‘विम्बल्डन दुहेरी जेतेपद स्पेशल’
By Admin | Updated: December 4, 2015 01:23 IST2015-12-04T01:23:50+5:302015-12-04T01:23:50+5:30
भारतीय स्टार सानिया मिर्झाच्या सोबतीने स्वित्झर्लंडची तज्ज्ञ खेळाडू मार्टिना हिंगीस हिने यंदाच्या सत्रात महिला दुहेरीत नऊ स्पर्धा जिंकल्या. इंडो- स्विस जोडीचे हे यश डोळे दिपवणारे आहे

‘विम्बल्डन दुहेरी जेतेपद स्पेशल’
नागपूर : भारतीय स्टार सानिया मिर्झाच्या सोबतीने स्वित्झर्लंडची तज्ज्ञ खेळाडू मार्टिना हिंगीस हिने यंदाच्या सत्रात महिला दुहेरीत नऊ स्पर्धा जिंकल्या. इंडो- स्विस जोडीचे हे यश डोळे दिपवणारे आहे. बीजिंग, वुहान, ग्वांगझू, अमेरिकन ओपन, विम्बल्डन, चार्ल्सटन, मियामी तसेच इंडियन वेल्स असे पाठोपाठ जेतेपद पटकविण्यात ही जोडी यशस्वी ठरली. यापैकी स्पेशल जेतेपद कुठले असा सवाल करताच हिंगीसने उत्तर दिले अर्थात, विम्बल्डन महिला दुहेरीचे जेतेपद!!
कारकीर्दीत हिंगीस अनेकदा जखमांमुळे त्रस्त झाली. तिचे कोर्टवर परतणे कठीण ठरेल, अशी चर्चा केली जात होती. याविषयी विचारताच ती म्हणाली,‘ कोर्टवर पुनरागमन करणे म्हणजे झिरोपासून सुरुवात करणे असते. अशास्थितीत नव्या ऊर्जेशिवाय भक्कम पाठिंबा हवा असतो. १९९६ साली मी १५ वर्षे ९ महिन्यांची असताना विम्बल्डन टायटल जिंकले. हा एक विक्रम आहे. तेव्हापासून कारकीर्दीत अनेक चढउतार आले. वर्षभरात २० ते २२ स्पर्धा खेळते. मी आनंदी असून कामगिरीवर अभिमान आहे.’
महिला एकेरीत पुनरागमन करण्याचा विचार आहे काय, असे विचारताच हिंगीस म्हणाली,‘ ३५ वर्षे वयात एकेरी सामने खेळण्याचा मी विचार करू शकत नाही. मी महिला दुहेरी आणि मिश्र प्रकारात समाधानी आहे. हिंगीस काही वेळ महेश भूपतीसोबतही खेळली आहे. यावर ती म्हणते, महेश आणि लियांडर हे दोघेही वेगवान तसेच तरबेज टेनिस खेळतात. खेळात कधी काय करावे हे त्यांना ठाऊक असल्याने दोघेही मौल्यवान खेळाडू ठरतात.
सध्या चॅम्पियन्स टेनिस लीगसारख्या स्पर्धा लोकप्रिय ठरत आहेत. याविषयी विचारताच हैदराबाद अॅसेस संघाचे प्रतिनिधित्व करणारी हिंगिस म्हणाली,मी ‘सीटीएल लीगमध्ये खेळण्याचा आनंद लुटते आहे. विजय अमृतराज यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या स्पर्धेमुळे संघ भावना वाढीस लागत आहे. या लीगचा लाभ भारतीय ज्युनियर टेनिसपटूंना होईल. त्यासाठी चांगले कोचिंग हवे. कोचेसनी या ज्युनियर खेळाडूंवर मेहनत घ्यायला हवी.’ (क्रीडा प्रतिनिधी)
लिएंडर अतुलनीय खेळाडू
हिंगीसने भारतीय सहकारी सानिया आणि लिएंडरची स्तुती केली. सानिया ही सध्या कारकीर्दीत सर्वोच्च शिखरावर असून महिला टेनिसमध्ये फोरहॅन्डच्या तिच्या फटक्यांना तोड नाही. ग्रासकोर्टवर ती कुणाचाही मुकाबला करू शकते. लियांडर तर अतुलनीय खेळाडू आहे. त्याच्यासोबत सहजपणे खेळते. दोन्ही भारतीय आगळेवेगळे असल्यामुळेच दुहेरीत आमची जोडी भक्कम ठरली आहे.’