कशाला हवा प्रशिक्षक ?
By Admin | Updated: June 8, 2015 01:03 IST2015-06-08T01:03:27+5:302015-06-08T01:03:27+5:30
भारतीय क्रिकेट संघाला सध्या असलेले सहायक प्रशिक्षक हे अत्युच्च दर्जाचे आहेत, ते असताना आणखी प्रशिक्षक कशाला हवा, असे मत भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

कशाला हवा प्रशिक्षक ?
कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाला सध्या असलेले सहायक प्रशिक्षक हे अत्युच्च दर्जाचे आहेत, ते असताना आणखी प्रशिक्षक कशाला हवा, असे मत व्यक्त करणारे भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी राष्ट्रीय संघासोबत प्रदीर्घ काळ राहण्याचे संकेत दिलेले आहेत.
शास्त्री यांना १० जूनपासून प्रारंभ होणाऱ्या एकमेव कसोटी सामना असलेल्या बांगलादेश दौऱ्यासाठी संघाच्या संचालकपदी कायम राखण्यात आले आहे. या दौऱ्यात तीन वन-डे सामनेही खेळले जाणार आहेत. बांगलादेश दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना शास्त्री म्हणाले, सध्या संघाला मुख्य प्रशिक्षकाची फार गरज नाही.
संघाला राष्ट्रीय प्रशिक्षकाची उणीव भासणार का, याबाबत बोलताना शास्त्री म्हणाले, ‘आमच्याकडे तीन प्रशिक्षक असून, आम्हाला आणखी एका प्रशिक्षकाची गरज नाही. गरज भासल्यास मी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावण्यास तयार आहे. त्यामुळे हा मुद्दा गौण ठरतो.’
संघासोबत आणखी किती काळ राहणार, याबाबत बोलताना शास्त्री म्हणाले, ‘बांगलादेश दौऱ्यावरून परतल्यानंतर बीसीसीआयसोबत चर्चा करणार असून त्यानंतर निर्णय घेईन. माझा कुठल्याही बाबीला नकार नाही. मी तुमच्या कल्पनेपेक्षा अधिक काळ संघासोबत राहू शकतो.’
भारताच्या तुलनेत मानांकनामध्ये बांगलादेश संघ पिछाडीवर असला, तरी आम्ही प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाचा आदर करतो. बांगलादेश संघही अन्य प्रतिस्पर्धी संघांप्रमाणे आहे, असेही शास्त्री यांनी यावेळी सांगितले.
मालिकेपूर्वी आॅफ स्पिनर हरभजन सिंगचे कसोटी संघातील पुनरागमन चर्चेचा विषय ठरला आहे. गोलंदाजांच्या यशासाठी सामूहिक प्रयत्न अपेक्षित असल्याचे शास्त्री यांनी यावेळी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
> हरभजनचे संघात स्वागत आहे. तो चांगला गोलंदाज असून, त्यामुळे गोलंदाजीमध्ये विविधता येईल; पण भारतीय गोलंदाजांमध्ये सर्वच गोलंदाज दर्जेदार असून, कुणी एक अन्य गोलंदाजांच्या तुलनेत वरचढ नाही.’
> भारत ‘अ’ व अंडर-१९ संघाचा प्रशिक्षक द्रविडसोबत माझी चर्चा झाली आहे. भारतीय क्रिकेटसाठी यापेक्षा चांगले वृत्त असूच शकत नाही. यासाठी त्याच्यापेक्षा योग्य व्यक्ती असूच शकत नाही. तो युवा संघाला मार्गदर्शन करणार असल्यामुळे त्याचा लाभ सीनिअर संघाला मिळेल.
> महान फलंदाज सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश असलेल्या ‘बीसीसीआय’च्या नवनियुक्त क्रिकेट सल्लागार समितीचे योगदान भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वाचे ठरेल.
--------
आता रिझल्ट देण्याची वेळ : विराट कोहली
> आता शिकण्याची वेळ संपलेली असून आता संघाचे लक्ष केवळ अनुकूल निकाल देण्यावर असल्याचे मत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले.
> बांगलादेश दौऱ्यात १० जूनपासून प्रारंभ होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना कोहली म्हणाला, ‘आता निकालावर लक्ष केंद्रित केलेले आहे.
> आम्ही आतापर्यंत बरेच काही शिकलो असून आता शिकण्याची वेळ नसून अनुकूल निकालाची घडी आहे. आम्ही प्रत्येकवेळी काहीतरी शिकत असतो. टीव्हीवर सामना बघतानाही यात बदल होत नाही.
> आता प्रदीर्घ कालावधीपासून खेळत असून लक्ष्य कसे साध्य करायचे याची आम्हाला कल्पना आहे. आता आम्ही केवळ निकाल मिळविण्यासाठी खेळणार आहे.’
> बांगलादेश दौऱ्यासाठी संघ सज्ज आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन वन-डे सामने खेळणार आहे. संघाला अनुकूल निकाल मिळविण्यासाठी खेळाडूंचा फिटनेस महत्त्वाचा आहे, असेही कोहलीने यावेळी सांगितले.
> कोहली म्हणाला,‘नव्याने सुरुवात करण्यास प्रत्येक खेळाडू उत्सुक आहे. संघाच्या नेतृत्वाबाबत विशेष उत्सुकता आहे. मी यापूर्वीही संघाचे नेतृत्व केलेले आहे. कसोटी क्रिकेट वन-डे व टी-२० क्रिकेटच्या तुलनेत कठिण आहे. कारण दिवसभराची व्यूहरचना एकाचवेळी ठरवावी लागते.’
> महेंद्रसिंग धोनीने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर कर्णधार झालेला कोहली म्हणाला,‘आॅस्ट्रेलियात संघाचे कर्णधारपद भूषवताना बरेच काही शिकायला मिळाले. संघातील खेळाडूंमध्ये क्षमता असून कामगिरीत सातत्य राखण्यास प्रयत्नशील आहे. चुकांपासून तुम्ही किती लवकर शिकता, याला अधिक महत्त्व आहे. ड्रेसिंग रूममध्ये उत्साह राखण्यास प्रयत्नशील आहे.’
---------
प्रत्येकाने जबाबदारी ओळखावी : ईशांत
कोलकाता : प्रत्येक गोलंदाजांने आपापली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. देशासाठी खेळतोय ही एक मोठी जबाबदारी असते, याचे भान ठेवूनच प्रत्येक गोलंदाजाला आपली भूमिका पार पाडावी लागेल, असे मत ईशांत शर्मा याने व्यक्त केले. उमेश यादव, वरुण आरोन आम्ही एकाच वयाचे आहोत. फक्त त्यांच्यापेक्षा मी काही सामने अधिक खेळलो आहे. प्रत्येक गोलंदाजांने आपली भूमिका ओळखून त्या पद्धतीने कामगिरी करण्याची वेळ आली आहे, असे झाल्यास ती गोष्ट सर्वांच्या प्रगतीसाठी आश्वासक ठरेल, असे ईशांत म्हणाला. दुखापतीमुळे ईशांतचे करिअर प्रभावित झाले असून, त्यामुळे त्याला विश्वचषक स्पर्धेतही सहभागी होता आले नव्हते. याविषयी बोलताना ईशांत म्हणाला, दुखापत ही माझ्यादृष्टीने खूप निराशाजनक बाब ठरली आहे. मात्र, पुढे जाण्यासाठी या गोष्टी विसरून ‘काय करायचे’ यावर अधिक भर द्यावा लागेल.