विश्वकप स्पर्धेपूर्वी तिरंगी मालिका म्हणजे वेळेचा अपव्यय
By Admin | Updated: March 3, 2015 23:43 IST2015-03-03T23:43:30+5:302015-03-03T23:43:30+5:30
विश्वकप स्पर्धेपूर्वी आयोजित तिरंगी मालिका म्हणजे वेळेचा व शक्तीचा अपव्यय होता, असे मत भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

विश्वकप स्पर्धेपूर्वी तिरंगी मालिका म्हणजे वेळेचा अपव्यय
पर्थ : विश्वकप स्पर्धेपूर्वी आयोजित तिरंगी मालिका म्हणजे वेळेचा व शक्तीचा अपव्यय होता, असे मत भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. तिरंगी मालिकेमुळे मानसिकदृष्ट्या भारतीय संघ थकलेला असतानाही विश्वकप स्पर्धेत टीम इंडिया लौकिकाला साजेशी कामगिरी करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
शास्त्री म्हणाले, ‘‘तिरंगी मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर मिळालेला ‘ब्रेक’संघासाठी वरदान ठरला. तिरंगी मालिकेनंतर संघ मानसिकदृष्ट्या थकलेला होता. खेळाडूंमध्ये नव्याने जोश निर्माण करणे आवश्यक होते. क्रिकेटपासून विश्रांती त्यांच्यासाठी वरदान ठरली. माझ्या मते तिरंगी मालिकेमुळे वेळ व ऊर्जा वाया गेली.’’ विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाला सूर गवसल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असले तरी शास्त्री यांना मात्र खेळाडूंच्या क्षमतेवर विश्वास होता. खेळाडूंनी शास्त्रींचा विश्वास आतापर्यंत सार्थ ठरविला आहे.