विजेतेपद पाकला चांगल्या भविष्याचा मार्ग दाखवेल
By Admin | Updated: June 21, 2017 00:59 IST2017-06-21T00:59:14+5:302017-06-21T00:59:14+5:30
पाकिस्तान संघाने आपल्या योग्यतेच्या आधारावर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. त्यांच्या या यशाकडे ‘केवळ एक चांगला दिवस’ म्हणून डोळेझाक करता येणार नाही

विजेतेपद पाकला चांगल्या भविष्याचा मार्ग दाखवेल
सौरव गांगुली लिहितात...
पाकिस्तान संघाने आपल्या योग्यतेच्या आधारावर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. त्यांच्या या यशाकडे ‘केवळ एक चांगला दिवस’ म्हणून डोळेझाक करता येणार नाही. केवळ एका दिवसाच्या यशामध्ये वारंवार चमत्कार होत नाहीत, पण पाकिस्तानने ज्याप्रमाणे दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंग्लंड आणि त्यानंतर मजबूत भारतीय संघांचा पराभव केला, ते म्हणजे त्यांनी घेतलेली मेहनत व शानदार खेळाचा परिणाम आहे.
‘सरफराज अँड कंपनी’ला या यशाचे श्रेय द्यायलाच हवे. कारण त्यांनी एकदाच नाही तर चारवेळा दडपणाच्या स्थितीमध्ये प्रतिष्ठेच्या लढतींमध्ये विजय मिळवला आहे. संघाची सुरुवात एका निराशाजनक पराभवाने झाली होती. त्यानंतर पुनरागमन करीत जेतेपद पटकावणे सोपे काम नाही. त्यासाठी बेदरकार वृत्तीची गरज असते. पाक संघातील खेळाडूंमध्ये ती दिसून आली.
हे यश म्हणजे पाकिस्तानमध्ये दर्जेदार क्रिकेट परतण्याचे संकेत मानायचे का, हो, तशी आशा करायला हरकत नाही. क्रिकेट जगताला बलाढ्य पाकिस्तान व विंडीज संघांची गरज आहे. त्यामुळे या खेळाची रंगत वाढण्यास मदत मिळेल. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास सध्याच्या घडीला चारच चांगले संघ आहेत. त्यात भारत, आॅस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.
अन्य संघही मजबूत व्हायला पाहिते. त्यामुळे याला एक चांगली सुरुवात म्हणता येईल.
पाकिस्तानने नेहमीच जागतिक क्रिकेटला प्रतिभावान खेळाडू दिले आहेत. हा संघ नेहमी निराशाजनक स्थितीतून सावरत जागतिक पातळीवर आपला ठसा उमटविण्यात यशस्वी ठरला. अनिश्चितता पाकिस्तान क्रिकेटची ओळख राहिली आहे. त्यांनी रविवारी सर्व भाकीत खोटे ठरविताना जेतेपदाला गवसणी घातली. संघात प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यात हसन अली एक निसर्गदत्त प्रतिभा लाभलेला खेळाडू आहे.
निवड समितीचे प्रमुख इंजमाम या युवा खेळाडूंना मार्गदर्शन करीत योग्य वाट दाखवतील आणि त्यामुळे बलाढ्य संघ म्हणून नावलौकिक मिळवण्यास मदत होईल. पाक संघाला गेली अनेक वर्षे मायदेशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता आलेले नाही. त्यामुळे त्यांना प्रतिभा शोधण्यास अडचण भासत आहे. या विजेतेपदामुळे युवा क्रिकेटपटू पुढे येतील, अशी आशा आहे.
लढतीबाबत चर्चा करताना भारतीय संघाला कमी लेखणे चुकीचे आहे. या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी शानदार होती आणि अंतिम लढतीत त्यांना चांगल्या संघाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. बुमराहच्या त्या ‘नो-बॉल’बाबत बरेच चर्वितचर्वण झाले आहे. हो, त्या नो-बॉलमुळे भारताला मोठा धक्का बसला आहे, पण पराभवाचे ते एकमेव कारण नव्हते. उभय संघांची मधल्या षटकातील कामगिरी पराभवाचे मुख्य कारण ठरले. पाक संघाने मधल्या षटकांमध्ये चांगला खेळ केला. भारतीय फिरकीपटूंविरुद्ध त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. विशेषत: फखर झमान व अझहर अली यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यामुळे डावाच्या शेवटी पाक संघाला वर्चस्व प्रस्थापित करता आले.
३३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे नव्हते. पाकच्या स्विंग व सीम गोलंदाजांनी त्याला आणखी कठीण केले. आमिरने भारताच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना माघारी परतवत पाकचा विजय जवळजवळ निश्चित केला होता.
विराटचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय चुकीचा होता? हो, हा निर्णय चुकीचाच होता. कुठल्याही कर्णधाराने आपल्या ताकदीचा विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे. सर्वांना कल्पना आहे की, भारताची ताकद त्यांची फलंदाजी आहे. पाकिस्ताननेही तेच केले असते. अखेर हा पाकिस्तानचा दिवस होता. अंतिम लढतीत उपखंडातील दोन बलाढ्य संघ खेळताना बघून आनंद झाला. शेवटी क्रिकेटने अनिश्चिततेचा खेळ असल्याची आपली प्रतिमा कायम राखली. (गेमप्लॅन)