विश्वकप नेमबाजी : जीतू रायचे दमदार पुनरागमन

By Admin | Updated: February 28, 2017 18:28 IST2017-02-28T18:28:15+5:302017-02-28T18:28:15+5:30

भारताचा अव्वल पिस्तूल नेमबाज जीतू रायने दमदार पुनरागमन करताना मंगळवारी १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.

World Cup shooting: Jitu Rai's backing up | विश्वकप नेमबाजी : जीतू रायचे दमदार पुनरागमन

विश्वकप नेमबाजी : जीतू रायचे दमदार पुनरागमन

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 -  भारताचा अव्वल पिस्तूल नेमबाज जीतू रायने दमदार पुनरागमन करताना मंगळवारी १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. आयएसएसएफ विश्वकप नेमबाजी स्पर्धेत भारताचे हे तिसरे पदक ठरले.
२९ वर्षीय जीतूने ८ नेमबाजांच्या फायनलमध्ये एकूण २१६.७ गुणांची नोंद करीत तिसरे स्थान पटकावले. चैन सिंगला मात्र पदकाची भर घालता आली नाही. पुरुषांच्या ५० मीटर रायफल प्रोन स्पर्धेत त्याला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने १४१.९ गुणांची नोंद केली. आशियाई स्पर्धा व विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदकाचा मान मिळवणारा जीतू पहिल्या सीरिजमध्ये सातव्या स्थानी होती. त्यात ८.८ च्या स्कोअरचा समावेश होता, पण त्याने दुस-या सीरिजमध्ये दोनदा १०.६ व एकदा १० गुणांची नोंद करीत पुनरागमन केले. या सीरिजअखेर जीतू ९८.७ गुणांसह सहाव्या स्थानी दाखल झाला.
डॉ.कर्णीसिंग शुटिंग रेंजमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत त्याने फायनलमध्ये एलिमिनेशन राऊंडपर्यंत कामगिरीत सातत्य राखले. त्याने दोनदा १० गुणांची नोंद करीत आघाडीच्या दिशेने वाटचाल कायम राखली. सेनादलाच्या या नेमबाजाने दोनदा पुन्हा १०.६ गुण वसूल करीत स्वत:ला पदकाच्या शर्यतीत कायम राखले. त्याने ९.९ गुणांची नोंद करीत कांस्यपदक निश्चित केले. तो चीनच्या झनई जू (१९७.९) याच्या तुलनेत आघाडीवर राहिला.
जीतू व्हिएयतनामच्या जुआंग विंह होआंगच्या तुलनेत ०.१ गुणांनी आघाडीवर असताना रौप्यपदकाच्या शर्यतीत होता, पण ८.६ गुणांमुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. जीतू म्हणाला,‘सुरुवातीला मला सूर गवसला नाही. त्यावेळी मी पदक पटकावू शकेल, असे वाटले नव्हते. त्यानंतर मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा निर्धार केला व अखेरपर्यंत लढत दिली. सुरुवातीच्या निराशाजनक कामगिरीचा माझ्यावर सकारात्मक प्रभाव झाला. त्यामुळे माझ्यावरील दडपण कमी झाले. मी स्कोअरबोर्डबाबत अधिक विचार करीत नाही. कारण त्यामुळे मनोधैर्य ढासळते.
मी केवळ लक्ष्य साधण्यावर लक्ष केंद्रित केले. मी अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवण्याचा विचार करीत नव्हतो. दोन तीन खराब शॉटनंतर दडपण कमी झाले. सुरुवातीला झालेल्या चुकांपासून बोध घेतला. आॅलिम्पिकनंतर हे माझे तिसरे आंतरराष्ट्रीय पदक आहे. मी विश्वकप फायनलमध्ये रौप्यपदक पटकावले होते आणि चॅम्पियन्स आॅफ चॅम्पियन्स होतो. त्याआधी, विश्वकप स्पर्धेत आणखी एक सुवर्णपदक पटकावले होते.’
निराशाजनक सुरुवातीनंतर पदकाच्या शर्यतीत दाखल होण्याबाबत बोलताना जीतू म्हणाला, कोरियाच्या चांगवान विश्वकप स्पर्धेतील असाच अनुभव होता. मी चांगली कामगिरी करीत सलग १० शॉट लगावत अंंतिम फेरीत आगेकूच केली. मी शेवटपर्यंत पराभव स्वीकारत नाही.’
जपानच्या तोमोयुकी मातसुदाने २४०.१ गुणांसह विश्वविक्रम नोंदवता सुवर्णपदक पटकावले. व्हिएतनामचा होआंग २३६.६ गुणांसह रौप्यपदकाचा मानकरी ठरला. दोन अन्य भारतीय नेमबाज ओमकार सिंग व अमनप्रीत सिंग एअर पिस्तूल स्पर्धेत सहभागी झाले होते, पण त्यांना पात्रता फेरीचा अडथळा पार करता आला नाही. त्यांना अनुक्रमे १४ व १९ व्या स्थानांवर समाधान मानावे लागले. 

Web Title: World Cup shooting: Jitu Rai's backing up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.