshu Maliks silver at World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.