महिला गटात पुण्याने राखले विजेतेपद
By Admin | Updated: December 26, 2014 01:52 IST2014-12-26T01:52:05+5:302014-12-26T01:52:05+5:30
पुण्याच्या स्नेहल शिंदे व लविना गायकवाड व आम्रपाली गलांडे यांच्या चौफेर चढाया आणि सायली केरीपाळे व किशोरी शिंदेच्या अफलातून

महिला गटात पुण्याने राखले विजेतेपद
पुणे : पुण्याच्या स्नेहल शिंदे व लविना गायकवाड व आम्रपाली गलांडे यांच्या चौफेर चढाया आणि सायली केरीपाळे व किशोरी शिंदेच्या अफलातून पकडींमुळे पुणे जिल्हा संघाने मुंबई उपनगर संघाचा पराभव करून राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत ९व्यांदा विजेतेपद राखत पार्वतीबाई सांडव चषक जिंकला. पुरुष गटात मुंबई उपनगरने पुण्याचा पराभव करून विजेतेपदासह श्रीकृष्ण करंडक जिंकला.
धनकवडी येथे तीन हत्ती चौकातील क्रीडांगणावर संपलेल्या या स्पर्धेतील महिलांच्या अंतिम लढतीत पुणे संघाने मुंबई उपनगर संघाचा ३५ -२० असा दणदणीत पराभव केला. पुण्याच्या स्नेहल शिंदे, लविना गायकवाड आणि आम्रपाली गलांडे यांच्या चौफेर चढायांपुढे मुंबई संघाच्या खेळाडू टिकाव धरू शकल्या नाहीत. पुणे संघाने संपूर्ण सामन्यात ४ बोनस व गुण वसूल करीत उपनगर संघावर १ लोणही चढवला. मुंबई उपनगरच्या आश्विनी शेवाळे हिने खोलवर चढाया करून प्रतिकार केला. तिला राजश्री पवार हिने उत्कृष्ट साथ मिळाली; मात्र त्या आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत.
पुरुष विभागात मुंबई उपनगर संघाने पुणे जिल्हा संघाचा १७-११ गुणांनी पराभव करीत विजेतेपद जिंकले. मुंबई उपनगरच्या रिशांक देवाडीगा व नीलेश शिंदे या अनुभवी खेळाडंूनी पुण्याच्या खेळाडूंचे सर्व डावपेच उधळून लावले. उपनगरच्या रिशांक देवाडीगा याने जोरदार चढाया करीत पुणे संघावर दबाव वाढविला. या जाळ्यात पुण्याचा संघ नेमका अडकत एक-एक गडी बाद होत गेला. त्यामुळे उपनगरला हा सामना जिंकणे सोपे गेले. पुण्याच्या अक्षय जाधव याने काहीसा प्रतिकार केला; मात्र तो तोकडा पडला. (क्रीडा प्रतिनिधी)