फिरकीची जादू पुन्हा चालणार?

By Admin | Updated: November 14, 2015 01:16 IST2015-11-14T01:16:24+5:302015-11-14T01:16:24+5:30

मोहालीच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर द. आफ्रिकेचा तीन दिवसांत ‘ खेळ खल्लास’ केल्यानंतर भारतीय संघ आज (शनिवार)पासून येथील चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीवरही फिरकीच्या जाळ्यात अडकवत

Will the magic of spin run again? | फिरकीची जादू पुन्हा चालणार?

फिरकीची जादू पुन्हा चालणार?

बंगळुरू : मोहालीच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर द. आफ्रिकेचा तीन दिवसांत ‘ खेळ खल्लास’ केल्यानंतर भारतीय संघ आज (शनिवार)पासून येथील चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीवरही फिरकीच्या जाळ्यात अडकवत द. आफ्रिकेला पुन्हा एकदा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहे. एबी डिव्हिलियर्सचा हा शंभरावा सामना पाहुण्यांना कायम स्मरणात राहावा, यासाठी ‘कोहली अँड कंपनी’ विजयासाठी प्रतिष्ठा पणाला लावेल, यात शंका नाही.
पहिला सामना १०८ धावांनी गमावल्यानंतर दुसरा सामना सुरू होण्याआधीच पाहुण्या संघातील महत्त्वाचे खेळाडू जखमांनी त्रस्त झाले. त्यातच फिरकीला पूरक खेळपट्ट्यांवर चांगली फलंदाजी करण्याचे दडपण आहेच. सध्या महान फलंदाजांमध्ये गणना होत असलेल्या डिव्हिलियर्सपुढे शतकी कसोटीत लौकिकाला साजेशी फलंदाजी करण्याचे आव्हान असेल. अमित मिश्राने दोन्ही डावांत डिव्हिलियर्सला तंबूची वाट दाखविली होती. भारताच्या विजयी वाटेत डिव्हिलियर्स मोठा अडथळा आहेच. दुसरीकडे, व्हर्नोन फिलँडर घोट्याला दुखापत होताच मालिकेबाहेर पडला असून, डेल स्टेनदेखील या सामन्यात खेळणार नाही. मोहालीत २० पैकी १९ बळी घेणारे रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा आणि अमित मिश्रा हे फिरकीचे त्रिकूट फॉर्ममध्ये असल्याने भारतीय संघ द. आफ्रिकेला पुन्हा फिरकीच्या जाळ्यात ओढेल, असे वाटते. मोहालीच्या तुलनेत मात्र येथील खेळपट्टी फलंदाजांना पूरक असल्याचे बोलले जाते. पंजाबचा युवा आॅल राऊंडर गुरकीरत मान याला स्थान मिळाले, तर तो चौथा फिरकीपटू असेल. अशा वेळी ईशांत शर्मा हा एकच वेगवान गोलंदाज खेळेल. वरुण अ‍ॅरोन आणि उमेश यादव यांना बाहेर बसावे लागेल. गुरकीरतने रेल्वेविरुद्ध दिवसभरात द्विशतक ठोकले; शिवाय आॅफ स्पिनचा प्रभाव टाकून ५२ धावांत ९ गडी टिपले होते. बंगळुरू येथे काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. सामन्यादरम्यानदेखील पाऊस ‘खलनायक’ ठरू शकतो.
फलंदाजीचे संयोजन मात्र कोहलीसाठी डोकेदुखी ठरावी. सलामीचा शिखर धवन खराब खेळत आहे. पहिल्या सामन्यात दोन्ही डावांत तो भोपळा फोडू शकला नव्हता. के. एल. राहुल त्याचे स्थान घेण्यास इच्छुक आहे. चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय यांनी मात्र फार प्रभावित केले. शिवाय अजिंक्य रहाणेकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. भारताची कामगिरी विजयकडून होणाऱ्या चांगल्या सुरुवातीवर विसंबून असेल. द. आफ्रिकेचे गोलंदाज इम्रान ताहीर, सायमन हार्पर आणि डीन एल्गर यांनी पहिल्या सामन्यात १५ गडी बाद केले; पण आघाडीच्या फलंदाजांनी फिरकीपुढे नांगी टाकली होती.
(वृत्तसंस्था)


