जीतू राय अचूक लक्ष्य साधणार?
By Admin | Updated: August 6, 2016 03:39 IST2016-08-06T03:39:00+5:302016-08-06T03:39:00+5:30
जीतू रायकडे संभाव्य पदकविजेता म्हणून पाहिले जात असल्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष राहील

जीतू राय अचूक लक्ष्य साधणार?
थेट रिओ येथून...
शिवाजी गोरे
रिओ : वर्ल्डकप २०१४मध्ये तीन पदके जिंकून वेगळा दबदबा निर्माण करणाऱ्या जीतू रायकडे संभाव्य पदकविजेता म्हणून पाहिले जात असल्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष राहील. त्याचबरोबर लिएंडर पेस, रोहन बोपन्ना, सानिया मिर्झा, प्रार्थना ठोंबरे यांच्यासह अपूर्वी चंदेल, आयोनिका पॉल, पुरुष हॉकी संघ, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग यांचे अभियान उद्या सुरू होईल.
नेपाळी वंशाचा जीतू रॉय याने वर्ल्डकपमध्ये ५० मीटर एअर रायफल प्रकारात ३ पदके जिंकून सर्वांचे लक्ष वेधले आहे. १० मीटर एअर रायफलमध्ये तो जागतिक क्रमवारीत चौथ्या, तर ५० मीटरमध्ये तो अग्रस्थानी आहे. दुसरीकडे, गुरुप्रीतसिंगसुद्धा १० मीटर एअर रायफलमध्ये आपले भाग्य अजमवणार आहे. त्याचबरोबर, महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये अपूर्वी चंदेल व अयोनिका पॉल यांची सत्त्वपरीक्षा होईल.
>आयओए, हॉकी इंडिया यांच्यात जुंपली...
भारतीय हॉकी संघाला राहण्याच्या ठिकाणी बसण्यासाठी खुर्च्या व पाहण्यासाठी टीव्ही नाही, तर खेळाडूंच्या राहण्याच्या
ठिकाणी ही व्यवस्था करावी, असे पत्र हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष व सचिव यांना दिले.
दोन दिवस आयओएने त्यांच्या या पत्राला दोन दिवस काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे शेवटी वाट पाहून हॉकी इंडियाने येथील इंडियन एम्बसीला विनंतीपत्र लिहून खुर्च्या व टीव्हीची व्यवस्था केली. या वस्तू क्रीडाग्राममध्ये आल्यानंतर आयओएचे अधिकारी व हॉकी इंडियाचे पदाधिकारी यांच्यात तूतू-मैंमैं झाले. नंतर खेळाडूंच्या सोयीसाठी या वस्तू आणल्या गेल्या आहेत, पदाधिकाऱ्यांसाठी नाही आणि आयओएचे अधिकारी खेळाडूंकडे काहीच लक्ष देत नाहीत. ते येथे येऊन काय-काय करीत आहेत, हे आम्ही पाहत आहोत, असे हॉकी इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगण्यास सुरुवात केल्यामुळे दोन्ही पदाधिकारी तेरी भी चूप और मेरी भी चूप म्हणून शांत झाले व प्रकरण मिटविले गेले.
>टेबल टेनिस :
पुरुष गटात ए शरथ कमल, सौम्यजित घोष तर महिलांमध्ये मौमा दास व मानिका बत्रा यांचे एकेरीतील सामने उद्या सुरू होतील. यांच्या कामगिरीकडेसुद्धा सर्वांचे लक्ष राहील. या दोन्ही जोड्या काही महिन्यांपासून चांगल्या बहरात आहेत; पण तरीसुद्धा त्यांचा मार्ग एवढा सोपा नसेल.
>रोइंग :
नाशिकच्या (महाराष्ट्र) ग्रामीण भागातून आलेला नौकानयनपटू दत्तू भोकनाळने आशियाई-ओशियाना पात्रता स्पर्धेतून आॅलिम्पिकसाठी पात्र होऊन सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. महाराष्ट्राच्या या जिगरबाज खेळाडूकडून सिंगल स्कल प्रकारात अपेक्षा असतील.
