विंडीज क्रिकेट मंडळ आपली बाजू मांडणार
By Admin | Updated: October 23, 2014 00:24 IST2014-10-23T00:24:11+5:302014-10-23T00:24:11+5:30
बुधवारी वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाची (डब्ल्यूसीबी) आपत्कालीन बैठक बोलाविण्यात आली होती़

विंडीज क्रिकेट मंडळ आपली बाजू मांडणार
बार्बाडोस : वेस्ट इंडीज क्रिकेट संघ भारत दौरा मध्येच सोडून मायदेशी परतल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळासोबतचे (डब्ल्यूसीबी) संबंध संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर विंडीज मंडळ बीसीसीआय अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे़
बुधवारी वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाची (डब्ल्यूसीबी) आपत्कालीन बैठक बोलाविण्यात आली होती़
या बैठकीत भारत दौरा मध्येच रद्द झाल्यामुळे विंडीज मंडळाने खेद व्यक्त केला आहे़ तसेच प्रकरणाची पुन्हा एकदा समीक्षा
केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे़
विंडीज मंडळाने पुढे सांगितले की, विंडीज आणि बीसीसीआयचे अनेक वर्षांपासून चांगले संबंध राहिले आहेत़ त्यामुळे आम्ही या प्रकरणी बीसीसीआयशी चर्चा करण्यास इच्छुक आहोत़ कारण दौरा रद्द झाल्यामुळे बीसीसीआयचे थोडेफार नुकसान झाले असले तरी विंडीज मंडळाला याचा खूप मोठा फटका बसू शकतो़ दरम्यान, संघातील खेळाडू आणि वेस्ट इंडीज प्लेयर्स संघटना (डब्ल्यूआयपीए) यांच्यात सुरू असलेला वाद दूर करण्यासाठी विंडीज मंडळाने एक समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे़ ही समिती दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आपला अंतिम अहवाल देणार आहे़ डब्ल्यूसीबीच्या बैठकीत वेस्ट इंडीज खेळाडूंविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र काय कारवाई होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही़ (वृत्तसंस्था)