मनाला लावून घेण्याची गरज नाही : कोहली
फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवरून द. आफ्रिकेकडून होत असलेली टीका मनाला लावून घेण्याची गरज नसल्याचे भारतीय कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले. या निकाल देणाऱ्या खेळपट्ट्या असून यामुळे कसोटीपासून दुरावलेल्या प्रेक्षकांना पुन्हा मैदानाकडे आकर्षित करण्यास मदत होईल, असे कोहलीला वाटते.
मोहालीतील विजयात खेळपट्टीची भूमिका मोलाची ठरली, असे वाटते काय, या प्रश्नाच्या उत्तरात विराट म्हणाला, ‘मीडियात जे प्रकाशित होते, त्याकडे किंवा बाहेरून होणाऱ्या टीकेकडे लक्ष दिले तर मन विचलित होते. आम्ही खेळाकडे लक्ष देतो. सामना जिंकलो हे सत्य आहे आणि संघात आनंदाचा संचार झाला, हे देखील सत्य आहे. टीकाकारांना मी इतकेच सांगू इच्छितो, की निकाल देणाऱ्या खेळपट्ट्या प्रेक्षकांना मैदानाकडे आकर्षित करू शकतात.’
चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय यांचे मोहाली कसोटीच्या दोन्ही डावांत मोलाचे योगदान असल्याचा आवर्जून उल्लेख कोहलीने केला. मागील चुकांपासून बोध घेत मी नेतृत्वात हळूहळू सुधारणा करीत असल्याचे विराटने सांगितले.
गुरकीरतबद्दल आश्चर्य नको !
गुरकीरतसारखा आॅलराऊंडर संघाच्या संयोजनात फिट बसतो. भविष्यात त्याला सीनियर टीममध्ये खेळताना पाहू शकाल. मोहाली सामन्यादरम्यान गुरकिरत बदली खेळाडू होता, तर सध्या १६ वा खेळाडू या नात्याने संघात आहे. आॅफस्पिनर असलेला गुरकिरत उजव्या हाताने फलंदाजीही करतो. सहाव्या-सातव्या स्थानावर फलंदाजी करण्याची आणि विरोधी संघाकडून विजय हिसकावून आणण्याची त्याच्यात क्षमतादेखील आहे. पुढील वर्षी आम्हाला मोठ्या संख्येने कसोटी सामने खेळायचे असल्याने गुरकिरतसारखा खेळाडू संघाला हवा आहे. तो संघात कधी खेळेल, याबद्दल मात्र मी आता काही सांगू शकणार नाही.
- विराट कोहली, कर्णधार
डेल स्टेन ‘आऊट’
द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन हा जखमी झाल्याने दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. द. आफ्रिकेसाठी हा धक्का मानला जातो. व्हर्नोन फिलँडर हादेखील गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे आधीच मालिकेबाहेर पडला.
द. आफ्रिकेचा कर्णधार हाशिम आमला याने शुक्रवारी सरावानंतर फिलँडर व स्टेन संघात नसल्याने बॅकफुटवर आल्याची कबुली दिली. २५ नोव्हेंबरपासून नागपुरात होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात स्टेन खेळेल, अशी अपेक्षा आमलाने व्यक्त केली.
आफ्रिकेने फिलँडरचा पर्याय म्हणून काइल एबोट याला स्थान दिले. तो स्टेनचे स्थान घेऊ शकतो. कसोटी मालिका जिंकायचे काम १५ खेळाडू करतात, ११ नव्हे, असे सांगून आमला म्हणाला, ‘‘आमच्या संघात फलंदाजी आणि गोलंदाजी भक्कम आहे. काही खेळाडू नसले तरी त्यांची उणीव भरून काढणारे अन्य खेळाडू सज्ज आहेत.’’
२००४ ते २०१५ दरम्यान एबी डिव्हिलियर्सने एकूण ९९ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने १६४ डावांत १६ वेळा नाबाद राहून ७,६८५ धावा झळकावल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद २७८ अशी आहे. त्याने २१ शतके आणि ३७ अर्धशतके ठोकली आहेत.
तीन वेळा तो शून्यावर राहिला आहे. त्याने एकूण ८८१ चौकार आणि ५३ षटकार मारले आहेत.
संघ यातून निवडणार
भारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिद्धिमान साहा, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, ईशांत शर्मा, वरुण अ‍ॅरोन, उमेश यादव, रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, स्टुअर्ट बिन्नी आणि गुरकीरतसिंग मान.
दक्षिण आफ्रिका : हाशीम आमला (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, डीन एल्गर, फाफ डु प्लेसिस, तेंबा बावुमा, जेपी ड्युमिनी, स्टियान वान झिल, डेन विलास, डेन पिट, सायमन हार्पर, इम्रान ताहीर, डेल स्टेन, मोर्ने मोर्कल, काइल एबोट आणि कागिसो रबाडा.
सामन्याची वेळ : सकाळी ९.३० पासून.
 

Web Title: Will the magic of spin run again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.