विंडीजशी क्रिकेट संबंध संपुष्टात

By Admin | Updated: October 22, 2014 04:56 IST2014-10-22T04:56:02+5:302014-10-22T04:56:02+5:30

बीसीसीआयने कठोर पाऊल उचलताना वेस्ट इंडीजविरुद्धचे सर्व द्विपक्षीय क्रिकेट दौरे रद्द केले

West Indies cricket match ended | विंडीजशी क्रिकेट संबंध संपुष्टात

विंडीजशी क्रिकेट संबंध संपुष्टात

हैदराबाद : बीसीसीआयने कठोर पाऊल उचलताना वेस्ट इंडीजविरुद्धचे सर्व द्विपक्षीय क्रिकेट दौरे रद्द केले असून, गेल्या आठवड्यात भारत दौरा रद्द करण्याचा निर्णय घेणाऱ्या विंडीज बोर्डाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. चार वन-डे सामन्यानंतर मालिका रद्द झाल्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागत असलेल्या बीसीसीआयच्या कार्यसमितीच्या आज झालेल्या बैठकीमध्ये हे कठोर निर्णय घेण्यात आले. विंडीजसोबतचे सर्व क्रिकेट दौरे रोखण्याचा व कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय कार्यसमितीच्या सदस्यांनी सर्वानुमते घेतला.
बीसीसीआयने विंडीजच्या क्रिकेटपटूंविरुद्ध कारवाई न करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांना इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये विंडीज खेळाडूंच्या सहभागाबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
बैठकीनंतर बोलताना ‘बीसीसीआय’चे सचिव संजय पटेल म्हणाले, ‘दौरा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाविरुद्ध बीसीसीआयने कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय आणि वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डासोबतचे सर्व द्विपक्षीय दौरे रद्द करण्यात आले.’ बीसीसीआयने अल्प वेळेत पाच वन-डे सामन्यांची मालिका खेळण्यास होकार देणाऱ्या श्रीलंका क्रिकेट बोर्डाची प्रशंसा केली.
लंका संघाविरुद्धचे पाच वन-डे सामने कटक, हैदराबाद, रांची, कोलकाता आणि अहमदाबाद येथे खेळले जाणार असून, कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
भारत-विंडीज यांच्या दरम्यानचे क्रिकेट दौरे केव्हापर्यंत रोखण्यात आलेले आहे, याबाबत ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केलेले नाही. अनेक सदस्यांनी वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाविरुद्ध कडक पाऊल उचलण्यास दुजोरा दिला.
विंडीज संघ ८ आॅक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत भारतात पाच वन-डे, एक टी-२० आणि तीन कसोटी सामने खेळणार होता; पण मानधनाच्या मुद्यावर वाद झाल्यामुळे विंडीज संघाने चार वन-डे सामन्यांनंतरदौरा अर्धवट सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयने विंडीजच्या खेळाडूंना पुढील वर्षी ९ एप्रिलपासून प्रारंभ होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी देत खेळाडूंप्रति लवचिक धोरण अवलंबिले.
आयपीएलचे चेअरमन रंजिब बिस्वाल यांनी संचालन परिषदेच्या बैठकीनंतर सांगितले, की विंडीजचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळतील. दरम्यान, आयपीएल स्पर्धेला आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोजित विश्वकप स्पर्धेनंतर लगेच ९ एप्रिल २०१५ पासून प्रारंभ होणार आहे.
आयपीएल टी-२० स्पर्धेत आक्रमक फलंदाज ख्रिस गेल (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू), अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो व ड्वेन स्मिथ (दोन्ही चेन्नई सुपरकिंग्ज), किरोन पोलार्ड (मुंबई इंडियन्स), फिरकीपटू सुनील नरेन (कोलकाता नाईट रायडर्स) यांच्यासारखे विंडीजचे स्टार खेळाडू खेळतात. आयपीएल संचालन परिषदेचा एक सदस्य म्हणाला, ‘आयपीएलच्या आठव्या पर्वाचा प्रारंभ पुढील वर्षी ९ एप्रिलपासून होणार आहे. फ्रॅन्चायझींना या स्पर्धेची तयारी करण्यासाठी विश्वकप स्पर्धेनंतर ११ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. आयपीएलच्या सातव्या पर्वातील सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये आयोजित करण्यात आल्यामुळे फ्रॅन्चायझी संघांनी मोबदल्याची मागणी केली आहे. सातव्या पर्वात सुरुवातीचे १५ दिवस देशाच्या बाहेर सामने आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे फ्रॅन्चायझी संघांनी मोबदला मागितला आहे. बीसीसीआयचे आॅडिटर मोबदल्याची रक्कम निश्चित करतील.’
बीसीसीआयचे संयुक्त सचिव व हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी मात्र आयपीएलमध्ये विंडीज खेळाडूंच्या सहभागाबाबतची अधिकृत घोषणा नंतर करण्यात येईल. कार्यसमितीची बैठक विंडीजविरुद्ध कारवाई व नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करण्याच्या निर्णयासाठी बोलविण्यात आली होती. विंडीजच्या खेळाडूंची १७ आॅक्टोबर रोजी धर्मशाला येथे वन-डे सामना खेळण्यासाठी मनधरणी करावी लागली होती. खेळाडूंनी दौरा रद्द करण्यात येत असल्याचे त्यावेळीच बीसीसीआयला सांगितले होते. पटेल यांनी यापूर्वीच विंडीज बोर्डाविरुद्ध कडक कारावाई करण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: West Indies cricket match ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.