>वेटलिफ्टिंग :
महिलांच्या गटात एकमेव पात्र ठरलेली मीराबाई साईकोम ४८ किलोगटात पदक जिंकण्यासाठी आपले वर्चस्व पणाला लावेल.
>टेनिस :
कोणी कोणाबरोबर खेळायचे, या वादानंतर पुरुषांच्या दुहेरीत एकत्र आलेली लिएंडर पेस व रोहन बोपन्ना ही जोडी आणि महिला दुहेरीत सानिया मिर्झा व प्रार्थना ठोंबरे हे आपल्या अभियाची सुरुवात करतील. या दोन्ही पुरुष व महिला जोड्यांकडून भारताला पदक मिळण्याची खात्री आहे.
४३ वर्षीय पेस यांदा सातव्यांदा आॅलिम्पिक स्पर्धेत उतरणार आहे. भारताला त्याने अॅटलांटा आॅलिम्पिकमध्ये एकेरीत कांस्यपदक जिंकून दिले होते. सानियासुद्धा दुहेरीत जागतिक क्रमवारी अव्वल आहे. पण, या स्पर्धेत तिची जोडीदार बार्शीची (महाराष्ट्र) प्रार्थना ठोबरे आहे; जी गेले काही महिने हैदराबाद येथे सानियाच्या अॅकॅडमीमध्ये सराव करीत आहे.
>भारतीय बॉक्सर्सना कठीण ड्रॉ
भारताच्या तीन सदस्यीय बॉक्सिंग पथकाला आज शनिवारपासून सुरू होत असलेल्या अॉलिम्पिक बॉक्सिंगमध्ये कठीण ड्रॉ मिळाला आहे.
बॉक्सिंगमध्ये भारताने आतापर्यंत दोन पदके जिंकली आहेत. बीजिंगमध्ये २००८ साली विजेंदरसिंगने ७५ किलोचे कांस्य तसेच २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये मेरिकोमने महिला बॉक्सिंगचे ५१ किलो गटात कांस्य जिंकले होते. शिवा थापा ५६ किलो, मनोज कुमार ६४ किलो आणि विकास कृष्णन ७५ किलो यांच्या खांद्यावर भारतीय आव्हानाची जबाबदारी राहील. मागच्या लंडन आॅलिम्पिकमध्ये आठ बॉक्सर्स खेळले होते. यंदा विकासला सातवे मानांकन मिळाले पण कुणालाही पहिल्या फेरीत पुढे चाल मात्र मिळालेली नाही.
>आशियाडचा सुवर्ण विजेता आणि विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदकाची कमाई करणारा विकासचा सामना
१० आॅगस्टला अमेरिकेचा १८ वर्षांचा खेळाडू चार्ल्स कोनवेलविरुद्ध होईल.
त्याआधी ९ आॅगस्टला शिवाला क्यूबाचा सहावा मानांकित रोबेइसी सामिरेज याच्याविरुद्ध खेळायचे आहे.
मनोज १० आॅगस्टला लिथुआनियाचा माजी युवा आॅलिम्पिक सुवर्ण विजेता एवाल्डास पेत्राउस्कास याच्याविरुद्ध खेळेल.
>लिएंडरला राहावे लागले बाहेर ...
भारताचा अव्वल टेनिसपटू लिएंडर पेसला पहिल्या दिवशी राहण्यासाठी खोली नसल्यामुळे व्यवस्थापकांच्या खोलीत राहावे लागले. त्यामुळे क्रीडाग्राममध्ये पुन्हा दुसऱ्या प्रकरणाला तोंड फुटले आणि आयओएच्या अधिकाऱ्यांनी खेळाडूंची राहण्याची व्यवस्था चांगली केली नसल्याची चर्चा सुरू झाली.
>भारतीय वेळेनुसार सामने :
नेमबाजी : महिला : शनिवारी सायं. ७ वा.
= पुरुष : शनिवारी रात्री १२ नंतर
टेबल टेनिस : शनिवारी सायं. ५.३०
टेनिस : शनिवारी सायं : ७.१५ वा.
वेटलिफ्टिंग : रविवारी पहाटे ४.३० वा.
रोइंग : शनिवारी सायं. ६ पासून
हॉकी : शनिवारी सायं. ७.३० वा.