वडिलांचे छत्र हरपले, अंगणवाडी सेविका आईने वाढवले; महाराष्ट्राच्या लेकीने KIYG मध्ये रौप्य जिंकले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 03:49 PM2024-01-30T15:49:24+5:302024-01-30T15:53:24+5:30

ठाण्याच्या वेटलिफ्टर ग्रीष्मा थोरातने खेलो इंडिया युवा स्पर्धा २०२३ मध्ये मुलींच्या ७६ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले.

Weightlifter Grisma Thorat of Thane won silver medal in girls' 76 kg category at Khelo India Youth Championship 2023 | वडिलांचे छत्र हरपले, अंगणवाडी सेविका आईने वाढवले; महाराष्ट्राच्या लेकीने KIYG मध्ये रौप्य जिंकले

वडिलांचे छत्र हरपले, अंगणवाडी सेविका आईने वाढवले; महाराष्ट्राच्या लेकीने KIYG मध्ये रौप्य जिंकले

चेन्नई: ठाण्याच्या वेटलिफ्टर ग्रीष्मा थोरातने खेलो इंडिया युवा स्पर्धा २०२३ मध्ये मुलींच्या ७६ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. अनेक संकटांना सामोरे जाताना जिंकलेले हे पदक तिच्यासाठी खूप मौल्यवान आहे.  गेल्या दोन वर्षांपासून ग्रीष्माचे आयुष्य तिच्या दिवंगत वडिलांच्या आठवणींभोवती फिरत आहे. ग्रीष्मा २०२२ मध्ये ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत सहाव्या स्थानासह भुवनेश्वरहून परतल्यानंतर केवळ चार दिवसांनी कोविड संसर्गामुळे वडिलांचे निधन झाले होते.  

“मी भुवनेश्वरहून परत आल्यानंतर काही दिवसांनी, माझ्या वडिलांना कोविडमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. आम्ही सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार नव्हतो आणि आम्हाला वाटले की ते बरे होतील. पण, नशिबाने आमच्यासाठी काहीतरी वेगळेच लिहिले होते,” असे भावनिक ग्रीष्मा म्हणाली. ती स्थानिक शाळेत दहावी इयत्तेत शिकत आहे.  

“माझ्या कारकिर्दीतील हा (गेली दोन वर्षे) आतापर्यंतचा सर्वात कठीण टप्पा होता. प्रत्येक वेळी मी ट्रेनिंगला जाते किंवा काहीही करायला सुरुवात करते तेव्हा वडिलांच्या आठवणी माझ्यासमोर येत राहतात. मी मानसिकदृष्ट्या विस्कळीत झाले होते. आतमध्ये एक पोकळी आहे जी भरणे कठीण आहे. मी कशावरही लक्ष केंद्रित करू शकत नाही,” असे ती म्हणाली.

“माझे वडील चॉकलेटच्या कारखान्यात काम करायचे आणि ते कुटुंबातील एकमेव कमावणारे होते. हा काळ कठीण होता, पण  माझ्या आईने तिच्या मर्यादित उत्पन्नातून कुटुंब कसेतरी सांभाळले आहे,” असे  ती पुढे म्हणाली. तिच्या आईने ठाण्यातील एका अंगणवाडी केंद्रात केअरटेकरची नोकरी स्वीकारली आहे आणि त्या ग्रीष्मा तसेच तिच्या जुळ्या बहिणीच्या शिक्षणाचा खर्च त्यातून भागवतात.

खेलो इंडिया युथ गेम्सच्या या आवृत्तीपूर्वी, ग्रीष्मा पंचकुला व इंदूरमध्ये अनुक्रमे सहाव्या व चौथ्या स्थानावर राहिली होती. ती स्वतःला प्रेरित करण्यासाठी धडपडत होती आणि तिने परिस्थिती बदलण्यात यश मिळवले. अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे या महिन्याच्या सुरुवातीला ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले. 

"माझ्या प्रशिक्षक माधुरी सिंहासने यांनी मला या संकटातून बाहेर येण्यास मदत केली आहे आणि या आव्हानात्मक काळात माझ्यासोबत राहिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे," असे ती म्हणाली. या महिन्यात बॅक-टू- बॅक पोडियम फिनिशने प्रेरित होऊन, ग्रीष्मा आता पाटणा येथे मार्चमध्ये होणाऱ्या आगामी १७ वर्षांखालील शालेय स्पर्धेत अव्वल पोडियम फिनिश करण्याकडे लक्ष देत आहे.

Web Title: Weightlifter Grisma Thorat of Thane won silver medal in girls' 76 kg category at Khelo India Youth Championship 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.