वर्ल्डकप जिंकण्यासाठी ‘तीन अच्छे दिन’ची गरज
By Admin | Updated: January 22, 2015 00:19 IST2015-01-22T00:19:57+5:302015-01-22T00:19:57+5:30
भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी फक्त तीन चांगल्या दिवसांची गरज असल्याचे मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांने व्यक्त केले.

वर्ल्डकप जिंकण्यासाठी ‘तीन अच्छे दिन’ची गरज
राहुल द्रविड : धोनी, विराट एकटेच सामन्याचा निकाल फिरवू शकतात
नवी दिल्ली : भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी फक्त तीन चांगल्या दिवसांची गरज असल्याचे मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांने व्यक्त केले. येथे आयोजित करण्यात आलेल्या एका व्याख्यानात हा शैलीदार फलंदाज बोलत होता.
द्रविड म्हणाला, ‘या विश्वचषक स्पर्धेचे स्वरूपच असे आहे की, अग्रस्थानावरील सर्व संघांना उपांत्यफेरीत खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी आपल्याला तीन चांगल्या दिवसांची गरज असणार आहे. आपल्याकडे महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली आहेत की, जे एकटेच सामन्याचा निकाल फिरवू शकतात.’
द्रविड म्हणाला, ‘हे सर्व सहज आणि सोपे आहे, असे माझे मत नाही. हा प्रवास कठीण असणार आहे. मात्र, व्यक्तिगत कामगिरीच्या बाबतीत आपण भाग्यवान असू. त्यामुळेच आपण विश्वचषक जिंंकू शकतो.’
भारत-आॅस्ट्रेलियामध्ये कसोटी केव्हा जिंकेल? या प्रश्नावर बोलताना द्रविड म्हणाला की, मलाही याचे उत्तर हवे आहे. कसोटीतील घटती प्रेक्षक संख्या हा चिंतेचा विषय असून, यासाठी दिवस-रात्र कसोटी खेळविण्याच्या पर्यायाचा विचार व्हायला हवा, असेही तो म्हणाला.
द्रविड म्हणाला, ‘सध्याच्या परिस्थितीत आपली कामे सोडून कोणी पाच दिवस सामना पाहायला येईल हे मला कठीण वाटते. त्यामुळेच दिवस-रात्र कसोटीचा पर्याय मला योग्य वाटतो. यामुळे प्रेक्षकांच्या संख्येत भर पडेल असे मला वाटते, असेही द्रविड म्हणाला.(वृत्तसंस्था)
सरितादेवीच्या कृतीचे समर्थन नाही
भारतीय महिला मुष्ठियोद्धा सरितादेवीने इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक घेण्यास नकार दिला होता. मात्र, सरितादेवीची ही कृती योग्य नव्हती, असे राहुल द्रविडचे मत आहे. अंक देण्याच्या वादग्रस्त पद्धतीमुळे सरितादेवीला कोरियाच्या खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला होता. द्रविड म्हणाला, ‘मुष्ठियुद्धामध्ये अंक देण्याची पद्धत कशी आहे, हे मला माहीत नाही. उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्यामुळे तिच्या मन:स्थितीची मला जाणीव आहे. मात्र, त्यानंतर २४ तासांनी झालेल्या कार्यक्रमात पदक न स्वीकारण्याच्या कृतीचे मी समर्थन करू शकत नाही. मला ही गोष्ट योग्य वाटत नाही.