वेस्ट इंडीज बाद फेरीत
By Admin | Updated: March 16, 2015 02:18 IST2015-03-16T02:18:01+5:302015-03-16T02:18:01+5:30
कर्णधार जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडीजने रविवारी ‘ब’ गटात खेळल्या गेलेल्या अखेरच्या

वेस्ट इंडीज बाद फेरीत
नेपियर : कर्णधार जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडीजने रविवारी ‘ब’ गटात खेळल्या गेलेल्या अखेरच्या साखळी सामन्यात संयुक्त अरब अमिरातचा (यूएई) ११७ चेंडू व ६ गडी राखून पराभव केला आणि सरस धावगतीच्या जोरावर आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला.
विंडीजपुढे यूएईचा डाव कमी धावसंख्येत गुंडाळण्याचे आव्हान होते. होल्डर (४-२७) आणि जेरोम टेलर (३-३६) यांनी अचूक मारा करीत यूएईचा डाव ४७.४ षटकांत १७५ धावांत गुंडाळला. सुरुवातीच्या पडझडीनंतर यूएईतर्फे नासीर अजिज (६०) व अमजद जावेद (५६) यांनी सातव्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी करीत संघाला सन्मानजनक धावसंख्येची मजल मारून दिली.
दुखापतीमुळे या सामन्याला मूकलेल्या स्फोटक सलामीवीर ख्रिस गेलच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या विंडीज संघाची सुरुवात निराशाजनक झाली; पण जॉन्सन चार्ल्स (५५), जोनाथन कार्टर (नाबाद ५०) आणि दिनेश रामदीन (नाबाद ३३) यांनी उल्लेखनीय योगदान देत संघाला ३०.३ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठून दिले.
विंडीज संघाने शानदार विजय मिळविला असला तरी, त्यांचे लक्ष पाकिस्तान आणि आयर्लंड संघांदरम्यानच्या लढतीच्या निकालावर होते. ही लढत टाय झाली असती तर वेस्ट इंडीज संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असते; पण या लढतीत पाकिस्तानने ७ गडी राखून विजय मिळविला. वेस्ट इंडीज व आयर्लंड संघांच्या खात्यावर प्रत्येकी सहा गुणांची नोंद आहे; पण सरस नेट रनरेटच्या आधारावर विंडीज संघ बाद फेरीसाठी पात्र ठरला. आयर्लंडने सलामी लढतीत वेस्ट इंडीजचा पराभव केला होता.
‘ब’ गटात विंडीज संघ चौथ्या स्थानावर राहिला. कॅरेबियन संघाला उपांत्यपूर्व फेरीत २१ मार्चला वेलिंग्टनमध्ये ‘अ’ गटातील अव्वल संघ न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
होल्डरने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. यूएईची १४ व्या षटकांत ६ बाद ४६ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर अजिज व जावेद यांनी संयमी फलंदाजी करीत शतकी भागीदारी केली. या दोन फलंदाजांव्यतिरिक्त मोहम्मद नावीद (१४) दुहेरी धावसंख्या नोंदविण्यात यशस्वी ठरला. विंडीजतर्फे कर्णधार होल्डर व जेरॉम टेलर यांच्याव्यतिरिक्त आंद्रे रसेलने २० धावांच्या मोबदल्यात दोन बळी घेतले.
विंडीज संघापुढे किमान षटकांमध्ये लक्ष्य गाठण्याचे आव्हान होते; पण त्यांच्या फलंदाजांना मॅकलिन पार्कच्या खेळपट्टीसोबत ताळमेळ साधताना अडचण भासली. चार्ल्सने वेगाने धावा फटकावल्या; पण ड्वेन स्मिथ (१५) व सॅम्युअल्स (९) यांना मोठी खेळी करता आली नाही. या दोन्ही फलंदाजांना मंजुला गुरुगेने तंबूचा मार्ग दाखविला. जावेदच्या (२९-२) गोलंदाजीवर माघारी परतण्यापूर्वी चार्ल्सने कार्टरसह तिसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. चार्ल्सने ४० चेंडूंना सामोरे जाताना नऊ चौकार व दोन षट्कार ठोकले. आंद्रे रसेलला (७) जावेदने बाद केले. त्यानंतर कार्टर व रामदीन यांनी संघाला विजयी लक्ष्य गाठून दिले. (वृत्तसंस्था)