मरेचे आव्हान संपुष्टात विम्बल्डन : जोकोविच उपांत्य फेरीत,
By Admin | Updated: July 3, 2014 04:48 IST2014-07-03T04:48:28+5:302014-07-03T04:48:28+5:30
राफेल नदालपाठोपाठ गतविजेत्या अॅण्डी मरे याला विम्बल्डनमधून गाशा गुंडाळावा लागला.

मरेचे आव्हान संपुष्टात विम्बल्डन : जोकोविच उपांत्य फेरीत,
लंडन : राफेल नदालपाठोपाठ गतविजेत्या अॅण्डी मरे याला विम्बल्डनमधून गाशा गुंडाळावा लागला. ११व्या मानांकित बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव याने ६-१, ७-६ (७-४), ६-२ सरळ सेटमध्ये मरेला स्पर्धेबाहेर जाण्यास भाग पाडले. पुरूषांच्या दुसऱ्या एकेरीत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार सर्बियाचा अग्रमानांकीत नोव्हाक जोकोविचने क्रोएशियाच्या मारीन सिलीचला ३ तास १८ मिनिटे चाललेल्या लढतीत ६.१, ३.६, ६.७, ६.२, ६.२ असा पराभव करून उपांत्य फेरीतील आपल्या जागा निश्चित केली.
ब्रिटनला गतवर्षी ७७ वर्षांनंतर विम्बल्डनचे जेतेपद पटकावून देणारा मरे यंदा ते कायम राखण्याच्या निर्धाराने कोर्टवर उतरला होता. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच त्याने झंझावाती खेळ करून सर्वांना सुखद धक्का दिला होता. परंतु, उपांत्यपूर्व फेरीच्या या लढतीत त्याचा हा झंझावात काहीसा थंडावलेला दिसला. दिमित्रोवसमोर त्याचा संघर्ष तुटपूंजा वाटत होता. दिमित्रोवने पहिला सेट अवघ्या २५ मिनिटांत ६-१ असा सहज जिंकून मरेवर दडपण निर्माण केले. याचाच फायदा घेत दिमित्रोवने टायब्रेकरमध्ये रंगलेला हा सेट ७-६ असा जिंकून सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजवले. (वृत्तसंस्था)