महिला संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
By Admin | Updated: May 18, 2016 06:08 IST2016-05-18T06:08:19+5:302016-05-18T06:08:19+5:30
भारतीय महिला संघाने कामगिरीत सातत्य राखताना मंगळवारी जर्मनीचा ५-० ने धुव्वा उडवला आणि उबेर कप बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला

महिला संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
कुनशान (चीन) : सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू या स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय महिला संघाने कामगिरीत सातत्य राखताना मंगळवारी जर्मनीचा ५-० ने धुव्वा उडवला आणि उबेर कप बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला, पण पुरुष संघाला सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागल्यामुळे त्यांचे थॉमस कप स्पर्धेतील आव्हान जवळजवळ संपुष्टात आले आहे.
महिला संघाने ‘ड’ गटात सोमवारी आॅस्ट्रेलियाचा ५-० ने पराभव केला होता तर मंगळवारी जर्मनीवर ५-० ने वर्चस्व गाजवले. स्पर्धेत प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहे. पुरुष संघाला हाँगकाँगविरुद्ध २-३ ने पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वी पुरुष संघाला थायलंडविरुद्ध २-३ ने पराभव स्वीकारावा लागला होता.
जागतिक महिला बॅडमिंटन क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या सायनाने फॅबियन दैप्रेजचा २९ मिनिटांमध्ये २१-१५, २१-१६ ने पराभव केला. एकेरीच्या दुसऱ्या लढतीत १० व्या मानांकित सिंधूने चमकदार कामगिरी करताना लुईस हेमचे आव्हान केवळ २६ मिनिटांमध्ये २१-७, २१-१२ ने मोडून काढले. महिला दुहेरीमध्ये ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा जोडीने लिंडा एफलर व लारा कॅपलेन या जोडीवर ४१ मिनिटांमध्ये १४-२१, २१-९, २१-८ ने संघर्षपूर्ण विजय मिळवत भारताला ३-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली. एकेरीच्या तिसऱ्या लढतीत रित्विका शिवानी गाडेने योन लीचा २७ मिनिटांमध्ये २१-५, २१-१५ ने पराभव केला. दुहेरीच्या दुसऱ्या लढतीत एन. सिक्की रेड्डी व पी.व्ही. सिंधू या जोडीने इसाबेल हर्टरिच व फ्रान्सिस्का वोल्कमॅन यांचा ५६ मिनिटांमध्ये २१-१८, १९-२१, २२-२० ने पराभव करीत भारताला ५-० ने विजयावर शिक्कामोर्तब करून दिले.
थॉमस कप स्पर्धेत भारतीय पुरुष संघाची कामगिरी निराशाजनक ठरली. भारतााला हाँगकाँगविरुद्ध २-३ ने पराभव स्वीकारावा लागला. भारतीय खेळाडूंनी संघर्षपूर्ण खेळ केला, पण अनुकूल निकाल मिळवता आला नाही. यामुळे भारताची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची आशा जवळजवळ संपुष्टात आली. (वृत्तसंस्था)