पश्चिम रेल्वेचे अजिंक्यपद
By Admin | Updated: June 11, 2016 20:15 IST2016-06-11T20:15:18+5:302016-06-11T20:15:18+5:30
पश्चिम रेल्वे संघाने पंजाब नॅशनल बँक संघाचा 3-1 असा धुव्वा उडवत 12व्या गुरु तेग बहादूर अखिल भारतीय सुवर्ण चषक हॉकी स्पर्धेत अजिंक्यपदाला गवसणी घातली

पश्चिम रेल्वेचे अजिंक्यपद
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 11 - पश्चिम रेल्वे संघाने पंजाब नॅशनल बँक संघाचा 3-1 असा धुव्वा उडवत 12व्या गुरु तेग बहादूर अखिल भारतीय सुवर्ण चषक हॉकी स्पर्धेत अजिंक्यपदाला गवसणी घातली. मुंबई हॉकी संघटनेने हॉकी सुवर्णचषक स्पर्धेचे आयोजन केले होते.
चर्चगेट येथील हॉकी स्टेडियममध्ये पार पडलेल्या अंतिम सामन्यात पश्चिम रेल्वे आणि पंजाब बँक संघ आमने सामने आले. स्पर्धेत तुफान फॉर्मात असलेल्या पश्चिम रेल्वेची सुरुवात निराशाजनक झाली. बँक संघाच्या अजरुन अन्टीलने 20 व्या मिनिटात पहिला गोल झळकावत 1-0 अशी आघाडी घेतली. आघाडीचा आनंद बँक संघाला फार काळ करता आला नाही. रेल्वेच्या राजन कांदुलिनाने 29 व्या मिनिटाला गोल झळकावत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली.
बरोबरीनंतर मात्र रेल्वे संघाच्या खेळाडूंनी बँकेच्या खेळाडूंना सामन्यात पुनरागमनाची संधी दिली नाही. दोन्ही संघातील खेळाडू गोल करण्यासाठी मैदानावर शर्थीचे प्रयत्न करत होते. सामन्याच्या 32 व्या मिनिटाला मलक सिंगने गोल झळकावत रेल्वेला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.
दुस-या सत्रात, पिछाडीवर असणा-या बँक संघानी गोल करण्यासाठी अधिक आक्रमक खेळताना दिसले. मात्र रेल्वेच्या बचावपटूंसमोर त्यांचा निभाव लागला नाही. त्यातच 53 व्या मिनिटाला अय्यापाने गोल झळकवल्याने 3-1 अशी भक्कम आघाडी रेल्वे संघाने मिळवली. अखेर 2 गुणांच्या फरकाने रेल्वेने सुवर्णचषकावर नाव कोरले.