आॅसी ‘अ’ने मालिका जिंकली
By Admin | Updated: August 2, 2015 01:47 IST2015-08-02T01:47:44+5:302015-08-02T01:47:44+5:30
आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाने दुसऱ्या अनधिकृत चार दिवसीय कसोटीत वर्चस्व कायम राखून भारत ‘अ’चा शनिवारी १० गड्यांनी पराभव केला आणि दोन सामन्यांची मालिका १-० ने जिंकली.

आॅसी ‘अ’ने मालिका जिंकली
चेन्नई : आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाने दुसऱ्या अनधिकृत चार दिवसीय कसोटीत वर्चस्व कायम राखून भारत ‘अ’चा शनिवारी १० गड्यांनी पराभव केला आणि दोन सामन्यांची मालिका १-० ने जिंकली.
अखेरच्या दिवशी ६ बाद २६७ वरून पुढे खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दुसऱ्या डावात २७४ पर्यंत मजल गाठली. आॅस्ट्रेलियाकडून गुरिंदर संधूने ७६ धावांत ४ गडी बाद करताच पहिल्या अर्ध्या तासात भारताचे तळाचे फलंदाज बाद झाले. संधूने श्रेयस गोपालला शून्यावर, वरुण अॅरोन १ आणि बाबा अपराजितला ३० धावांवर तंबूची वाट दाखविली. डावखुरा फिरकी गोलंदाज स्टीव्ह ओकिफेने ८८ धावांत ४ गडी बाद केले. शार्दूल ठाकूर बाद होताच भारताचा डाव संपला.
विजयासाठी ६१ धावांचे लक्ष्य होते. सलामीचा कॅमेरुन बेनक्राफ्टने नाबाद २१ आणि कर्णधार उस्मान ख्वाजाने नाबाद ४१ धावा करीत आॅस्ट्रेलियाचा विजय साजरा केला. सामन्यात संधूने सात, ओकिफेने सहा गडी बाद केले. पहिल्या डावात १५० धावा ठोकणारा बेनक्राफ्ट विजयाचा शिल्पकार ठरला. भारताने पहिल्या डावात केवळ १३५ धावा केल्या तर आॅस्ट्रेलियाने २४९ धावा करीत ११४ धावांची आघाडी मिळविली होती. भारत अ कडून बाबा अपराजितने ५ गडी बाद केले. विराट कोहलीने लंका दौऱ्याची तयारी म्हणून या सामन्यात खेळण्याचा निर्णय घेतला. त्याने १६ आणि ४५ धावा केल्या. उभय संघांत झालेला पहिला सामना अनिर्णीत राहिला होता. (वृत्तसंस्था)
पहिला डाव - भारत अ सर्वबाद १३५ - मुकुंद १५, कोहली १६, नायर ५०.
गोलंदाजी - संधु ३/२५, फेकटे २/३३, ओ, किफ २/३०, एगर २ /३३);
दुसरा डाव - भारत अ - २७४; अभिनव मुकूंद ५९, विराट कोहली ४५, के. नायर ३१, श्रेयस अय्यर ४९; गोलंदाजी - संधू ४/७९, ओ, कीफ ४ / ८८, एगर १/७१; आॅस्ट्रेलिया अ पहिला डाव : सर्वबाद ३४९; बॅनक्रॉफ्ट १५०, उस्मान ख्वाजा ३३, फर्गसन ५४, संधु ३६; प्रग्यान ओझा ३/१०७, बाबा अपराजीत ५ /८६ गोपाल १/६९; आॅस्ट्रेलिया अ दुसरा डाव - बिनबाद ६२; बॅनक्राफ्ट नाबाद २१, उस्मान ख्वाजा नाबाद ४१.