विजयी ध्वज फडकणार ?
By Admin | Updated: January 26, 2015 02:59 IST2015-01-26T02:59:27+5:302015-01-26T02:59:27+5:30
सलग पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघाच्या विश्वकप स्पर्धेच्या तयारीला धक्का बसला आहे. आता महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघापुढे

विजयी ध्वज फडकणार ?
सिडनी : सलग पराभव स्वीकारणा-या भारतीय संघाच्या विश्वकप स्पर्धेच्या तयारीला धक्का बसला आहे. आता महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघापुढे वन-डे सामन्यांच्या तिरंगी मालिकेत उद्या, सोमवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती आहे. या लढतीत भारतीय संघ विजय मिळविण्यास उत्सुक आहे. या लढतीत विजय मिळविला तर भारताला तिंरगी मालिकेत अंतिम फेरी गाठण्याच्या आशा कायम राखता येईल. विश्वकप मोहिमेच्या तयारीमध्ये नवे चैतन्य संचारण्यासाठी भारताला या लढतीत विजय आवश्यक आहे. आॅस्ट्रेलियाने आतापर्यंत तीनपैकी तीन सामने जिंकत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले आहे.
ब्रिस्बेनमध्ये इंग्लंडविरुद्ध पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघाला सिडनी व पर्थमध्ये खेळल्या जाणाऱ्या दोन सामन्यांमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. या दोन्ही सामन्यांपैकी एका लढतीत भारतीय संघाला बोनस गुणासह विजय मिळवावा लागेल.
ईशांत शर्मा व रवींद्र जडेजा सोमवारच्या लढतीसाठी उपलब्ध असल्यामुळे भारतीय संघासाठी दिलासा देणारे वृत्त आहे. त्यांना अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळणार किंवा नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. जडेजाच्या क्षेत्ररक्षणाबाबत अद्याप साशंकता आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे रोहित शर्मा या लढतीत खेळणार नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे भारताचा फलंदाजी क्रम यापूर्वीच्या लढतीप्रमाणेच राहणार असल्याचे जवळजवळ निश्चित आहे.
अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा शिखर धवनसह डावाची सुरुवात करणार आहे. या लढतीत धवनला सूर गवसेल, अशी संघव्यवस्थापनाला आशा आहे.
तळाची फलंदाजी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये चर्चेचा विषय आहे. डेथ ओव्हर्समध्ये वेगाने धावा फटकाविण्याची गरज असते. स्टुअर्ट बिन्नीने गाबामध्ये फलंदाजी व गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्याला ही दुहेरी भूमिका सांभाळण्यासाठी विश्वकप संघात स्थान मिळाले आहे.
बिन्नीने ब्रिस्बेनमध्ये गोलंदाजीची सुरुवात केली होती. त्यामुळे तो मध्यमगती गोलंदाजीचा पर्याय म्हणून खेळू शकतो. बिन्नीनंतर आर. अश्विन, अक्षर पटेल किंवा जडेजा आणि भुवनेश्वर कुमार फलंदाजीसाठी येतील. त्यामुळे तळातील फलंदाजीला बळकटी येईल. बिन्नीचा समावेश येथील अनुकूल खेळपट्ट्यांवर उपयुक्त सिद्ध होईल, असे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने यापूर्वी म्हटले होते.
दुसऱ्या बाजूचा विचार करता यजमान आॅस्ट्रेलिया संघावर मात्र अशा प्रकारचे दडपण नाही. पर्थमध्ये खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीसाठी आॅस्ट्रेलिया संघ यापूर्वीच पात्र ठरला आहे. त्यामुळे सोमवारच्या लढतीत आॅस्ट्रेलिया संघ काही खेळाडूंना विश्रांतीची संधी देण्याची शक्यता असून विश्वकप स्पर्धेपूर्वी संघाचा समतोल साधण्यास प्रयत्नशील आहे. (वृत्तसंस्था)